बंगालमध्ये अन्सार-अल-इस्लाम ही दहशतवादी संघटना सक्रिय? ३ दहशतवाद्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

09 Jul 2024 15:27:16
 Bangladesh ansar
 
कोलकाता : बांगलादेशची दहशतवादी संघटना 'अन्सार-अल-इस्लाम' पश्चिम बंगालमध्ये सक्रिय असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या परदेशी दहशतवादी संघटनेने येथे 'शहीद मॉड्यूल' तयार केले आहे. आपसात संवाद साधण्यासाठी दहशतवादी अशा ॲप्सचा वापर करतात जे सुरक्षा यंत्रणांच्या रडारवर लवकर येत नाहीत. या मॉड्यूलमध्ये अधिकाधिक दहशतवाद्यांचीही भरती केली जात असल्याची माहिती समोर आली आहे.
 
कोलकाता पोलिसांच्या एसटीएफ (स्पेशल टास्क फोर्स) ने हा खुलासा केल्याचे सांगण्यात आले आहे. एसटीएफने अन्सार-अल-इस्लामच्या तीन दहशतवाद्यांना अटक केली आहे, ज्यांनी चौकशीदरम्यान त्यांचे धोकादायक मनसुबे उघड केले आहेत. पश्चिम बंगाल पोलिसांच्या कोलकाता एसटीएफने दि. २२ जून २०२४ रोजी मोहम्मद हबीबुल्ला नावाच्या दहशतवाद्याला अटक केली होती. हबीबुल्लाला वर्धमान जिल्ह्यातून पकडण्यात आले.
 
हबीबुल्ला हा 'शहीद मॉड्युल'चा प्रमुख असल्याचे सांगितले जाते. कोलकाता एसटीएफ अनेक दिवसांपासून यावर लक्ष ठेवून होते. चौकशीदरम्यान, हबीबुल्लाहने त्याच्या धोकादायक योजनांव्यतिरिक्त त्याच्या टोळीतील साथीदारांची नावेही उघड केली. हबीबुल्लाच्या वक्तव्याच्या आधारे, एसटीएफने दि. २५ जून रोजी हरेज शेख आणि दि. २८ जून रोजी अन्वर शेखला अटक केली होती.
 
हरेज शेख याला हावडा जंक्शन येथून तर अन्वर शेखला चेन्नई येथून पकडण्यात आले. या तिघांच्या चौकशीत हे सर्वजण पश्चिम बंगालमध्ये अंसार-अल-इस्लाम या बांगलादेशी दहशतवादी संघटनेचे जाळे निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचे समोर आले आहे. येथे ते त्याचे 'शहीद मॉड्युल' तयार करत होते, ज्यासाठी तरुणांची मोठ्या प्रमाणावर भरती केली जात होती. सुरक्षा यंत्रणांची नजर चुकूवण्यासाठी या सर्व आरोपींनी टेलिग्रामसह इतर काही ॲप्सचा वापर संवादासाठी केला ज्याचा सहज शोध लावला जाऊ शकत नाही.
 
अंसार अल इस्लाम हा बांगलादेशातील प्रतिबंधित दहशतवादी गट आहे. या संघटनेशी संबंधित लोकांना बांगलादेशमध्ये अल्पसंख्याक आणि लष्करी दलांवरील हल्ल्यांसह इतर अनेक दहशतवादी आणि गुन्हेगारी आरोपांचा सामना करावा लागला आहे. अलीकडे, जून २०२४ मध्ये बांगलादेश पोलिसांनी या दहशतवादी संघटनेच्या तीन सदस्यांना कॉक्स बाजार येथून अटक केली होती. मोहम्मद झकारिया, मोहम्मद नियामत उल्लाह आणि मोहम्मद ओझैर अशी त्यांची नावे आहेत. या सर्वांचे वय २० वर्षे आहे. या टोळीचे लोक अफगाणिस्तानात कार्यरत असलेल्या तालिबानला आपला आदर्श मानतात.
 
 
Powered By Sangraha 9.0