‘संकटग्रस्त’ खरचुडीचे कंद खावेत का ?

08 Jul 2024 10:09:34
iucn red listed maharashtra       (छायाचित्र - आकाश राऊत)

‘इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झर्वेशन ऑफ नेचर’ म्हणजेच ‘आययूसीएन’च्या ‘वेस्टर्न घाट प्लांट स्पेशालिस्ट ग्रुप’ने ‘खरचुडी’ म्हणजेच ‘कंदीलपुष्प’ या नावाने सुपरिचित असलेल्या वनस्पतीच्या महाराष्ट्रात आढळणार्‍या काही प्रजातींना नुकतेच ‘संकटग्रस्त’ म्हणून घोषित केले (iucn red listed maharashtra's ceropegia species). परिणामी अधिवास नष्टता आणि हंगामी खाद्य म्हणून वापरल्यामुळे नामशेष होण्याच्या वाटेवर असलेल्या या वनस्पतीच्या संवर्धनाची नितांत गरज निर्माण झाली आहे,त्याविषयी आढावा मांडणारा हा लेख... (iucn red listed maharashtra's ceropegia species)


मुंबई (अक्षय मांडवकर) - 'धरिला वृथा छंद, नव्हतेच जर फुल, कोठून मकरंद?’, या मंगेश पाडगावकरांच्या गीतासारखी काहीशी अवस्था आता कंदीलपुष्पाच्या पराग-वाहकांची झाली असेल. या मागचे कारण म्हणजे कंदीलपुष्पाच्या प्रजातींसमोर ’नामशेष’ होण्याचे आलेले संकट. उत्क्रांती हे जीवसृष्टीच्या विकासाचे सूत्र आहे. प्रत्येक सजीवामधील रचनेचा बदल हा या उत्क्रांतीचा स्थायीभाव. सह्याद्रीमधील दुर्मीळ होत असलेल्या कंदीलपुष्प अर्थात ’सेरोपेजिया’ या वनस्पतीची विचित्र रचनेची फुलं हे या उत्क्रांतीमधील बदलाचे साक्षीदार आहेत. नव्या प्रजातीने नवीन आव्हान पेलावीत, या सूत्रानुसार निसर्गानेच रचनेमधील विचित्र ठेवण या फुलांना बहाल केली आहे. कंदीलपुष्प नावाची ही फुलं आपल्याला फारशी परिचित नसली तरी या फुलांचा आकार या नावाला सार्थ ठरवतो. केवळ पावसाळी हंगामात भूमीच्या उदरात लपलेल्या कंदामधून कंदीलपुष्पाच्या वेली अंकुरित होतात. ’अ‍ॅसक्लेपिएडेसी’ म्हणजेच रुईच्या कुळात या वनस्पतीचा समावेश होतो.  (iucn red listed maharashtra's ceropegia species)
 
 
महाराष्ट्रात कंदीलपुष्पाच्या २६ प्रजाती सापडतात. त्यातील १७ प्रजाती या प्रदेशनिष्ठ आहेत. जगात कंदीलपुष्पाच्या प्रदेशनिष्ठतेसाठी महाराष्ट्राचा प्रथम क्रमांक लागतो. यातल्या बहुतेक जाती दुर्मीळ असून काहींचं अस्तित्व आता धोक्यात आले आहे. ’भारतीय वन्यजीव संरक्षण कायद्या’अंतर्गत तिसर्‍या श्रेणीत या वनस्पतीच्या प्रजातींना संरक्षण देण्यात आले आहे. बोलीभाषेत या वनस्पतीला ’खरचुडी’, ’खरपुडी’, ’खरचुला’, ’खातूंडी’ किंवा ’हनुमान बटाटा’ अशी नावे आहेत. कंदीलपुष्पाच्या फुलांचे मनमोहक आकार आणि सुरेख वैशिष्टयपूर्ण रचनेची ठेवण ही सर्वांचे लक्ष वेधून घेते. मेणबत्ती ठेवण्याच्या किंवा जुन्या दिवाबत्ती स्टँडच्या आकाराची आणि विविध रंगसंगती असणारी ही फुले लक्षवेधी ठरतात. या फुलांची अशी रचना परागीभवन करण्यासाठी येणार्‍या कीटकांना सापळ्यासारख्या आकाराने अडकवून आपले ईप्सित साध्य करण्यासाठी उत्क्रांत झाली आहे. फुलांची हीच आकर्षक रचना आणि जमिनीखाली दडलेला त्याचा कंद हा आता काही अतिउत्साही लोकांमुळे केंद्रस्थानी आला आहे. त्यामुळे या कंदीलपुष्पांच्या काही प्रजाती या नामशेष होण्याच्या दिशेने प्रवास करू लागल्या आहेत.  (iucn red listed maharashtra's ceropegia species)
 
 
परागीभवनाची प्रक्रिया
कंदीलपुष्पाच्या नळीच्या आकाराच्या पाकळ्यांमुळे त्यावर नक्षीदार कळस तयार होतो. या कळसामुळे पावसाचे पाणी आत फुलांमध्ये शिरत नाही. कळसावरील दोन पाकळ्यांमध्ये कमानीसारख्या खिडक्या असतात. या कमानींवरील केस कीटकांना आकर्षित करतात. नळीतील केसांना दाबून हा कीटक खालच्या फुगीर गर्भगारात उतरतो. या गर्भगारातील केसरांभोवती महिरपीचा मुकुट असतो. केसांमुळे कीटक गर्भागारात अडकला जातो. कमानींमधून येणारा प्रकाश आणि मुकुटांच्या दिशेने कीटक ये-जा करत असल्याने त्यामधील परागाची देवाणघेवाण होते. ही देवाणघेवाण झाल्यावर कंदीलपुष्पाची फुलं उलटी लोंबकळतात. गर्भगारातील केस मऊ पडल्याने कीटकाची त्यातून सुटका होते.
 
 
कंदीलपुष्पाचे रोपण शक्य?
कंदीलपुष्पाच्या काही प्रजातींचे खासकरून प्रदेशनिष्ठ प्रजातींचे कृत्रिम संवर्धन करणे अवघड काम आहे. एखाद्या प्रजातीचा कंद बागेमध्ये लावल्यास त्याला पान-फुलं धरतील, मात्र पराग-वाहकांच्या चोखंदळ निवडीमुळे त्यांचे परागीभवन होणार नाही. परागीभवन न झाल्यामुळे त्याला फळ आणि बिया धरणार नाहीत. त्यामुळे कंदीलपुष्पाचे रोपण फारसे यशस्वी होत नाही. अधिवास संवर्धन हीच बाब कंदीलपुष्पाच्या प्रदेशनिष्ठ प्रजातींना संवर्धित करू शकते. कंदीलपुष्पाच्या नैसर्गिक वाढीच्या जागांचे जतन करणे आणि ग्रामीण भागातील लोकांना कंद खाण्यापासून परावृत्त करणे आवश्यक आहे.
 
 
प्रदेशनिष्ठता
’सेरोपेजिया अंजनेरिका’ ही प्रजात केवळ नाशिकमधील अंजनेरी पर्वतावर आढळते. ऑगस्ट ते सप्टेंबरदरम्यान तिला फुलोरा येतो. त्याचे फुल हे 3 सेंटीमीटर वाढते. ते हिरव्या रंगाचे असते. ’सेरोपेजिया मोहनरामी’ ही प्रजातदेखील जगात केवळ वेंगुर्ला तालुक्यातील एकाच किनारी सड्यावर आढळते. या प्रजातीचीदेखील 40 ते 40 रोपं शिल्लक राहिली आहेत. ’सेरोपेजिया अनंती’ ही प्रजातदेखील सिंधुदुर्गातील सालव्याचा डोंगर परिसरातच आढळते. महाबळेश्वरमध्ये सापडणारी ’सेरोपेजिया पंचगणीएन्सिस’ ही प्रजातदेखील अत्यंत दुर्मीळ असून तिच्या तुरळक नोंदी उपलब्ध आहेत.
 
 
'सिटीझन सायन्स’ची गरज
दुर्मीळ झालेल्या कंदीलपुष्पाच्या प्रजातींचा शोध घेण्यासाठी आता निसर्गप्रेमी नागरिकांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे. रानावनात ट्रेकच्या निमित्ताने फिरणार्‍या निसर्गप्रेमींनी या प्रजातींच्या नोंदी घेऊन त्या शास्त्रज्ञांपर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे. ’सिटीझन सायन्स’ ही संकल्पना त्यासाठीच तयार करण्यात आली आहे. ’इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झर्वेशन ऑफ नेचर’ने (आययूसीएन) कंदीलपुष्पांच्या केलेल्या मूल्यांकनामध्ये प्रतीक मोरे, डॉ. शार्दुल केळकर, मयूरेश कुळकर्णी, आकाश राऊत, सागर कुलकर्णी यासारख्या निसर्गप्रेमींनी कंदीलपुष्पांच्या केलेल्या नोंदी महत्त्वपूर्ण ठरल्या आहेत.


धोके
कंदीलपुष्पांना पावसाळ्यात जुलै ते ऑगस्ट महिन्यांत फुले येतात. याच काळात ट्रेकर मंडळीसुद्धा मोठ्या प्रमाणात दुर्गम वाटा, गड, किल्ले पाहत फिरत असतात. सुंदर फुले दिसली म्हणून त्यांनी वेल तोडून आणल्याच्या घटना यापूर्वी घडलेल्या आहेत. लहान रानवाटांवरची वर्दळसुद्धा बर्‍याच वेळेला अशा वनस्पतींना धोकादायक ठरते. काही वनस्पतीप्रेमी आपल्या बागेत लावण्यासाठी कंदीलपुष्पे तोडून आणणात. दुर्दैवाने याठिकाणी वनस्पतीचे परागीभवन करणारे कीटक उपलब्ध न झाल्याने आणि यातील काही प्रजाती कारवीबरोबर सहसंबंध निर्माण करून वाढत असल्याने त्या बाहेरील अधिवासात टिकत नाहीत.
 
 
कंद खाऊ नका !
कंदीलपुष्पाच्या कंदात स्टार्च मोठ्या प्रमाणात असल्याने खाण्यासाठी यांचा वापर प्राणी, स्थानिक लोक आणि आदिवासी करतात. गेल्या काही दिवसांत सोशल मीडियावरसुद्धा एक नवीन ट्रेंड पाहायला मिळत आहे. रानावनात जाऊन रानटी किंवा ग्रामीण जीवनशैलीचे समर्थन करताना रानभाज्या, वेली, कंद खाण्याचे सल्ले मोठ्या प्रमाणावर दिले जातात. रानभाज्या म्हणून वापरल्या जाणार्‍या बहुतांश प्रजाती या सर्वसाधारण गटात मोडत असल्याने आणि त्या भरपूर प्रमाणात उगवत असल्याने त्या खाल्ल्याने फारसे प्रश्न निर्माण होत नाहीत. परंतु, कंदीलपुष्पांचे कंद खास मुद्दामहून जाऊन शोधून खाणे आणि ते खाण्यास इतरांनाही उद्युक्त करणे, हे या संकटग्रस्त वनस्पतीला अजून धोक्यात टाकणारे आहे. आदिवासी, धनगर, गुराखी बर्‍याच वेळेला रानावनात हिंडत असताना भूक लागल्यास या कंदांचा खाण्यासाठी वापर करतात. परंतु, आता या प्रजाती संकटग्रस्त झाल्याने आणि यांचा प्रसार फार वेगाने होत नसल्याने याविषयी जनजागृती करणे गरजेचे आहे. - प्रतीक मोरे, कंदीलपुष्प निरीक्षक



Powered By Sangraha 9.0