बारामती ते बांगलादेश...

12 Aug 2024 21:24:05
sharad pawar on bangladesh political crisis


बांगलादेशातील सत्तापालटानंतर शेख हसीनांनी देश सोडला. सध्या नोबेल पुरस्कार विजेते मोहम्मद युनूस हे बांगलादेशचे हंगामी प्रमुख म्हणून कारभार पाहत आहे. युनूस यांनी सूत्रे हाती घेतल्यानंतरही बांगलादेशातील हिंदूंवर अतोनात अत्याचार सुरू आहेत. तेथील हिंदूंनी आता एकत्र येत अत्याचाराविरोधात आवाजदेखील उठवला. मात्र, हिंदू संकटात असताना महाराष्ट्रातील एका ज्येष्ठ नेत्याला प्रचंड आनंद झाल्याचे पाहायला मिळते. मोहम्मद युनूस पंतप्रधान झाल्यानंतर कायम ‘भावी पंतप्रधान’ राहिलेल्या शरद पवारांना अत्यानंद झाला. त्यामुळेच की काय, त्यांनी युनूस यांच्यावर शब्दांची स्तुतिसुमने उधळली. “मोहम्मद युनूस हे पक्के धर्मनिरपेक्षवादी असून बांगलादेशची परिस्थिती ते नक्की सुधारतील. ते कधीही समाजामध्ये, भाषिकांमध्ये तसेच धर्मियांमध्ये अंतर वाढेल, असे काम करणार नाहीत. संतुलन साधण्याची भूमिका घेणार्‍या नेतृत्वाची बांगलादेशला गरज होती. ती युनूस यांच्यारूपाने पूर्ण झाली. तेथील परिस्थितीत ते सुधारणा आणू शकतील. भारत सरकारने बांगलादेशमधील परिस्थिती सुधारण्यासाठी मदत करावी,” अशी अपेक्षा चक्क शरद पवार यांनी व्यक्त केली आहे. शरद पवारांनी कुणाला शुभेच्छा द्याव्यात, हा त्यांचा प्रश्न. मात्र, मोहम्मद युनूस धर्मनिरपेक्षवादी असल्याचा साक्षात्कार त्यांना कसा काय झाला, हे तेच जाणो. कारण, ते धर्मनिरपेक्ष असते तर बांगलादेशात हिंदूंना का लक्ष्य केले जात आहे? त्यांच्यावर हल्ले का होताहेत? कारण, बांगलादेश आता धर्मनिरपेक्ष राहिला नाही, तो एका इस्लामिक राष्ट्राकडे वाटचाल करत आहे. ‘धर्मनिरपेक्ष’ शब्दाचा चोथा करून शरद पवारांनी आपली राजकारणाची पाटी कधीही कोरी ठेवली नाही. यात त्यांचे राजकीय कौशल्यही तितकेच कौतुकास्पद आहे. परंतु, त्यांच्या वाट्याला कायम ‘भावीपण’च आले. मुळात, मोहम्मद युनूस हे एकदम निष्कलंक आहेत, असे नाही. दि. 7 ऑगस्ट रोजी त्यांना एका भ्रष्टाचाराच्या प्रकरणात निर्दोष ठरविण्यात आले, तर नुकतेच त्यांना भ्रष्टाचारविरोधी आयोगाने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना ढाकाच्या विशेष न्यायालयाने निर्दोष ठरविले आहे. आता साहजिकच आणखी काही प्रकरणांमध्ये त्यांचे निर्दोष सिद्ध होईलच. कारण, आता सत्ता त्यांच्या हातात आणि आणि ते स्वतः बांगलादेश सैन्याच्या हातात...

बोल‘बच्चन’ जया
 
नुकत्याच पार पडलेल्या संसदेच्या अधिवेशनात समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन यांनी प्रश्न कमी आणि शंका-कुशंकाच जास्त विचारल्या. जयाबाईंनी याआधीही संसदेत जनहिताचं काही विचारण्याऐवजी गोंधळ निर्माण करून आपणच कसे चर्चेत राहू यासाठीच धडपड केलेली दिसते. दरवेळी काहीतरी नवा फंडा वापरून त्यांचा प्रसिद्धीच्या प्रकाशझोतात राहण्याचा प्रयत्न असतो. आताही त्यांनी राज्यसभेत स्वतःच्या नावावरून अनेकदा गोंधळ निर्माण केला. यावेळी त्यांनी राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांच्यावरही नाराजी व्यक्त केली. राज्यसभेत एका मुद्द्यावर बोलण्यासाठी जगदीप धनखड यांनी जया बच्चन यांचे पतीच्या नावासह म्हणजे ‘जया अमिताभ बच्चन’ असे पूर्ण नाव घेतले, ते ऐकून जया संतापल्या. त्या म्हणाल्या, “मी एक कलाकार आहे. चेहर्‍यावरील हावभाव समजतात. सभापतीजी, तुमचा बोलण्याचा सूर मला आवडला नाही.” यादरम्यान, सभापतींनी जया बच्चन यांना बसण्यास सांगून, “तुम्ही भले सेलिब्रिटी असाल पण संसदीय नियम पाळावेच लागतील,” अशा शब्दांत सुनावले. काही दिवसांपूर्वी उपसभापती हरिवंश सिंह यांनी जयाबाईंना ’जया अमिताभ बच्चन’ या पूर्ण नावाने संबोधले, तेव्हादेखील त्या संतप्त झाल्या आणि त्यांनी स्त्रीवादाचा मुद्दा बनवला. ‘फक्त जया बच्चन बोलले असते तर ठीक असते,’ असे म्हटल्यावर त्यांना कागदपत्रांमध्ये ‘जया अमिताभ बच्चन’ अशीच नोंद केली असल्याचे सांगण्यात आले. इकडे, जगदीप धनखड यांनी जयाबाईंना कागदोपत्री तसे नाव बदल करून घेण्यास सांगितले, तर बाईंना तेही पचेना. मला माझा आणि पती अमिताभ यांचा अभिमान असल्याचे त्या म्हणाल्या. मुळात, जया बच्चन यांच्यापेक्षा अमिताभ बच्चन सुपरस्टार असून त्यांची कमाई 100 कोटींहून अधिक आहे. संपूर्ण बच्चन कुटुंबात अमिताभ बच्चन एकमेव आहेत, जे आजही या वयात काम करतात आणि सर्वांपेक्षा जास्त कमवतात. त्यामुळे ‘सपा’ने दान दिलेल्या एका खासदारकीच्या बळावर जयाबाईंनी सर्वांनाच बुचकळ्यात पाडले. एकतर, स्वतः आधी तसे नाव नोंदवले आहे आणि ते उच्चारले तर बाईंचा तिळपापड होतो. आता सभापती जगदीप धनखड यांच्यावर हक्कभंग आणण्याचे नाटकही विरोधक करताहेत. परंतु, हाताशी बहुमत नाही हे माहिती असूनही त्यांना घालायचा आहे केवळ गोंधळ!



 
Powered By Sangraha 9.0