संत तुकाराम महाराजांच्या हिंदी काव्यातील रामदर्शन

06 Jul 2024 22:30:01
sant tukaram maharaj ramdarshan


मराठी संतांनी हिंदीमध्ये भक्तिरचना करून हिंदी भक्ती साहित्यात मौलिक भर घातलेली आहे. ‘हिंदी को मराठी संतों की देन’ डॉ. विनयमोहन शर्माचा ग्रंथच आहे. संत तुकाराम महाराजांच्या अनेक हिंदी पदरचना असून त्यावरही ‘पीएच.डी’ झालेली आहे. मराठी अभंगांमध्ये संत तुकाराम रामाच्या सगुणभक्तीचा पुरस्कार करतात, तर हिंदी पदांमध्ये रामाच्या निर्गुण भक्तीला प्राधान्य देतात. हा सगुण-निर्गुण समन्वय हे मराठी संतांचे वैशिष्ट्य आहे. तुकोबांनी रामाचा दास म्हणवून घेत रामाबरोबर हनुमंताचेही गुणवर्णन केलेले आहे. ‘आमुचा राम राम घ्यावा।’ म्हणतच तुकोबांचे वैकुंठगमन झालेले आहे.

मराठी संत परंपरेतील अनेक संतांनी मराठीबरोबरच हिंदी भाषेतही भक्तिकाव्ये, पदे लिहिलेली आहेत. मराठी संतांच्या राष्ट्रव्यापक दृष्टीचेच हे कौतुकास्पद दर्शन आहे. तुकोबांच्या अभंगगाथेत सुमारे ५०-५५ हिंदी पदे आहेत. देहू देवस्थान प्रकाशित अभंगगाथेत ’उत्तराधिपदे’, आणि ’साख्या’ अशा दोन मथळ्यांखाली तुकोबांची हिंदी पदे, रचना समाविष्ट आहेत. सकल संत गाथेमध्ये तुकोबांच्या नावावर ६२ हिंदी पदे आहेत. तुकोबांच्या या हिंदी भक्तिरचनांवर विद्यापीठामध्ये ‘पीएच.डी’ प्रबंधाचे लेखनही झालेले आहे. उत्तर भारतातील सुविख्यात रामभक्त ’कबीर’ यांचे काव्य तुकोबांच्या वाचनात होते. कबीरांच्या रामपर दोह्यांचा तुकोबांवर प्रभाव दिसतो. हिंदी पदरचनांमध्ये तुकोबा सर्वप्रथम आपल्यामनालाच रामनाम घे असा बोध करताना दिसतात-

राम राम कहे रे मन। औरसुं नहीं काज।
बहुत उतरे पार। आधे राख तुकाकी लाज॥
हे मना, राम राम असा जप कर, तुला अन्य कोणत्याही साधनाची गरजच नाही. रामनामाने आजवर अनेक जण भवसागर तरून गेले आहेत, मना तूही रामनाम घेऊन तुकारामाची लाज राख.

तुका दास रामका। मन में एकहि भाव।
तो न पालटू आव। ये हि तन जाव॥
मी प्रभू रामचंद्रांचा दास आहे, हा एकच भाव माझ्या मनीमानसी ठाम भरलेला आहे. आता माझे शरीर-देह पडला तरी हा मनीचा रामभाव जाणार नाही.

तुका दास तिनका रे। रामभजन निरास।
क्या बिचारे पंडित करो रे। हात पसारे आस॥
या हिंदी पदामध्येही तुकोबा आपणास रामप्रभूच्या दासाचा दास म्हणवून घेतात. मराठी अभंगात त्यांनी ’राघवदास’ असा स्वतःचा उल्लेख केलेला आहेच. जे रामभक्त ’निरास’ म्हणजे कोणतीही आस न ठेवता निष्काम मनाने रामभजन करतात, त्यांचा मी दास आहे, असे म्हणवून घेण्यात धन्यता मानतात.

हनुमंताच्या दासभक्तीचा आदर्श

तुकोबांची ही ईधरार्पण दासभक्ती रामभक्त हनुमंताच्या भक्ती कुळातील श्रेष्ठ दर्जाची भक्ती अवस्था आहे. तुकोबांपुढे आदर्श व अनुकरणीय म्हणून हनुमंताची दासभक्ती आहे.

हनुमंत महाबली। रावणाची दाढी जाळी॥१॥
तया माझा नमस्कार। वारंवार निरंतर॥ धृ.॥
जाळीयेली लंका। धन्य धन्य म्हणे तुका॥३॥ (अ.क्र. २८६)
शरण शरण हनुमंताः। तुज आलो रामदूता॥१॥
(१)
काय भक्तीच्या त्या वाटा। मज दावाव्या सुभटा॥
शूर आणि धीर। स्वामी काजी तू सादर ॥२॥
तुका म्हणे रूद्रा। अंजनीचिया कुमरा ॥३॥ (अ.क्र.२८३)
हे दोन अभंग तुकोबांच्या भावविश्वातील रामभक्त हनुमंताचे विशेष स्थान दर्शवितात. रामभक्त हनुमंताची तुकोबांनी दोन दृष्टीने थोरवी गायलेली आहे. १) रामाचा भक्त दास, दूत आणि २) भक्ती क्षेत्रातील आचार्य म्हणून.

हम दास तीन्हके सुना हो लोकां।
रावण मार बिभिषण दिई लंका॥
लोक हो ऐका, मी त्यांचा दास आहे, ज्याने रावणाला ठार करून बिभिषणाला लंकेचे राज्य दिले. या पदात तुकोबा रामाचा पुरुषार्थ वर्णन करून अशा पुरुषार्थी रामाचे, जो की सज्जनांचे रक्षण आणि दुष्टांचे निर्दालन करण्याची प्रतिज्ञा पूर्ण करतो, त्याचा मी दास आहे असे म्हणतात. ’परित्राणाय साधूनाम्। विनाशायच दुष्कृताम्।’ हे ईश्वरी अवतार कार्याचे ब्रीद आहे, तेच रावणाला मृत्यू व बिभिषणाला राज्य देऊन प्रभू रामचंद्र पालन करतात. याकडे तुकोबा आपले लक्ष वेधतात-

तिनसों हम करवो सलाम।
ज्या मुख बैठा राजाराम।
ज्याका चित लगा मेरे राम को नाम।
कहे तुका मेरा चित लगा त्याके पाव।
याशिवाय, ’तुका प्रीत रामसु।’, ’राम बिना सबही फुकटी ।’, ’राम कहो जीवना फल सो ही।’, ’कहे तुका राम रस जो पावे।’, ’रामभजन सब सार मिठाई।’ अशी सुभाषितवजा ओळींची अनेक रामभक्तीपर पदे तुकोबांच्या गाथेमध्ये आहेत.

आमचा ’राम राम’ घ्यावा।
भक्तिमंदिराचे कळस, संत तुकाराम महाराजांच्या मराठी व हिंदी भक्ती काव्यातील रामदर्शन आपण पाहिले तसेच ’रामदूत’ महावली हनुमंताची त्यांनी केलेली स्तुतीही पाहिली. तुकोबांना रामभक्तीचा हा वारसा संत एकनाथांच्या भावार्थ रामायणातून मिळाला, असे संत चरित्रकार महिपतींनी केलेले वर्णनही आपण पाहिले. तसेच तुकोबांना निर्गुणी रामभरतचे दर्शन कबीरांच्या दोह्यामधून घडले. ते त्यांना भावले. तुकोबांनी केवळ १४ अभंगांत संक्षेपात रामचरित्र कथन करण्याचा एक उद्देश म्हणजे वारकरी संप्रदायात साजर्‍या होणार्‍या चैत्र शुद्ध नवमीच्या रामजन्म उत्सवाप्रसंगी कीर्तनास उपयुक्त अभंग, हा सुद्धा आहे असे सांप्रदायिक उपासक महाराज मंडळींचे मत आहे. रामचरित्र गायनाद्वारे समाजमनात पुरुषार्थाचे जागरण आणि रामनाम माहात्म्य कथनाद्वारे नामभक्तीचा प्रसार असा दुहेरी हेतू तुकोबांच्या या रामपर अभंगांनी साधलेला आहे.

तुकोबांचे सदेह वैकुंठगमन सर्वश्रुत आहे. ’आपुले मरण पाहिले म्यां डोळा। तो जाला सोहळा अनुपम्य।’ (२६५९) हा आणि असे निर्वाणीची भाषा करणारे त्यांचे अनेक अभंगही सर्वपरिचित आहेत. आपल्या अखेरच्या अभंगातही ते रामाचा आणि विठ्ठलाचा एकत्रित उल्लेख करतात. ही राम व विठ्ठल रूपाची एकता एकरूपता हाच त्यांचा अद्वैत भक्तिबोध होय.

आम्ही जातो आमुच्या गावा। आमुचा राम राम घ्यावा॥१॥
येता निजधामी कोणी। विठ्ठल विठ्ठल बोला वाणी॥४॥
राम कृष्ण मुखी बोला। तुका जातो वैकुंठाला॥५॥


 विद्याधर ताठे
९८८१९०९७७५
vidyadhartathe@gmail.com
(पुढील अंकात : संत बहिणाबाईंच्या अभंगातील रामस्मरण)
Powered By Sangraha 9.0