जळगाव : ३१ ऑगस्टपर्यंत ज्यांचे ज्यांचे अर्ज आले आहेत, त्यांना जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्यांचे पैसे देणार आहोत आणि या महिन्यात नाही मिळाले तर सप्टेंबरमध्ये तिन्ही महिन्यांचे पैसे देऊ, असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिले आहे. मंगळवारी जळगाव येथे महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "लाडकी बहिण योजनेच्या माध्यमातून आम्ही महिन्याला १५०० रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. परंतू, काही लोकांच्या पोटात दुखायला लागलं आहे. कुणी म्हणतात तुम्ही महिलांना विकत घेता का, कुणी म्हणतात महिलांना लाच देता का? पण बहिणीच्या प्रेमाचं कधीही मोल नसतं."
"१५०० रूपयांमध्ये बहिणींचं प्रेम कुणीही विकत घेऊ शकत नाही. हे पैसे तर बहिणींना दिलेली भाऊबीज आहे. परवा एक नेते म्हणाले की, १५०० रूपयांत काय मिळतं? पण जेव्हा तुम्हाला संधी मिळाली तेव्हा तुम्ही फुटकी कवडीसुद्धा आमच्या माताभगिनींना दिली नाही. आता आम्ही १५०० रुपये देत आहोत तर तुमच्या पोटात का दुखतंय?" असा सवाल त्यांनी केला.
ते पुढे म्हणाले की, "या सावत्र भावांपासून तुम्हाला सावध राहावं लागेल. आमचे काही मित्र गमतीगमतीत बोलताना पैसे वापस घेऊ असं म्हणतात. पण या देशात भाऊबीज कधीच परत घेतली जात नाही. एकदा भाऊबीज दिली की, त्याबदल्यात केवळ मायाच मिळत असते. त्यामुळे निवडणूका येतील जातील पण मायमाऊलींचा आशिर्वाद आमच्या पाठीशी असेल, असा मला विश्वास आहे. जोपर्यंत हे त्रिमुर्तीचं सरकार आहे, तोपर्यंत ही मायमाऊलींची योजना कुणाचा बाप बंद करु शकणार नाही."
"आतापर्यंत १ कोटी ३५ लाख अर्ज मंजूर झाले आहेत. पण ३५ लाख महिलांचे आधार कार्ड बँक खात्याशी जोडलेले नाहीत, असं आमच्या लक्षात आलं. हे आधार कार्ड जोडून घेण्यासाठी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं आहे. पुढच्या ४-५ दिवसांत हे आधार कार्ड जोडलं जाईल. परंतू, एखाद्याचं आधारकार्ड जोडण्यास उशीर झाला तर काळजी करू नका. कारण त्यांनासुद्धा पैसे मिळणार आहेत. ३१ ऑगस्टपर्यंत ज्यांचे ज्यांचे अर्ज आले आहेत, त्यांना जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्यांचे पैसे देणार आहोत आणि या महिन्यात नाही मिळाले तर सप्टेंबरमध्ये तिन्ही महिन्यांचे पैसे देऊ," असे आश्वासनही फडणवीसांनी दिले आहे.