‘टोमॅटो’ दराची पुन्हा उसळी

09 Jul 2024 13:12:13

Tomato
 
नवी मुंबई : मागील तीन आठवडे दरवाढ होऊन 30-45 रुपयांवर स्थिर झालेल्या टोमॅटोच्या दराने गेल्या दोन दिवसांत पुन्हा एकदा उसळी घेतली आहे. घाऊक बाजारात टोमॅटाचे दर आता प्रतिकिलो 40 ते 60 रुपयांवर गेला आहे. किरकोळ बाजारात 80 ते 100 रुपये प्रतिकिलो दराने टोमॅटो विकला जात आहे. मागील वर्षीप्रमाणे यंदाही टोमॅटो उच्चांकी दर गाठणार का, अशी चिंता सर्वसामान्य गृहिणींना वाटत आहे.
 
पावसामुळे टोमॅटो खराब होत असल्याने शेतातून टोमॅटोचे उत्पादन घेण्यास अडचणी येत आहेत. त्यामुळे बाजारात सध्या टोमॅटोची आवक घटली आहे. महाराष्ट्रात सातारा, सांगली आणि संगमनेर तर बंगळुरुमधून टोमॅटो दाखल होतो. परंतु, वाशीमधील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजीपाला बाजारात राज्यातील टोमॅटो दाखल होत असताना बंगळुरुमधून होणारी टोमॅटोची आवक पूर्णतः बंद झाली आहे. एपीएमसी भाजीपाला बाजारात आधी 40 ते 50 गाड्या होत असलेली टोमॅटोची आवक आता कमी झाली आहे.
 
20 ते 30 गाड्यांमधून 1 हजार, 733 क्विंटल टोमॅटोची आवक होत आहे. एपीएमसी भाजीपाला बाजारातच टोमॅटो कमी प्रमाणात दाखल होत आहेत. परिणामी आवक कमी आणि मागणी जास्त यामुळे टोमॅटोच्या दरात वाढ झाली आहे. घाऊक बाजारातच 40-60 रुपये प्रतिकिलो या दराने टोमॅटोची विक्री होत आहे. तर किरकोळ बाजारात 80-100 रुपये प्रतिकिलो दराने टोमॅटोची विक्री होत आहे.
काही दिवस टोमॅटोचे दर चढेच राहातील
दरम्यान, एपीएमसी भाजीपाला बाजारातच टोमॅटोची आवक कमी राहिली, तर यापुढे काही दिवस टोमॅटोची दर असेच चढे राहातील.
- तानाजी चव्हाण, भाजीपाला व्यापारी
खर्चाचा ताळमेळ साधताना गृहिणींची तारेवरची कसरत
मागील वर्षी किरकोळ बाजारात टोमॅटोचे दर प्रतिकिलो 180 ते 200 रुपयांवर गेले होते. आतादेखील दरात वाढ होऊन टोमॅटोचे दर प्रतिकिलो 80 ते 100 रुपयांवर गेले आहेत. त्यामुळे एकीकडे कांदा, बटाटा, लसूण यांचे दर वाढलेले असताना आता टोमॅटोचे दरदेखील वाढत चालले आहेत. त्यामुळे खर्चाचा ताळमेळ साधताना गृहिणींना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
- शर्मिला पाटील, गृहिणी, घणसोली
 
Powered By Sangraha 9.0