विशेष मुलांची ‘ममता’

01 Aug 2024 21:46:04
mamata pankaj bhosale



फक्त विशेष शिक्षिकाच नाही, तर एक माणूस म्हणूनही ‘विशेष’ ठरलेल्या ममता पंकज भोसले यांच्याविषयी...

'नावात काय आहे?’ असे कुणीही कितीही म्हटले तरी काही माणसे मात्र स्वकर्माने आपलं नाव सर्वस्वी सार्थ ठरवतात. म्हणजे अशा व्यक्तींना भेटल्यानंतर त्यांच्यासाठी जणू दुसरे काही नाव असूच शकत नाही, असे वाटू लागते. असेच एक व्यक्तिमत्त्व म्हणजे शिक्षिका आणि समुपदेशक ममता पंकज भोसले. मानसशास्त्राचे शिक्षण घेतलेल्या ममता यांच्याकडे या क्षेत्रातच चांगली नोकरी मिळवण्याची उत्तम संधी होती. शिवाय अभिनयाचीही आवड असल्यामुळे अभिनयक्षेत्रातही नशीब आजमवण्याचा त्यांच्याकडे पर्याय होता. पण, हे दोन्ही पर्याय नाकारून ममता यांनी शिक्षिका होण्याचा मार्ग पत्करला. मुलांना शिकवणे ही खरं तर त्यांच्यासाठी तशी नवीन गोष्ट नव्हती. कारण, महाविद्यालयात असताना वडिलांचा अकाली मृत्यू झाल्यामुळे घरी लहान मुलांच्या शिकवण्या घेऊनच त्यांनी आपले पदवीचे शिक्षण पूर्ण केले. पण, त्या शिकवण्या घेत असताना त्यांना ही कल्पना मुळीच नव्हती की, भविष्यात विशेष मुलांच्या शिक्षिका होण्याची त्यांनी संधी मिळेल.

बारावीमध्ये असताना मानसशास्त्राचेच शिक्षण घ्यायचे, हे ममता यांनी निश्चित केले. त्याप्रमाणे त्यांनी मानसशास्त्रात पदवीही मिळवली. पण, त्याचदरम्यान त्यांच्या मोठ्या भावाच्या मुलाला अभ्यासात अडचणी येऊ लागल्या. तो अभ्यासात मागे पडू लागला. मानसशास्त्राचा अभ्यास असल्यामुळे ममता यांना ही ‘लर्निंग डिसअ‍ॅबिलिटी’ म्हणजेच अध्ययन अक्षमतेची लक्षणे आहेत, हे जाणवले. तेव्हापासून ममता यांच्या मनात या विषयाबद्दल कुतूहल निर्माण झाले आणि त्यांनी या क्षेत्रात काम करण्याचे ठरवले. या क्षेत्रात काम करण्यासाठी त्यांनी आवश्यक ‘डी.एड. इन लर्निंग डिसअ‍ॅबिलिटी’, ‘बी.एड इन स्पेशल एज्युकेशन’, ‘बी.एड. इन ऑटिझम डिसऑर्डर’ या पदव्याही मिळवल्या.

गेली 20 वर्षे ममता भोसले विशेष शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. सध्या त्या वसंत विहार शाळेत काम करत आहेत. फक्त ‘लर्निंग डिसअ‍ॅबिलिटी’ म्हणजेच अध्ययन अक्षमताच नाही, तर ऐकण्याची, पाहण्याची अक्षमता आणि ऑटिझम असणार्‍या अशा सर्व प्रकारच्या विशेष मुलांना ममता या शाळेत शिकवतात. या क्षेत्रात त्यांनी कामाला सुरुवात केली, तेव्हा त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. जेव्हा या विशेष मुलांना त्यांनी शिकवायला सुरुवात केली, तेव्हा ही मुले इतर मुलांप्रमाणे त्यांच्या समस्या सहज सांगू शकत नाहीत. त्यांना काय हवे आहे, काय नको, हे व्यक्तदेखील करू शकत नाहीत. त्यामुळे या मुलांशी संभाषण करणे ममता यांना थोडे अवघड जात होते. पण, जसजशा त्या या क्षेत्रात अधिकाधिक काम करत गेल्या, तसे तसे त्यांच्या लक्षात आले की, खरी समस्या ही मुले त्यांचे म्हणणे आपल्याला समजावून सांगू शकत नाही ही नाहीच, तर आपण यांना समजून घेऊ शकत नाही, ही खरी समस्या आहे. या मुलांना त्यांच्या कलेने समजून घेणे खूप आवश्यक आहे, हे लक्षात येताच, ममता यांनी त्यादृष्टीने काम सुरू केले. या विशेष मुलांमध्ये असे काही विशेष कलागुण असतात की, त्यांच्याकडे लक्ष पुरवले तर ही मुले खूप मोठी उंची गाठू शकतात. त्यासाठी या मुलांमध्ये असलेले खास कलागुण हेरून त्यांना त्या दिशेने मार्गदर्शन करणे गरजेचे आहे, हे त्यांच्या लक्षात आले आणि नावाप्रमाणेच अत्यंत ममतेनेच त्या या मुलांना समजून घेऊ लागल्या. या मुलांना ममता यांनी इतक्या आपलेपणाने शिकवले की, जेव्हा एखादे मूल दोन अक्षरांमध्ये फरक ओळखून दाखवे, एखादे गणित सोडवून दाखवते, तेव्हा ममतांच्या चेहर्‍यावरचा आनंदही ओसंडून वाहू लागतो.

त्यांच्या 20 वर्षांच्या कार्यकाळात हजारो मुले ममता यांच्या हाताखालून गेली. त्यांनी फक्त या मुलांना एक शिक्षिका म्हणून शिकवले नाही, तर एका आईसारखे त्यांना खर्‍या अर्थाने घडवले. माया लावली. ज्या मुलांबाबत ‘यांचे काहीच होऊ शकत नाही,’ असे खुद्द त्यांच्याच पालकांना वाटत होते, त्या मुलांवर ममता यांनी विश्वास ठेवून त्यांचे समुपदेशन केले. अनेक मुलांना त्यांनी शिक्षणासोबतच त्यांच्या आवडत्या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी साहाय्य केले. ममता यांचे अनेक विद्यार्थी आज अ‍ॅनिमेशन, पोलीस, अभियांत्रिकी अशा निरनिराळ्या क्षेत्रांत कार्यरत आहेत आणि त्यातले काही विद्यार्थी त्यांना आजही भेटायला येतात. एक विद्यार्थी तर लांबून गाडी चालवून त्यांना भेटायला आला होता. तेव्हा ममता यांना त्याचे विशेष कौतुक वाटले होते.

ममता या फक्त एक विशेष शिक्षिका आणि समुपदेशक नाहीत, तर ‘आपला कट्टा’ या संस्थेअंतर्गत त्या अनेक प्राचीन खेळांचे प्रशिक्षणही मुलांना देतात. विविध आदिवासी पाड्यांतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याची मदत करण्यात त्यांचे योगदान आहे. 2020 सालच्या ‘राज्यस्तरीय गुणवंत शिक्षकरत्न पुरस्कारा’ने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. नवी मुंबईतील नावाजलेल्या समुपदेशकांमध्ये आज ममता यांचे नाव घेतले जाते. भविष्यात या विशेष मुलांना समजून घेण्यासाठी, त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी प्रत्येक शाळेत, महाविद्यालयात समुपदेशकाची सोय असावी, असे ममता यांना वाटते. या विषयाबाबत लोकांमध्ये अधिकाअधिक जागरुकता निर्माण करणे आणि या मुलांसाठी अधिकाधिक प्रयत्न करणे, हे ममता यांचे उद्दिष्ट आहे. गेली 20 वर्षे त्या हे काम जोमाने करत आहेत. तसेच पुढेही करत राहतील आणि त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन इतर अनेक लोकही या कार्यात सहभागी होतील, यात शंका नाही. असे हे समाजहिताचे काम करणार्‍या ममता भोसले यांना दै. ‘मुंबई तरुण भारत’तर्फे पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!

दिपाली कानसे 
Powered By Sangraha 9.0