अमरावती - अॅपच्या मदतीने नोंदवले रस्ते अपघातामधील मृत वन्यजीव; ८ महिन्यात ११६ मृत्यू

08 Jul 2024 19:36:44
wildlife roadkill


मुंबई (विशेष प्रतिनिधी) -
अमरावतीच्या 'कूला वाईल्ड फाऊंडेशन'ने जिल्ह्यात रस्ते अपघातात मृत्युमुखी पडणाऱ्या वन्यजीवांची (wildlife roadkill) नोंद अॅपच्या मदतीने केली आहे. तीन वर्षांमध्ये फाऊंडेशनच्या संशोधकांनी नागरिकांच्या मदतीने रस्ते अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या एकूण ३३६ वन्यजीवांची नोंद केली आहे (wildlife roadkill). या कामाची दखल 'युरोपिअन जर्नल ऑफ इकॉलॉजी' या आंतरराष्ट्रीय नियतकालिकाने घेतली असून लवकरच यासंबंधीचा शोध निबंध प्रकाशित होणार आहे. (wildlife roadkill)

अमरावतीमधील 'कूला वाइल्ड फाऊंडेशन' मागील सहा वर्षांपासून रस्ते अपघातात मृत्युमूखी पडणाऱ्या वन्यजीवांच्या निरीक्षणाचे काम करीत आहे.२०१८ मध्ये यासंबंधीची माहिती संकलित करण्यासाठी फाऊंडेशनने 'सिटीजन सायन्स' उपक्रमाअंतर्गत मोबाईल अॅप आणि संकेतस्थळ विकसित केले. त्यानंतर 'ArRM' नावाच्या या मोबाईल अॅपवर प्रत्यक्ष नोंदणीला सुरुवात झाली. २०२१-२०२२ मध्ये, अमरावती जिल्ह्यातील राज्य, राष्ट्रीय, ग्रामीण इ. रस्त्यांचे संपूर्ण जाळे व्यापून १०,००० किमीहून अधिक रस्त्यांचे पद्धतशीर सर्वेक्षण करण्यात आले. संपूर्ण जिल्हा स्तरावर रस्ते अपघातात मृत्युमुखी पडणाऱ्या वन्यजीवांची नोंद करण्याचा हा भारतातील पहिलाच प्रयत्न होता. २०१८ ते २०२२ (२०२०-२१ कोविड काळातील २ वर्षे सोडून) या काळात फाऊंडेशनने नागरिकांच्या मदतीने रस्त्यावर मृत पावलेल्या ३३६ वन्यजीवांची नोंद केली. यामध्ये ७० विविध प्रजातींचा समावेश होता.


२०२१-२२ मध्ये केवळ ८ महिन्यातच या उपक्रमाअंतर्गत रस्त्यावर मृत पावलेल्या ११६ वन्यजीवांची नोंद करण्यात आली. म्हणजेच अंदाजे सरासरी प्रति २ दिवशी १ मृत्यू. यामध्ये तडस, खोकड, कोल्हा, मृदू-कवच कासव, घोरपड, खापरखवल्या, भारतीय करवानक, भारतीय रातवा, जंगली लावा इ. अशा सस्तन, पक्षी, सरीसृप अनेक धोकाग्रस्त प्रजातींचा समावेश आहे. यासंबंधी बोलताना कूला वाइल्ड फाऊंडेशनचे मंदार पावगी यांनी सांगितले की, "रोडकिल्सचे दस्तऐवजीकरण करणे आणि रोडकीलची माहिती सहज उपलब्ध होईल असा नकाशा तयार करणे, हे आमच्या प्रकल्पाचे उद्दिष्ट आहे. ही वेबसाइट आणिमोबाइल अॅपमधून निर्माण होणार डेटा रस्त्यांवर मारल्या जाणाऱ्या वन्यप्राण्यांची संख्या कमी करण्यासाठी प्रभावी उपाययोजना आखण्यात मदत करेल." यासंबंधीचा संशोधन निबंध मंदार पावगी, डॉ. योगेश जोशी, डॉ. सावन देशमुख, अनुप पुरोहित आणि केदार पावगी यांनी तयार केला आहे.

Powered By Sangraha 9.0