मुंबई : देशातील चाइल्डकेअर उत्पादन ब्रँड असलेल्या ब्रेनबीज सोल्युशन लिमिटेडच्या 'फर्स्टक्राय डॉट कॉम'चा इनिशियल पब्लिक ऑफर(आयपीओ) लवकरच बाजारात येणार आहे. दि. ०६ ऑगस्ट रोजी खुला होणाऱ्या आयपीओच्या माध्यमातून कंपनी २,४९०.५२ कोटी रुपयांची भांडवल उभारणी करण्यात येणार आहे. यात गुंतवणूकदारांना भागधारकांद्वारे ५,३५,५९,७३३ इक्विटी शेअर्सचा समावेश करण्यात आला असून ज्याची रक्कम २,४९०.५२ कोटी रुपये आहे.
ब्रेनबीज सोल्युशन्सने आयपीओकरिता प्राइस बँडची घोषणा केली असून कंपनीकडून प्राईस बँड ४४०-४६५ रुपये प्रति शेअर निश्चित करण्यात आला आहे. गुंतवणूकदार किमान ३२ इक्विटी शेअर्स असेल तसेच, बिड ऑफर कालावधी दि. ०६ ऑगस्ट ते ०८ ऑगस्ट पर्यंत बोलीसाठी खुला असेल.
वर्ष २०१० मध्ये स्थापन झालेली कंपनी ब्रेनबीज सोल्युशन्स त्यांच्या ऑनलाइन प्लॅटफॉर्म असलेल्या 'फर्स्टक्राय' द्वारे लहान मुलांसाठी उत्पादने ग्राहकांना प्रदान करते. पालकांकरिता किरकोळ, सामग्री आणि शिक्षणाच्या गरजांसाठी वन-स्टॉप स्टोअर तयार करणे हे त्याचे उद्दिष्ट आहे. विशेष म्हणजे कंपनी जागतिक ब्रँड आणि स्वतःच्या ब्रँडची उत्पादने तयार करते.
मागील आर्थिक वर्षात ब्रेनबीज सोल्युशन्सने ६,५७५.०८ कोटी रुपयांच्या महसुलासह ३२१.५१ कोटींचा निव्वळ तोटा नोंदविला आहे. तसेच, २०२२-२३ या आर्थिक वर्षासाठी ५,७३१.२८ कोटी रुपयांच्या महसुलासह फर्स्टक्राय पॅरेंटिंग कंपनीचा निव्वळ तोटा ४८६.०६ कोटी रुपये इतका होता.