उत्तर भारतात पावसाचा हाहाकार

09 Jul 2024 14:49:39

UP
 
नवी दिल्ली : जूनमध्ये विश्रांती घेतल्यानंतर जुलै महिन्याच्या दुसर्‍या आठवड्यात पावसाने धुवाधार बरसात सुरू केली आहे. आसाम, बिहार, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये कहर केला असून मुंबईसह महाराष्ट्रात मुसळधार पाऊस सुरू आहे. तसेच, पुढेही पाऊस वाढण्याचा इशारा देण्यात आला आहे. उत्तराखंडमधील सर्व नद्यांना उधाण आले आहे. अनेक ठिकाणी भूस्खलनाच्या घटना घडत आहेत. 90 पेक्षा अधिक छोटे-मोठे रस्ते बंद आहेत. उत्तराखंडमध्ये वाहने आणि दुचाकी वाहात आहेत. बिहारमध्ये तर याहून भीषण परिस्थिती असून पावसाचा सर्वाधिक कहर उत्तराखंडमध्ये झाला आहे.
 
पावसामुळे चारधाम यात्रा तात्पुरती थांबवण्यात आली आहे. शनिवार, दि. 6 जुलै रोजी कर्णप्रयागच्या चटवपीपल भागात भूस्खलनात हैदराबादमधील दोन यात्रेकरूंचा मृत्यू झाला. उत्तराखंडमध्ये अलकनंदा, मंदाकिनी, काली आणि गंगा यांसह सर्व नद्यांना उधाण आले आहे. नद्यांच्या आसपास राहाणार्‍यांना सुरक्षित स्थळी जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मोठा धोका लक्षात घेता आपत्तीव्यवस्थापन आणि आपत्तीनियंत्रण कक्षातील सर्व अधिकारी व कर्मचार्‍यांच्या सुट्या रद्द करण्यात आल्या आहेत. एसडीआरएफ आणि एनडीआरएफ टीम 24 तास ‘अलर्ट मोड’वर आहेत.
उत्तर प्रदेश-बिहारमध्येही नद्यांचे उग्र रुप
हवामान खात्याने पाच राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा दिला असून, त्यामुळे येत्या काही दिवसांत पुराचा धोका आणखी वाढू शकतो. कारण, उत्तर प्रदेशातील बहुतांश नद्या धोक्याच्या चिन्हाजवळ आल्या आहेत. काही ठिकाणी पुरासारखी परिस्थिती आहे. ‘बिहारचे दुःख’ म्हणून ओळखली जाणारी कोसी नदी धोक्याच्या पातळीवर वाहात आहे. उत्तर प्रदेशमध्येही अनेक नद्यांना उधाण आले आहे.
आसाममध्ये पुराचा कहर आसामला भीषण पुराचा तडाखा बसला आहे. आसाममधील 29 जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी आणि पुरामुळे 22 लाख लोक प्रभावित झाले आहेत. आतापर्यंत 78 जणांचा मृत्यू झाला आहे. ब्रह्मपुत्रेसह राज्यातील अनेक प्रमुख नद्या धोक्याच्या चिन्हावरून वाहात आहेत.
पुणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूरात ‘रेड अलटर्’
सातारा, कोल्हापूर परिसरातील घाटमाथ्यावर ‘रेड अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. तर, हवामान विभागाने मुंबईला ‘ऑरेंज अलर्ट’ दिला आहे. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रातही जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. हवामान विभागाचे प्रमुख के.एस. होसाळीकर यांनी ही माहिती दिली. रत्नागिरी, सिंधुदुर्गला ‘रेड अलर्ट’ घोषित करण्यात आला आहे. पुणे आणि सातारा जिल्ह्यासाठीदेखील हवामान खात्याचा ‘रेड अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.
विदर्भाला ‘यलो अलर्ट’चा इशारा
पुढील 24 तासांत पश्चिम विदर्भातील अकोला, अमरावती, यवतमाळसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला आहे. नागपूर हवामान विभागाने हा अलर्ट जारी केला. तसेच, विदर्भातील इतर जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. काजळी अर्जुना कोदावली, शास्त्री, मुचकुंदी नद्या इशारा पातळीवर आहेत. हवामान विभागाने जिल्ह्यासाठी ‘ऑरेंज अलर्ट’ दिला आहे. जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली.
  
Powered By Sangraha 9.0