मी नार्को टेस्ट करायला तयार आहे. पण माझ्यासोबत अनिल देशमुख, सलील देशमुख आणि संजय पांडे यांचीसुद्धा नार्को टेस्ट व्हायला हवी, अशी मागणी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांनी केलीये. राज्यात माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे सध्या चांगलेच चर्चेत आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर केलेल्या आरोपांनंतर आता त्यांनी माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यावरही गंभीर आरोप केले आहेत. दरम्यान, परमबीर सिंग यांनी हे आरोप फेटाळत अनिल देशमुखांना नार्को टेस्ट करण्याचं आव्हान दिलंय. तर परमबीर सिंग यांच्यावर अनिल देशमुखांनी नेमके कोणते आरोप केलेत? यावर परमबीर सिंगांचं म्हणणं काय? आणि याप्रकरणात आतापर्यंत काय काय घडलं? याबद्दल जाणून घेऊया.
या संपूर्ण प्रकरणाची सुरुवात झाली ती अनिल देशमुखांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर केलेल्या आरोपांपासून. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अनिल परब आणि अजित पवार यांना अडचणीत आणण्यासाठी फडणवीसांनी आपल्याला एका प्रतिज्ञापत्रावर सही करायला सांगितलं होतं, असा आरोप देशमुखांनी फडणवीसांवर केला होता. यानंतर बडतर्फ पोलिस अधिकारी सचिन वाझे यांनी १०० कोटी रुपये वसूलीप्रकरणात अनिल देशमुखांबाबत गौप्यस्फोट केल्याने या प्रकरणाला नवं वळण मिळालं. अनिल देशमुख हे त्यांच्या पीएच्या माध्यमातून पैसे घेत होते, असा गंभीर आरोप सचिन वाझेंनी केला होता. शिवाय सीबीआयकडे याबद्दलचे सगळे पुरावे असल्याचंही त्यांनी सांगितलं होतं.
त्यानंतर आता अनिल देशमुखांनी चांदीवाल अहवाल समोर आणण्याची मागणी केलीये. गृहखात्याकडे दोन वर्षांपासून चांदीवाल अहवाल पडलेलाय. ११ महिने चौकशी केलेला चौदाशे पानांचा रिपोर्ट महायुती सरकारनं जनतेसमोर आणावा. आपल्या विरोधातील आरोपाबद्दल चौकशी अहवालात नेमकं काय आढळलं, हे जाहीर करण्याची मागणी देशमुखांनी केलीये. मात्र, चांदीवाल आयोगाचा अहवाल महाविकास आघाडीच्या कार्यकाळातच सादर करण्यात आला होता. पण त्यांनी यावर कोणतीही कारवाई केली नाही, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलंय. शिवाय अनिल देशमुख गृहमंत्री असतानाच परमबीर सिंग यांनी त्यांच्यावर आरोप केले होते. त्यामुळे विरोधी पक्षनेत्याच्या म्हणण्यावर एखादा अधिकारी आरोप लावेल असं शक्य आहे का? त्याला त्याच्या नोकरीची काळजी नाही का? असा प्रश्न उपस्थित करत फडणवीसांनी या आरोपांमध्ये काहीही तथ्य नसल्याचं स्पष्ट केलंय.
मात्र, आता अनिल देशमुखांनी परमबीर सिंग यांच्यावर गंभीर आरोप केलाय. ते म्हणाले की, “मी गृहमंत्री असताना मुकेश अंबानींच्या घरासमोर एका स्कॉर्पिओ गाडीमध्ये बॉम्ब ठेवण्यात आला होता. त्यानंतर त्या गाडी मालकाची हत्या झाली. या दोन्ही गुन्ह्यांमध्ये तेव्हाचे मुंबईचे पोलिस आयुक्त परमबीर सिंह हे मास्टरमाईंड होते. त्यांना त्यावेळी एनआयएच्या माध्यमातून अटक होणार होती. त्यामुळे तेव्हा परमबीर सिंह आणि देवेंद्र फडणवीसांमध्ये बोलणं झालं. मला अटक करू नका, असं म्हणत परमबीर सिंह हे त्यांना शरण गेले. त्यावेळी आमचं सरकार पाडण्यासाठी फडणवीसांनी परमबीर सिंह यांना मदतीचं आश्वासन दिलं आणि अशाप्रकारे परमबीर सिंह आणि फडणवीसांमध्ये डील झालं होतं. त्यानुसारच त्यांनी माझ्यावर आरोप केले होते," असा दावा देशमुखांनी केलाय. यावर उपमुख्यमंत्री फडणवीसांना विचारलं असता झूठ बोले कौआ काटे, काले कौए से डरियो, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
शिवाय परमबीर सिंग यांनी हे सगळे आरोप फेटाळून लावत देशमुखांना नार्को टेस्ट करण्याची मागणी केलीये. या आरोपांवर माध्यमांशी बोलताना परमबीर सिंग म्हणाले की, "एका आयपीएस अधिकाऱ्याच्या नात्याने मी नेहमीच आपली मर्यादा राखून ठेवली. मी कधीही कुणाच्या मध्ये पडलो नाही. परंतू, आज अनिल देशमुखांनी माझ्यावर इतके गंभीर आरोप केले आहेत. त्यांचे पूर्ण आरोप हे त्यांनी आपल्या मनाने निर्माण केलेले आहेत. ते तथ्यहीन आहेत. त्यांचं मानसिक संतूलन खराब झाल्याने ते असे आरोप करत आहेत," असं त्यांनी म्हटलंय.
एवढंच नाही तर "एप्रिल २०२१ मध्ये संजय पांडे यांनी मला त्यांच्या ऑफिसमध्ये बोलवून धमकी दिली होती. मी जर देशमुखांविरोधातली तक्रार मागे घेतली नाही तर माझ्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यात येईल, असं मला सांगण्यात आलं होतं. पण मी घाबरलो नाही आणि सगळे पुरावे कोर्टासमोर सादर केले. त्याचवेळी अनिल देशमुखांचा मुलगा सलील देशमुख हे मला एका मॉलमध्ये भेटले. तुम्हाला डीजी केलं जाईल, अशी ऑफर देत तक्रार मागे घेण्याची विनंती केली. पण मी त्यांचे हे सर्व प्रस्ताव फेटाळले. या संपूर्ण प्रकरणात मी नार्को टेस्ट करायला तयार आहे. पण अनिल देशमुख, संजय पांडे आणि सलील देशमुख यांनीसुद्धा नार्को टेस्ट करावी," अशी मागणी परमबीर सिंग यांनी केलीये.
या संपूर्ण घटनेनंतर मनसुख हिरेन हत्येसंबंधी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे इत्यंभूत माहिती होती. परंतू त्यांनी ती माहिती जाणीवपूर्वक दडवून ठेवली, असा गंभीर आरोप भाजप नेते प्रविण दरेकर यांनी केलाय. शिवाय दोन्ही सभागृहात कोणतीही माहिती देण्यास देशमुख तयार नव्हते. त्यामुळे मनसुख हिरेन हत्येप्रकरणी अनिल देशमुख यांचीही चौकशी करण्याची मागणी दरेकरांनी केलीये. दरम्यान, आता अनिल देशमुख नार्को टेस्ट करणार का? आणि परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपांमुळे ते परत अडचणीत येतील का? असा प्रश्न उपस्थित होतोय.