बेलापूरात लोकल पकडताना महिला पाय घसरुन रुळांवर पडली

08 Jul 2024 19:14:21

vashi
 
नवी मुंबई : नवी मुंबईत वाशी, बेलापूर, नेरुळ याभागात रात्रभर कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे लोकलसेवा विस्कळीत झाली होती. सोमवार दि.८ रोजी पनवेलवरून ठाण्याकडे जाणारी लोकल सकाळी नऊच्या दरम्यान बेलापूर सीबीडी रेल्वे स्टेशन येताना एक महिला पाय घसरून रुळावर पडली. तिच्या अंगावर रेल्वेचा पहिला महिला डब्बा गेला. त्यामुळे प्रवाशी आणि रेल्वे प्रशासनाची तारांबळ उडाली. मात्र रेल्वे आणि पोलिस प्रशासनाने काही वेळात रेल्वे मागे घेऊन तिचा जीव वाचवला. पण महिलेचे दोन्ही पाय वाचू शकले नाही.
 
नवी मुंबई, कल्याण, ठाणे, डोंबिवली भागांमध्ये पावसाची संततधार सुरु आहे. याचा परिणाम मध्य रेल्वेची लोकल सेवा आणि ट्रान्स हार्बर लोकल सेवेवरही झाला आहे. मध्य आणि हार्बर मार्गावरची वाहतूक उशिराने होत आहे. त्यामुळे कल्याण, डोंबिवली, ठाणे, घाटकोपर, दादर या स्थानकांवर मोठ्या प्रमाणात गर्दीही झाली. अशीच परिस्थिती नवी मुंबईतल्या स्थानकांवरही आहे. याच पावसात एक महिला रुळावरुन खाली पडली आणि तिच्या अंगावरुन ट्रेन गेली.
 
या घटनेत तिचा जीव वाचला आहे पण तिला दोन्ही पाय गमवावे लागले आहेत. महिलेला लोकल ट्रेनच्या मोटरमनने या महिलेला रुळावरून बाहेर काढले आणि नंतर तिला एमजीएम हॉस्पिटल, बेलापूरमध्ये नेले. बेलापूरवरून ठाण्याला जाण्यासाठी रेल्वे नसल्यामुळे प्रवाशांनी रेल्वे पकडण्यासाठी गर्दी केली होती. यागर्दीत महिलेचा पाय घसरून रेल्वे रुळावर पडली आणि तिच्या अंगावरून रेल्वेचा पहिला डब्बा गेला.
Powered By Sangraha 9.0