'त्या' वेळी मुख्यमंत्र्यांच्या मुलावर कारवाई का झाली नाही? नितेश राणेंचा सवाल

09 Jul 2024 19:11:31
 
Nitesh Rane
 
मुंबई : वरळी हिट अँड रन प्रकरणातील आरोपी कुणाचाही मुलगा असला तरी त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा भाजप आमदार नितेश राणेंनी दिला आहे. तसेच महाविकास आघाडी सरकारच्या काळात मुख्यमंत्र्यांच्या मुलावर कारवाई का झाली नाही? असा सवालही त्यांनी केला.
 
नितेश राणे म्हणाले की, "महायूती सरकारच्या काळात हिट अँड रनची दोन प्रकरणे झालीत. या दोन्ही प्रकरणांमध्ये आरोपी कोण आहे, किती श्रीमंत आहे, कुठल्या पक्षाचा आहे, कुणाचा मुलगा आहे या गोष्टी न बघता महायूती सरकारने कायद्याला धरून पूर्ण कारवाई केली आहे. वरळीच्या हिट अँड रन प्रकरणातील आरोपी कुणाचाही मुलगा असला तरी कुठलीही दयामाया दाखवली जाणार नाही. त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येईल."
 
हे वाचलंत का? -  वैनगंगा-नळगंगा प्रकल्प मार्गी लागणार! उपमुख्यमंत्री फडणवीसांनी घेतली राज्यपालांची भेट
 
"पण महाविकास आघाडीच्या काळात असे गुन्हे घडले असताना एवढी कडक कारवाई झाली होती का? दिशा सालियान आणि सुशांतसिंग राजपूतचा खून झाला असता तेव्हाच्या मुख्यमंत्र्यांच्या मुलावर आरोप झाला होता. पण त्याच्यावर कुठलीही कारवाई झाली नाही तर त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला गेला. आता हे लोकं आमच्यावर टीका करत आहेत मग त्यावेळी अशीच तत्परता का दाखवली नाही?," असा सवाल त्यांनी केला.
 
ते पुढे म्हणाले की, "कोल्हापूरचे इतिहासकार इंद्रजित सावंत वाघनखांवर टीका टिपण्णी करण्याचं काम करत आहेत. पण जर महाविकास आघाडीच्या सरकारने जर वाघनखं आणली असती तर इंद्रजित सावंतांनी हीच भूमिका घेतली असती का? ते कुणाबरोबर बसतात, उठतात याची चांगली कल्पना मला आहे."
 
"विशालगडावर जे इस्लामीकरण सुरु आहे त्यावर इंद्रजित सावंत कधीच बोलताना दिसले नाहीत. त्यांनी वाघनखांबाबत एवढी तळमळ दाखवली. पण महाराजांच्या किल्ल्यावर जे दर्गे बांधले जात आहेत त्यावर ते कधीच बोलताना दिसत नाहीत. महाविकास आघाडीचे लोक उद्या हेसुद्धा म्हणतील की, महाराजांचे किल्ले हे औरंग्याने बांधले आहेत. त्याचेसुद्धा पुरावे मागतील," असेही ते म्हणाले.
 
 
 
Powered By Sangraha 9.0