भारत खनिज उत्पादनात अग्रेसर; १०.४३ लाख टन अल्युमिनियम उत्पादकता

01 Aug 2024 18:53:23
bharat aluminium production


नवी दिल्ली :       भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा अॅल्युमिनियम उत्पादक देश बनला असून आर्थिक वर्ष २०२४-२५ च्या पहिल्या तिमाहीत देशातील खनिज उत्पादनाची वृद्धीच्या मार्गाने वाटचाल झाली आहे. दरम्यान, यावर्षी देशातील महत्त्वाची खनिजे विशेषतः अॅल्युमिनियम धातूच्या उत्पादनात भरीव वाढ झाल्याचे दिसून आले आहे.


आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये उत्पादनाची विक्रमी पातळी गाठल्यानंतर पहिल्या तिमाहीत देशातील लोह खनिज, चुनखडी यांसारख्या महत्त्वाच्या खनिजांच्या उत्पादनात भरीव वाढ होत असल्याचे दिसून आले आहे. विशेष म्हणजे एकूण एमसीडीआर अर्थात खनिज संवर्धन आणि विकास नियमांतर्गत होणाऱ्या खनिज उत्पादनात लोह खनिज आणि चुनखडी याचा वाटा सुमारे ८० टक्के आहे.

मागील वर्षी देशात २७५ दशलक्ष टन लोह खनिज तर ४५० दशलक्ष टन चुनखडीचे उत्पादन झाले असून बिगर-लोह धातू क्षेत्राचा विचार करता, अल्युमिनियम उत्पादनात गेल्या वर्षीच्या उत्पादनापेक्षा १.२ टक्क्यांची वाढ दिसून आली आहे. आर्थिक वर्ष २०२४-२५ (एप्रिल ते जून)मधील अल्युमिनियम उत्पादन १०.४३ लाख टन इतके आहे.

भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा अल्युमिनियम उत्पादक, तिसऱ्या क्रमांकाचा चुनखडी उत्पादक आणि चौथ्या क्रमांकाचा लोह खनिज उत्पादक देश बनला आहे. चालू आर्थिक वर्षात देशातील लोह खनिज आणि चुनखडी उत्पादनात होत असलेल्या सातत्यपूर्ण वाढीतून पोलाद आणि सिमेंट वापरकर्त्या उद्योगांकडून होणारी सशक्त मागणी दिसून येत आहे.



Powered By Sangraha 9.0