नवी दिल्ली : वादग्रस्त आएएस अधिकारी पूजा खेडकरचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टाने हा निर्णय दिला आहे. त्यामुळे आता पूजा खेडकरला कधीही अटक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. खोटे प्रमाणपत्र सादर केल्याप्रकरणी त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.
पूजा खेडकरने कोर्टात अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी अर्ज केला होता. बुधवारी याप्रकरणाची सुनावणी पार पडली. त्यानंतर आता पूजा खेडकरचा अटकपूर्व जामीन अर्ज कोर्टाने फेटाळून लावला आहे. त्यामुळे तिला आता कधीही अटक होऊ शकते, असं सांगण्यात येत आहे.
याशिवाय बुधवारी यूपीएससीने पूजा खेडकरची उमेदवारी रद्द केली आहे. तसेच भविष्यात पूजा खेडकरला कुठलीही युपीएससीची परीक्षा देता येणार नसल्याचेही यूपीएससीने म्हटले आहे. नागरी सेवा परिक्षा नियम २०२२ नुसार पूजा खेडकर यांना दोषी ठरवण्यात आले असून त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. दरम्यान, आता कोर्टानेही पूजा खेडकरला दणका दिला आहे.