फ्रान्समध्ये डाव्यांच्या अनपेक्षित विजयानंतर मोठ्या प्रमाणात हिंसाचार; विजयाच्या उन्मादात हिंसा केल्याचा आरोप

08 Jul 2024 12:09:00
 france
 
पॅरिस : फ्रेंच सार्वत्रिक निवडणुकीत डाव्या आघाडीने विजय मिळवला आहे. डाव्या आघाडीच्या विजयानंतर फ्रान्समध्ये प्रचंड दंगल उसळली असून आंदोलक रस्त्यावर उतरले आहेत. हे आंदोलक दंगल करत आहेत आणि पेट्रोल बॉम्ब टाकून जाळपोळ करत आहेत. दंगलखोरांना रोखण्यासाठी फ्रान्समध्ये कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
फ्रान्समध्ये डाव्या आघाडीचा विजय हा अनपेक्षित होता. या निवडणुकांमध्ये उजव्या आघाडीचाच विजय होईल, असे निवडणुकीपूर्वी सातत्याने मानले जात होते. उजव्या विचारसरणीच्या आघाडीच्या नेत्या मरीन ले पेन पंतप्रधान होतील अशी अपेक्षा होती. मात्र दुसऱ्या टप्प्यातील मतदानानंतर समिकरणे उलटले आणि डाव्या आघाडीला सर्वाधिक जागा मिळवण्यात यश आले.
या फ्रेंच निवडणुकांमध्ये डाव्या आघाडीने ५७७ जागांपैकी सुमारे १८२ जागा जिंकल्या आहेत. दुसरीकडे, फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या रेनेसान्स पार्टीने १६३ जागा जिंकल्या आहेत. तिसऱ्या क्रमांकावर अतिउजवी आघाडी आहे, या आघाडीने १३२ जागा जिंकल्या आहेत. अंतिम निकाल अद्याप जाहीर झालेला नाही.
अंतिम निकाल लागण्यापूर्वीच फ्रान्समध्ये तीव्र हिंसाचाराचे वातावरण आहे. निवडणुकीच्या निकालाच्या ट्रेंडवरून आंदोलकांनी फ्रान्सच्या रस्त्यांवर कब्जा केला आहे. फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये आंदोलकांनी रस्त्यावर वाहने जमा करून त्यांना आग लावली आणि पोलिसांशी चकमक झाली.
दंगलखोरांनी पोलिसांवरही दगडफेक केली. काही ठिकाणी डस्टबीनही पेटवण्यात आले. दंगलखोरांनी फ्रेंच शहरात नॅनटेसमध्येही कहर केला आहे. दंगलखोर कोणत्या गटाचे आहेत हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलीस त्यांना पकडण्याचे काम करत आहेत. दंगलखोरांनी पॅरिसमधील महत्त्वाच्या ठिकाणीही तोडफोड केली आहे.
फ्रान्समधील दंगलीचा इतिहास पाहता या हिंसाचाराचा आधीच अंदाज वर्तवला जात होता. हा हिंसाचार डावेच करतील अशी शंका निर्माण झाली होती. यासाठी फ्रान्समध्ये ३०,००० पोलीस तैनात करण्यात आले होते. पॅरिससह मोठ्या शहरांमध्ये दंगलीच्या वेळी लुटीपासून बचाव करण्यासाठी महागड्या दुकानांमध्ये बॅरिकेड्स लावण्यात आले होते.
आंदोलकांना आत जाण्यापासून रोखण्यासाठी काही दुकानांच्या खिडक्यांनाही लाकूड बांधण्यात आले. पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाल्यानंतर डाव्या पक्षांनी फ्रान्समध्ये प्रचंड दंगल घडवली होती. दि. ३० जून २०२४ रोजी या दंगलखोरांनी फ्रान्समध्ये कहर केला होता.
निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात उजव्या पक्षाच्या आघाडीनंतर डाव्या पक्षांनी सार्वजनिक मालमत्ता जाळली आणि पोलिसांवर हल्ला केला. दुसऱ्या टप्प्यानंतर हिंसाचार कोणत्या गटाने केला हे स्पष्ट झालेले नाही. निवडणुकीच्या निकालानंतर आता डाव्या विचारसरणीचा फ्रान्सचा पंतप्रधान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Powered By Sangraha 9.0