महाराष्ट्रातील पहिले मोठे भंगार यार्ड ऐरोलीत!

08 Jul 2024 15:47:24
Scrap Yard news
 
मुंबई : मुंबईतील जुन्या आणि प्रदुषणकारी गाड्यांची विल्हेवाट लावण्यासाठी नवीन भंगार यार्ड (स्क्रॅप यार्ड) विकसित करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे. यासाठी ऐरोलीतील जकात नाक्याजवळील जागा पालिकेने जवळपास निश्चित केल्याची माहिती आहे. पालिकेने एक ते दीड महिन्यात इच्छुक कंपन्यांकडून 'रुची प्रस्ताव' मागवण्यात आल्याचे कळते. दरवर्षी अंदाजे ५० हजार वाहने या नवीन भंगार यार्डमध्ये मोडित काढता येतील. महाराष्ट्रातील हे पहिलेच मोठे भंगार यार्ड असेल.

वाहनांच्या वापरानंतर अनेक वाहने रस्त्यांच्या कडेला पडलेली असतात. त्यामुळे वाहतुकीलाही अडथळा निर्माण होतो. दरम्यान अशा वाहनांवर दावा सांगणारा कोणीही पुढे न आल्यास ही वाहने जप्त करून पालिका गोदामात ठेवते. त्यानंतरही मालकाशी संपर्क साधला जातो. मात्र प्रतिसाद न मिळाल्यास ही वाहने भंगार डिलरमार्फत भंगारात काढली जातात. त्यामुळे अशा वाहनांची विल्हेवाट लावण्यासाठी मुंबई महापालिका राज्य सरकारच्या 'स्क्रॅपेज धोरण २०२३'चा आधार घेणार आहे. या धोरणाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार मुंबईतील जुन्या गाड्यांची विल्हेवाट लावण्यासाठी नवीन भंगार यार्ड महापालिका विकसित करणार आहे.

गेल्या काही महिन्यांपासून भंगार यार्डसाठी जागेचा शोध सुरु असून ऐरोली भागातील जकात नाक्याजवळील जागा जवळपास निश्चित झाल्याचे कळते. ही जागा राज्य सरकार पालिकेला भाडे तत्त्वावर देणार आहे. दरम्यान यासंदर्भात सर्व कायदेशीर कार्यवाही पूर्ण करून जागा पालिकेकडे सुपूर्द केली जाईल. यापूर्वी ऐरोलीऐवजी चेंबूरमध्ये जागेचा शोध सुरु होता. पंरतु तिथे डोंगराळ भाग असल्याने भंगार यार्ड होणे अशक्य होते. त्यामुळे मुंबई पार्किंग अॅथोरिटीने ऐरोलीमधील जकात नाक्याची जागा निवडल्याची माहिती आहे.


Powered By Sangraha 9.0