'भाबरी’ची कथा आणि व्यथा !

08 Jul 2024 10:22:41
bhabari


सातपुड्याच्या कुशीत वसलेल्या ‘भाबरी’ (bhabari) या दुर्गम गावातील गावकर्‍यांनी अधिवास संवर्धनासाठी केलेल्या प्रयत्नांची आणि त्यांना जाणवणार्‍या समस्यांची घेतलेली दखल...(bhabari)


मुंंबई (डाॅ. सीमा खोत) - 'भाबरी’ (bhabari) हे सुमारे ३०० उंबर्‍यांचं, सातपुड्याच्या डोंगररांगांतील ’शुलपाणी झाडीत’ वसलेले एक छोटंसं आदिवासी गाव. सर्वस्वी निसर्गावर अवलंबून जगणारे, स्वातंत्र्याचे पाऊण शतक उलटून गेल्यावरही विजेच्या तारा न पोहोचलेले हे गाव. वस्ती सगळी पावरा जमातीची. मात्र, हे गाव असलेल्या परिसराला ’शुलपाणी झाडी’ हे नाव कसं? हा प्रश्न पडावा असा अत्यंत दुर्गम प्रदेश. जिकडे नजर जाईल तिकडे उघडे बोडके डोंगर. सावली देणारे झाड दूरदूरपर्यंत दिसत नाही. असलीच कुठे, तर खुरटी झुडपे आणि दूरवर दिसणारी नर्मदा नदी. (bhabari)
  
कोणे एके काळी नाही, तर अगदी २०-२५ वर्षांपूर्वी येथे घनदाट वृक्षराई होती, असे इथले वयोवृद्ध सांगतात. मात्र, अनिर्बंध चालवलेल्या कुर्‍हाडीने सारे चित्र बदलले. हिरव्यागार परिसराचे वैराण वाळवंट झाले. आपल्या मुळांनी माती घट्ट धरून ठेवणारी झाडे नाहीशी झाली आणि जिकडे तिकडे डोंगरातली माती ढासळू लागली. पावसाच्या पाण्याने खाली वाहत येऊन ओढ्यानाल्यात साठली. परिणामी, ओढ्यात पाणी जिरण्याचे प्रमाण कमी झाले, त्यातले नैसर्गिक झरे बुजले आणि पाऊस संपताच ओढे, नदी, नाले कोरडे पडू लागले. पाण्याचे दुर्भिक्ष सुरू झाले. जो डोंगर एक वेळ चढून जाताना, आपली दमछाक होते, ऊर धपापतो, अशा डोंगरदर्‍यातून बायाबापड्या, मुलंबाळं पाण्याच्या कळशा, घागरी घेऊन वणवण फिरु लागले. झाडे गेली, त्यांना अडवणारे पाऊस पडणारे ढग गेले, शेतीवर परिणाम होऊ लागला.
 
 
हे सारे विदारक चित्र, पुण्यातील एक अभियंते प्रशांत कुलकर्णी यांनी त्यांच्या नर्मदा परिक्रमेदरम्यान पाहिले. ’भाबरी’ गाव आणि परिसरात होळीच्या सणादरम्यान त्यांचा काही दिवसांचा मुक्काम घडला. याचा सदुपयोग त्यांनी तिथल्या तरुणांचे प्रबोधन करण्यासाठी केला. जेमतेम पाच टक्के साक्षरता असलेल्या ’भाबरी’ गावातील एक पावरा तरुण दिनेश फोदला पावरा, बी.ए.पर्यंत शिक्षण घेतलेला. अत्यंत उत्साही, नवीननवीन गोष्टी आत्मसात करण्यासाठी धडपडणारा. गावाच्या झालेल्या दुर्दशेची कारणे कुलकर्णी यांच्याशी सततच्या झालेल्या चर्चेतून समजून घेतली आणि तो कामाला लागला. सुदैवाने त्याच्या सर्व कुटुंबीयांनीही हे समजून घेतले. दिनेश, जानेवारी २०२४ मध्ये पुण्यात आला. जाताना पुण्यातील वृक्षमित्र महेश कुलकर्णी यांनी दिलेल्या विविध देशी झाडांच्या पोतंभर बिया घेऊन ’भाबरी’ला पोहोचला. दिनेशचे कुटुंब भले मोठे. घरातली लहान पोरेटोरे कामाला लागली. त्यांनी शेंगा फोडल्या. बिया वेगवेगळ्या केल्या. काही रोपांसाठी बाजूला काढल्या, तर काही बीजगोळे तयार करण्यासाठी. बीजगोळे का? तर अत्यंत दुर्गम आणि लांबवरच्या जागी जेथे प्रत्यक्ष जाऊन रोपं लावणे शक्य नाही तेथे टाकण्यासाठी. गावातले आजूबाजूचे सगळे बाळगोपाळ जमले. जमेल तशी मदत करू लागले. दरम्यान, प्रशांत कुलकर्णी यांनी आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून, वाचकांना मदतीचे आवाहन केले. लोकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला.
 
 
इकडे ’भाबरी’ गावात खड्डे खणण्याचे तसेच झाडांसाठी बांबूचे सुंदर पिंजरे तयार करण्याच्या कामाला सुरुवात झाली. महाराष्ट्राच्या वनविभागाने सहकार्य केले. सुमारे ७०० रोपे राणीपूर येथील वन विभागाच्या रोपवाटिकेतून मिळाली. १०० किलोमीटरचा प्रवास करून, पोहोचलेल्या रोपांचे स्वागत करण्यासाठी सगळे लहानथोर जमले होते. काहीतरी नवीन घडतं आहे, याचा आनंद सगळ्यांच्या विशेषत: लहानग्यांच्या चेहर्‍यांवर ओसंडून वाहत होता. गाडीतून रोपे उतरवून व्यवस्थित लावून ठेवण्यात आली. ही सगळी व्यवस्था लावण्यासाठी प्रशांत कुलकर्णी स्वतः जातीने हजर राहिले. पावसाला सुरुवात होताच प्रथम मुलांच्या हस्ते बीजगोळे ठिकठिकाणी टाकण्यात आले आणि नंतर प्रत्यक्ष वृक्षारोपणाला सुरुवात झाली. अगदी अडीच ते तीन वर्षांचे बाळही एकेक रोपाची पिशवी उचलून खड्ड्याजवळ नेऊन ठेवतानाचे दृश्य अचंबित करणारे होते. मात्र, याहून अधिक धक्कादायक होते ते यातले कुठलेच मूल हे शाळेत न जाणे. ’भाबरी’ गावात बालवाडी, प्राथमिक शाळा तर नाहीच पण कागदोपत्री असलेली धावडीपाडा-भाबरी ही अंगणवाडीही कार्यरत नाही. गावकर्‍यांकडे अधिक चौकशी करता, गावात अंगणवाडीतील सेविका आणि मदतनीस यांची स्थानिक म्हणून नेमणूक झालेली असूनही त्या गावात उपस्थित नसतात आणि फक्त महिन्यातून एक किंवा दोन वेळेस वरिष्ठ अधिकारी येतात, त्यादिवशी त्या हजर असतात असे समजले. एक ते सहा वर्षांची एकूण ८८ मुले एका पाड्यात आहेत. आरोग्य, पोषण आणि शिक्षण या बाल्यावस्थेतील आवश्यक गोष्टीपासून ही मुले वंचित आहेत.
 
 
अंगणवाडीच्या या समस्येबाबत ग्रामस्थांनी अनेकदा पंचायतीमध्ये तोंडी तक्रारी केल्याचे समजते. गावातच राहणार्‍या आणि एस.एस.सी. उत्तीर्ण झालेल्या दोन महिला असून त्यांची नेमणूक अंगणवाडीवर केली जावी तसेच गावात न राहणार्‍या व कायम गैरहजर राहणार्‍या सेविकांची अन्यत्र बदली केली जावी, अशी मागणी गावकर्‍यांची आहे. या मुलांचा शारीरिक, बौद्धिक आणि सामाजिक विकास होऊन त्यांना मुख्य प्रवाहात सामील होण्यासाठी हे आवश्यक आहे. गाव आणि शहर ही दरी नष्ट करण्याचे हे प्रयत्न अशाच मार्गांनी व्हावेत म्हणून या लेखाचे प्रयोजन!.
 
 
Powered By Sangraha 9.0