इस्रायल आणि धर्मविजय

01 Aug 2024 21:14:50
israel attack on hamas haniyeh


इराण गाझापट्टीचा समर्थक आणि कट्टरतावादी देश. इथे आपल्या केसालाही धक्का लागणार नाही, असे ‘हमास’ या दहशतवादी संघटनेच्या प्रमुखास इस्माइल हानियाला वाटले. मात्र, हा त्याचा गैरसमज ठरला. शत्रूचा मित्र आणि स्वतःच्या कट्टर शत्रूचा इस्रायलने इराणमध्ये घुसून खातमा केला. हानिया तेहरानच्या ज्या इमारतीत थांबला होता, ते घरच इस्रायलने उडवले. तसेच इराणी सेनेचा जनरल अमिर अली याचाही सीरियामध्ये खातमा केला.

दि. 30 जुलै रोजी इराणचे नवनिर्वाचित राष्ट्रपती मसूद पेजेश्कियान यांचा शपथग्रहणाचा समारंभ होता. जगभरातल्या मान्यवरांना या समारंभाचे आंमत्रण होते. इराणचे तर ‘हमास’शी अति विशेष सौख्य. त्यामुळे इराणच्या नव्या सत्ताधार्‍यांनी ‘हमास’च्या प्रमुखास म्हणजे इस्माईल हानिया यालाही आमंत्रित केले. दि. 7 ऑक्टोबर रोजी ‘हमास’ने इस्रायलमध्ये केलेला हिंसाचार, वृद्ध महिला, बालक यांच्यावरचा केलेला अत्याचार डोळ्यांसमोर येतो. त्याच ‘हमास’चा प्रमुख म्हणजे हा इस्माईल हानिया. नंतर इस्रायलच्या कार्यवाहीत ‘हमास’चे हजारो दहशतवादी मारले गेले. मात्र, ‘हमास’चा प्रमुख इस्माईल हानिया हा तिथे राहत नव्हता, तर तो सुरक्षितपणे कतार येथे राहत होता. कतारमध्ये राहून तो ‘हमास’ची सूत्रे सांभाळत होता. तिथे बसून इस्रायलवर दहशतवादी हल्ला करण्याचे नियोजन करायचा. गाझापट्टीत पाऊल ठेवल्याक्षणीच आपल्यावर हल्ला होऊ शकतो, हे त्याला माहीत होते. गेल्या आठवड्यात इस्रायलवर ‘हमास’ने हल्ला केला. त्यात 12 बालक हकनाक मृत्युमुखी पडले. या हल्ल्याचा कर्ताधर्ता नियोजनकर्ता इस्माईल हानिया होता.

इस्रायलला या हल्ल्याचा प्रतिशोध घ्यायचा होता. मात्र, कतारमध्ये असलेल्या हानियावर हल्ला करणे इस्रायलने टाळले. कारण, कतारमध्ये हानियावर हल्ला केला असता, तर देशात घुसून हल्ला केला म्हणून कतारलाही उघड उघड इस्रायलविरोधी भूमिका घ्यावी लागली असती. इस्रायलला आणखी एक शत्रू निर्माण करायचा नव्हता. मित्रराष्ट्र किंवा तटस्थ राष्ट्र यांच्याशी इस्रायलला संबंध बिघडवायचे नाहीत. त्यामुळे इस्रायलने ‘वेट अ‍ॅण्ड वॉच’ची भूमिका घेतली. हानिया याच्या दैनंदिनीवर बारीक लक्ष ठेवले. अखेर तो दिवस उजाडला. इराणमध्ये राष्ट्रपती मसूद पेजेश्कियान यांच्या शपथविधीसाठी त्याला आमंत्रण आले. कट्टरपंथी इराणमध्ये आपल्यापर्यंत शत्रू पोहोचणारच नाही, याची हानिया याला खात्री होती. त्यामुळे हानिया निश्चिंत होता. मात्र, इस्रायलने त्याची माहिती आधीच काढली होती. त्यानुसार त्याच्या निवासस्थानावरच इस्रायलने मिसाईल हल्ला केला. त्यात हानियासह त्याच्या सुरक्षारक्षकाचा मृत्यू झाला. त्यानंतर ‘हिजबुल्लाह’चा कमांडर फुआद शुकर आणि ‘हमास’चा सैन्य प्रमुख मोहम्मद दीफ या दोघांनाही इस्रायलने कंठस्नान घालून शत्रूराष्ट्राला योग्य तो संदेश दिला.

इस्रायलने शत्रूच्या प्रमुखांचाच खातमा केला. ‘इस्लामचा कैवारी’ आणि ‘इस्लामसाठी सुरिक्षत देश’ अशी प्रतिमानिर्मिती करण्याचा प्रयत्न इराण करत असतो. असे असताना हानिया या मित्रावर इस्राायलने देशात घुसून हल्ला केला. यामुळे इराणची पत गेली. इस्रायल इराणला कवडीचीही भीक घालत नाही, हे सिद्ध झाले. गेलेली इज्जत राखण्यासाठी इस्स्रायलविरोधात आणखीन कडक शत्रुत्व दाखवणे इराणला भाग होते. प्रतिशोध कट्टर असला, की इराणमध्ये जामकरण मशिदीवर लाल झेंडा लावला जातो. यावेळीही इराणने या मशिदीवर लाल झेंडा फडकाविला आहे. इराणी शियांच्या मते हा लाल झेंडा त्यांच्या रक्ताचा आणि प्रतिशोधाच्या भावनेचे प्रतीक आहे. शिया मुस्लिमांसाठी ही मशीद म्हणजे तीर्थक्षेत्रच. तर या मशिदीवर लाल झेंडा फडकला. आता इराण भयंकर बदला घेणार असे चित्र उभे केले. कारण, याआधीही लढाई सुरू करण्याआधी किंवा एखाद्या राष्ट्रावर हल्ला करण्याआधी इराणमध्ये या मशिदीवर लाल झेंडा फडकाविला होता. इराण बदला घेईल तेव्हा घेईल, पण इराणी सेनेचा जनरल अमिर अली याचाही सीरियामध्ये एका हल्ल्यात मृत्यू झाला. इराणच्या जनरलवर हल्ला करणारे इस्रायलशिवाय कोण असणार? गाझापट्टी ‘हमास’, लेबनॉन सीरिया आणि इराण एकाचवेळी इस्रायल अनेक आघाड्यांवर शत्रूंशी लढत आहे. पण, जिथे धर्म तिथेच जय होणार, हे सध्या तरी दिसते.

9594969638
Powered By Sangraha 9.0