आव्हानवीर मयूरेश

11 Aug 2024 22:24:07
mayuresh vasudev gadre


पुस्तक व्यवसाय करत असताना येणार्‍या आव्हानांना तोंड देत या व्यवसायात तग धरून राहिलेले डोंबिवलीतील मयूरेश वासुदेव गद्रे यांच्याविषयी..

मयूरेश यांचा जन्म कल्याणमध्ये झाला. त्यांचे शालेय शिक्षण कल्याणमधील ओक हायस्कूल येथे झाले. पुढे बी कॉमची पदवी त्यांनी केळकर महाविद्यालयातून पूर्ण केली. मयूरेश हे अभ्यासात हुशार होते. त्यांनी बी कॉमच्या परीक्षेत महाविद्यालयातून पहिले येण्याचा मान पटकाविला होता. एवढेच नाही तर, दहावीला असताना नॅशनल टॅलेंट स्कॉलरशिपही मिळविली होती. पदवी मिळाल्यानंतर त्यांनी कॉस्ट अ‍ॅण्ड वर्क्स अकाउंटंट (टीडब्ल्यूए) चा कोर्स केला. कलकत्ता येथील आयसीडब्ल्यू इन्स्टिटयूटमधून, कॉस्ट अकाउंटंटचा कोर्स केला. उद्योग विश्वात एखाद्या उत्पादनाची किंमत ठरविण्याचे काम कॉस्ट अकाउंटंट करतात. तसेच कायद्याचा अभ्यासही मयूरेश यांनी केला आहे. लॉ ची पदवीही त्यांनी संपादन केली. 1995 मध्ये त्यांच्या वडिलांचे निधन झाले. गेल्या 29 वर्षापासून मयूरेश व्यवसाय सांभाळत आहेत. त्यांनी शिक्षण पूर्ण केल्यानंतर, नोकरी करायची की दुकान सांभाळायचे विषय समोर आला. त्यावेळी मयूरेश यांच्या कुटुंबीयांनी त्यांना दुकानच पाहावे असा सल्ला दिला. या व्यवसायाकडे व्यक्तिशः खूप लक्ष द्यावे लागते. ते काम कामगार लावून होणार नाही,म्हणून मयूरेश व्यवसायात उतरले.
 
मयूरेश यांचे आजोबा पोस्टमास्टर होते. रिटायर्ड झाल्यानंतर त्यांनी मुलांना व्यवसाय सुरू करून दिले. 8 ऑगस्ट 1946 रोजी गद्रे बंधूची मुहूर्तमेढ रोवली. सुरूवातीला डिपार्टमेंट स्टोअरसारखं असलेल्या दुकानाला ,आता बुक स्टोअरचे स्वरूप प्राप्त झाले आहे. त्यांचे वडील वासुदेव आणि त्यांचे मोठे भाऊ म्हणजे निळूभाऊ, हे दोघे हा व्यवसाय पाहत होते. म्हणूनच या दुकानाला गद्रे बंधू असे नाव पडले. आता डोंबिवलीतील गद्रे बंधू दुकानात शालेय पुस्तके, महाविद्यालयीन पुस्तके, धार्मिक पुस्तके विक्रीसाठी ठेवली जातात. मूळ व्यवसाय पुस्तकांचा असला तरी, त्याला जोड असे अनेक व्यवसाय मयूरेश करत असतात. मागील 15 ते 20 वर्षापासून, चित्रकलेसाठी लागणारे सर्व प्रकारचे साहित्य दुकानात ठेवले जाते. त्यामध्ये कॅनव्हॉस, रंग सारख्या गोष्टीचा समावेश आहे. आर्ट साहित्यामुळे चित्रकला विश्वातही मयूरेश यांची, वेगळी ओळख निर्माण झाली आहे. पुस्तक व्यवसायात असलो तरी, काळानुरूप व्यवसायात बदल घडवावे लागतात. सुरूवातीला मी व्हॉट्सॅअपवर नव्हतो. पण त्यानंतर सोशल मीडिया ही काळाची गरज आहे हे लक्षात आले. त्यानुसार स्वत: मध्ये बदल करण्यास सुरूवात केली. ऑनलाईन खरेदी होऊ लागली. वेबसाईट व इन्स्टाग्राम अशा सोशल मीडियाशी स्वत:ला जोडल्याचे मयूरेश सांगतात.

मध्यंतरीच्या काळात पहिली ते आठवीची पुस्तके, इंग्रजी माध्यम वगळता सर्वांना मोफत पुस्तके देण्याचा निर्णय शासनाने घेतला. त्यामुळे व्यवसायावर परिणाम झाला. पण त्यावेळी इंग्रजी माध्यमाकडे ओढा वाढला. पुस्तक हा मुख्य व्यवसाय असल्याने, त्यानंतर ग्राहक वह्या, कंपास घेतात. पण पुस्तके शाळेतून मिळू लागल्यावर व्यवसायावर मोठा परिणाम झाला. व्यवसायात आव्हाने सतत येत असतात. आता महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर पुस्तके जाऊ लागली आहे. घरपोच पुस्तके ग्राहकांना देतो. दुकानादारांना स्वत:च्या स्टाईलमध्ये बदल करावा लागतो. कोरोनानंतर घरी बसून नवीन पिढीला सेवा हवी झाली आहे. त्यामुळे ते ऑनलाईन वस्तू मागवितात. कोविडकाळानंतर झालेला हा मोठा बदल आहे.

मयूरेश 18 वर्षे इकोफ्रेंडली मखरांचे डोंबिवलीतील सर्वेश सभागृहात, प्रदर्शन भरवित होते. पाच उद्योजक एकत्र येऊन प्रदर्शन भरवत. आता उद्योजक थर्माकोल वापरत नाही. पण त्यात प्लास्टीकचा मोठा वापर आहे. या वस्तू निसर्गात लवकर विघटन होत नाही. आणि दुसरीकडे मखर इकोफ्रेंडली असल्याचे सांगतात. या वस्तूमधून निसर्गाची हानी होते. ही गोष्ट मनाला पटत नव्हती. म्हणून मखरांचा व्यवसाय बंद केला. मात्र दिवाळीत कंदिलाचा व्यवसाय करतो. या व्यवसायातून अल्प उत्पन्न गटातील गृहिणींना व्यवसाय मिळतो. त्यांना मयूरेश संपूर्ण सामान देतात. एप्रिलपासून हे काम सुरू केले जाते. पावसाळ्यात हे काम बंद असते. पावसात कागदाचे काम करता येत नाही, यासाठी तो बंद ठेवला जातो.

मयूरेश यांचे इकोफ्रेंडली कंदील महाराष्ट्रात आणि परदेशातही गेले आहेत. इकोफ्रेंडली कंदिल घडी करून ठेवल्यानंतर, पुढील वर्षी वापरता येतो. मयूरेश यांच्यासोबत चार ते पाच जण मदतीला आहेत. त्यांची पत्नी आणि बहीणही या कामात त्यांना मदत करतात. मयूरेश हे बुक सेलर असोसिएशनचे कल्याण -डोंबिवलीचे सचिव आहेत. तसेच बालक मंदिर संस्था या कल्याणमधील शैक्षणिक संस्थेचे कार्याध्यक्षपदावर कार्यरत आहेत. रोटरी क्लब डोंबिवली सिटीच्या माध्यमातून अनेक सामाजिक कामे ते करत आहेत. शिक्षण घेऊनही मयूरेश यांनी उद्योजकतेची निवड केली. पण, शिक्षणामुळे बोलणे, वागणे यात फरक जाणवतो. पत्रव्यवहार करताना शिक्षणाचा फायदा होतो असे मयूरेश सांगतात. अशा या हरहुन्नर उद्योजकाला पुढील वाटचालीसाठी ‘दैनिक मुंबई तरुण भारत’कडून हार्दिक शुभेच्छा !


Powered By Sangraha 9.0