महाराष्ट्राचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी म्हटले आहे की ”निवडणुकीनंतर ठरवू कोण मुख्यमंत्री होईल, तूर्तास काँग्रेससमोर मोठा प्रश्न आहे की महाराष्ट्र गुजरातसमोर गहाण ठेवला आहे.” महाराष्ट्राला नाना पटोले इतके लेचेपेचे, दुर्बल समजता का? महाराष्ट्र काय खेळणं आहे की एखादी वस्तू की ज्याला कुणीही कुणाला विकेल, गहाण ठेवेल? पण, नाना आणि काही वर्षांपूर्वी सामील झालेले उबाठा गटवाले तर अगदी अग्रक्रमाने सातत्याने महाराष्ट्राची आणि गुजरातची तुलना करत असतात. यावर काही लोकांचे म्हणणे आहे की, संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात तेव्हा काँग्रेस आणि त्यांचे सर्वेसर्वा नेता नेहरू यांची भूमिका काय होती? 105 महाराष्ट्रप्रेमी हुतात्मा झाले ते कुणामुळे? याचे उत्तर काँग्रेसच्या नाना पटोलेंनी द्यावे आणि मग महाराष्ट्रप्रेमाच्या बाता माराव्यात. नाना पटोले, त्यांची काँग्रेस आणि उबाठा गट ‘महाराष्ट्रातले हे पळवले’, ‘गुजरातला ते दिले’, ‘ते बंद केले’, ‘गुजरातला नेले,’ असे कायम म्हणत असतात. ही वस्तुस्थिती तशी आहे का? तर अजिबात नाही. राज्य म्हणून महाराष्ट्राची औद्योगिक प्रगती होत आहे. राज्यात विकासाच्या नव्या योजना कार्यान्वित होत आहेत. महाराष्ट्राच्या मूळ संस्कृतीचे जतन करण्याचे यथाशक्ती प्रयत्न होत आहेत. मात्र, हे सगळे सुरळीत चालले तर लोक आपला अडीच वर्षांचा निष्क्रिय आणि तितकाच धोकादायक सत्ताकाळ विसरतील, असे महायुतीच्या काँग्रेस आणि उबाठा गटातल्या नेत्यांना वाटत असते. त्यामुळेच काही ना काही, कारण काढून हे लोक मराठी भाषिक आणि इतर भाषिक असा प्रांतवाद करत असतात. मराठी माणसाने आतातरी ’जन्म आपुला राजकीय फसवणुकीसाठीच आहे’ ही भूमिका आणि वृत्ती सोडून द्यावी. काँग्रेसचे पूतना मावशीचे महाराष्ट्रप्रेम आणि छत्र्यांचे हजार कारखाने विकत घ्यायची ऐपत असताना पावसात छत्री न घेता भिजणारे शरद पवार किंवा मला मच्छरही मारता येत नव्हते, असे रडणारे उद्धव ठाकरे या सगळ्या नेत्यांचे, राजकीय पक्षांचे वास्तव महाराष्ट्राच्या हुशार जनतेने ओळखावे. राजकारण हे सगळ्याच नागरिकांचे क्षेत्र नसले तरी सत्तेत प्रतिनिधी निवडून देणे हा प्रत्येक नागरिकांचा हक्क आहे. या पार्श्वभूमीवर खोटी सहानुभूती लाटणार्यांना दूर लोटायचे आणि कार्यक्षम कर्तृत्वाला साथ द्यायची, हे ठरवलेच पाहिजे. कारण, महाराष्ट्र प्राणप्रिय आहे.
दाढीच्या निमित्ताने...
कायद्याने शीख व्यक्ती सोडली, तर पोलीस दलातील अन्य धर्मीय व्यक्ती दाढी ठेवू शकत नाही. मात्र, महाराष्ट्रातल्या जहरूद्दीन बेदादे या रिझर्व्ह पोलीस बलातील व्यक्तीला नोकरी करताना मुस्लीम पद्धतीची पारंपरिक दाढी ठेवायची आहे. त्यासाठी त्याने उच्च न्यायालयात धाव घेतलीे. पोलीस दलात नियमबाह्य जाऊन दाढी ठेवतो म्हणून जहरूद्दीनला 2012 साली नोकरीतून कमी केले गेले. मात्र, नोकरीसाठी दाढी काढणार नाही, असे त्याचे म्हणणे. त्यानंतर आम्हाला धर्मानुसार जगण्याचा, राहण्याचा अधिकार आहे, असे म्हणत तो न्यायालयात गेला. दुसरीकडे, उत्तर प्रदेशमध्येही सब इन्स्पेक्टर इंतेशा अली यानेही नोकरीदरम्यान दाढी राखण्याचा हट्ट केला. त्यालाही नियमबाह्य म्हणून नोकरीवरुन कमी करण्यात आले. पोलीस दलामध्येही नियम आहेत. शीख सोडून इतर धर्मीय नोकरदारांनी दाढी ठेवू नये, असा हा नियम. जहरूद्दीन किंवा इंतेशा अली यांनाही हा नियम लागू होतोच. त्यांना काय, हिंदूंनाही हा नियम लागू आहेच. यावर काही लोक म्हणत आहेत की, लिटमस टेस्ट असते किंवा पूर्ण सिनेमाआधी एक ट्रेलर असतो, तसेच या छोट्याछोट्या वाटणार्या कृती आहेत. आज नियमबाह्य जाऊन दाढी राखण्यास परवानगी दिली, तर उद्या नोकरीवर असताना पारंपरिक पोशाख आणि जीवनपद्धतीमध्ये संविधानिक न्यायापेक्षा पारंपरिक न्यायनिवाड्यासाठी दाद मागितली जाईल. तसेच अनेकांना वाटते की, सर्वच मुस्लीम त्यांच्या धर्मजाणिवेबाबत खूप कट्टर असतात. पण, हे खरे का? जहरूद्दीन आणि इंतेशा यांचे उदाहरण घेऊ. ते दोघे सरकारी नोकरीत नसते आणि उत्तर प्रदेशातील दुकानदार असते, तिथे दुकानावर या दोघांना त्यांचे खरे नाव लिहावे लागले असते तर? तर, या दोघांनी कट्टर मुसलमान म्हणून त्यांची ओळख दाखवली असती की, लपवण्याचा खटाटोप केला असता? थोडक्यात, धार्मिक कट्टरता दाखवण्याची काळवेळही असते, हे काही लोकांना माहिती आहे. या पार्श्वभूमीवर बहुसंख्य हिंदू प्रत्येक काळात प्रत्येक वेळी आपली निधर्मी ओळख दाखवण्यात मस्त आहे. दाढीच्या निमित्ताने इतके सगळे वाटले.
9594969638