ठरलं! शिरीन, श्रेयस, दिघ्या पुन्हा येणार भेटीला, घडणार ‘पुन्हा दुनियादारी’

08 Jul 2024 14:11:36
 
Punha Duniyadari
 
 
मुंबई : 'एक वेगळीच दुनिया, एक वेगळीच दुनियादारी' घेऊन पुन्हा एकदा अंकुश चौधरी, स्वप्नील जोशी, सई ताम्हणकर आणि संजय जाधव ही जबरदस्त टीम तब्बल अकरा वर्षांनंतर पुन्हा एकदा एकत्र येणार आहे. दुनियादारी या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाचे अधिकृत नाव जाहिर करण्यात आले असून पुन्हा प्रेक्षकांना शिरीन, श्रेयस, दिघ्या यांची मैत्री अनुभवता येणार आहे. 'पुन्हा दुनियादारी’ असे या चित्रपटाचे नाव असून सई ताम्हणकर, अंकुश चौधरी, स्वप्नील जोशी यांची यारी पाहायला मिळणार असून नवा ट्विस्ट नक्कीच असणार आहे.
 
‘पुन्हा दुनियादारी’च्या निमित्ताने निर्मात्या उषा काकडे यांनी अमेय विनोद खोपकर, स्वाती खोपकर आणि निनाद बत्तीन यांच्यासोबत असोसिएशन केले आहे. उषा काकडे यांनी नुकतेच उषा काकडे प्रोडक्शन सुरु केले असून त्या आगामी 'विकी : फुल्ल ऑफ लव्ह' या मराठी चित्रपटाची निर्मिती करत आहेत. 'पुन्हा दुनियादारी' या चित्रपटाचे लवकरच चित्रीकरण सुरु होणार असून या चित्रपटाचे दिग्दर्शक संजय जाधव आहेत. अमेय खोपकर, स्वाती खोपकर, उषा काकडे, नानूभाई जयसिंघानी, निनाद बत्तीन निर्माते आहेत.
 

Punha Duniyadari 
 
दिग्दर्शक संजय जाधव म्हणतात, "शिरीन, श्रेयस, दिघ्या या मैत्रीचा संगम परत 'पुन्हा दुनियादारी' च्या निमित्ताने प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. ११ वर्षांची आतुरता संपत अखेर 'पुन्हा दुनियादारी’च्या चित्रीकरणाला सुरुवात होणार आहे. विविध प्रोजेक्ट्च्या निमित्ताने या सगळ्यांसोबत काम केले. परंतु पुन्हा एकदा या टीमसोबत एकत्र काम करण्याची मजाच और आहे. हे बॉण्डिंग इतके स्ट्रॉन्ग आहे की, त्याचे पडसाद 'पुन्हा दुनियादारी' मध्ये निश्चितच दिसतील. आता यात आणखी काय ट्विस्ट असणार, हे चित्रपट आल्यावरच कळेल. त्यात आता उषा काकडे यांसारख्या निर्मात्या आमच्या या कुटुंबात सहभागी झाल्या आहेत.''
Powered By Sangraha 9.0