जय जगन्नाथ!

06 Jul 2024 20:47:34
jay jagannath


महाराष्ट्रात आषाढात जशी पंढरपूरची वारी असते, आश्विन महिन्यात बंगालमध्ये जसा दुर्गा उत्सव असतो, तसाच आषाढ शुक्ल द्वितीयेपासून दशमीपर्यंत ओडिशात जगन्नाथाचा रथोत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा केला जातो. या रथोत्सवासाठी संपूर्ण भारतातून तसेच परदेशांतूनही लाखो भाविक जगन्नाथपुरी येथे दाखल होतात. यावर्षीही आज दि. ७ व उद्या ८ जुलै रोजी जगन्नाथपुरी येथे ही जगन्नाथ, बलराम आणि सुभद्रा यांची रथयात्रा संपन्न होणार आहे. त्यानिमित्ताने...

भुवनेश्वरजवळ समुद्रकिनारी वसलेले जगन्नाथपुरी हे तीर्थक्षेत्र. तेथील मंदिरात जगन्नाथ (श्रीकृष्ण) बलराम आणि सुभद्रा यांच्या लाकडी मूर्ती आहेत. आषाढ शुक्ल द्वितीयेच्या दिवशी या तीनही मूर्ती तीन लाकडी रथांमध्ये विराजमान करून भव्य रथयात्रा निघते. लाखो लोक या रथयात्रेत सामील होतात. रथ ओढण्यास मदत करीत असतात. या दिवशी इथे लाखो श्रद्धावंतांचा जनसागर उफाळून येतो. भक्तिसागराचे हे दृश्य पाहून आपले हात जगन्नाथचरणी जोडले जातात.

तुम्ही कधी या जगन्नाथ रथयात्रेत सामील झाला आहात का? नसाल झाला, तर एकदा तरी या भक्तिसागराचे अवश्य दर्शन घ्या. या रथयात्रेत सामील होऊन जगन्नाथ (श्रीकृष्ण), बलराम आणि सुभद्रा यांचे दर्शन घेतले, तर मोक्ष मिळतो, अशी भक्तांची श्रद्धा असते. यावर्षी रविवार दि. ७ जुलै रोजी सायंकाळी ४ वाजता ही रथयात्रा मंदिरापासून निघणार असून सूर्यास्ताला ती थांबविली जाणार आहे. सोमवार दि. ८ जुलै रोजी सकाळी सूर्योदयाला रथयात्रा पुन्हा सुरू होणार असून गुंडिचा मंदिर येथे जाणार आहे. आषाढ शुक्ल दशमीच्या दिवशी रथयात्रा परत जगन्नाथ मंदिरात येते. पुरी क्षेत्री जगन्नाथ रथयात्रा हा एक भव्य दिव्य, पवित्र उत्सव असतो, जो समानतेचा संदेश संपूर्ण जगाला देतो.

जगन्नाथाचा रथ साक्षात विश्वकर्म्याने तयार केला आणि या रथयात्रेची प्रथा इंद्रद्युम्न राजाने सुरू केली, असे पद्मपुराणात सांगितले आहे. या रथयात्रेची माहिती स्कंदपुराण, नारदपुराण, पद्मपुराण आणि ब्रह्मपुराणातही सापडते. यावरून या रथयात्रेचा प्रारंभ पुराणपूर्वकालात झालेला असून, प्राचीन कालापासून ही रथयात्रेची प्रथा आजही अविरतपणे सुरु आहे.


मूर्तीसंबंधी कथा

मंदिरातील जगन्नाथ (श्रीकृष्ण), बलराम आणि सुभद्रा यांच्या मूर्ती या लाकडाच्या असून ओबडधोबड आहेत. या तीनही मूर्तींना हात, पाय नाहीत. फक्त डोळे, नाक आणि तोंड हे अवयव आहेत.
मागुणिदास या कवीने या मूर्तींसंबंधी म्हटले आहे-
पद अंगुलि नाइ हात। दारुब्रह्म जगन्नाथ॥
या दारुब्रह्माचेच (म्हणजे ओंडक्याच्या स्वरुपात असलेल्या देवाचेच) इथे दर्शन घ्यायचे आणि त्याचीच पूजा-प्रार्थना करायची. हा जगन्नाथ इथे कुठून, कसा आला आणि अशा प्रकारे विरूप, अंगहीन कसा झाला, या विषयीच्या कथा प्राचीन विविध ग्रंथात देण्यात आलेल्या आहेत.

प्राचीनकाळी पुरीमध्ये इंद्रद्युम्न नावाचा राजा राज्य करीत होता. या राजाने या नगरीत एक भव्य आणि कलापूर्ण असे मंदिर बांधले. या मंदिरात मूर्ती बसवायचे काम शिल्लक होते. राजाला नीलमाधवाची मूर्ती मंदिरात बसवायची होती. परंतु, अनेक अडचणी येत होत्या. एकदा रात्री प्रत्यक्ष नीलमाधव राजाच्या स्वप्नामध्ये आला. तो राजाला म्हणाला, “हे राजा, तू १०० अश्वमेध यज्ञ कर. म्हणजे मी तुझ्या राज्यात एका चंदनाच्या ओंडक्याच्या रूपाने प्रकट होईन. त्यावर पद्म आणि चक्र ही चिन्हे असतील. ही चिन्हे दिसली की तीच माझी मूर्ती असे तू समज.”

इंद्रद्युम्न राजाने एकेक करून १०० अश्वमेध पूर्ण केले. त्यानंतर राजा एकदा सागरकिनारी बसला असताना त्याला एक चंदनी ओंडका पुरीजवळच्या समुद्रकिनार्‍याला लागलेला दिसला. राजाने त्या ओंडक्यावरच्या पद्म-चक्र या खुणा पाहिल्या. त्याने तो ओंडका आपल्या राजवाड्यात आणला. राजाला त्यातून एक सुंदर विष्णुमूर्ती घडवायची होती. परंतु, कोणत्याही कलाकाराची रंधा-पटाशी ही हत्यारे त्यावर चालत नव्हती. त्यामुळे राजा चिंतेत पडला. तेवढ्यात, अनंत नावाचा एक वृद्ध मूर्तिकार तेथे आला. तो साक्षात विश्वकर्मा होता. तो राजाला म्हणाला, “हे राजा, मला देवळाच्या गाभार्‍यात २१ दिवसांपर्यंत एकटा कोंडून ठेव. देवळाचे सर्व दरवाजे बंद कर. ही अट तू पाळलीस, तर मी या ओंडक्याची मूर्ती घडवीन. २१ दिवस पूर्ण झाले की, तू गाभार्‍याचा दरवाजा उघड.”

राजाने त्याची अट मान्य केली. त्या कारागिरीला ओंडक्यासह गाभार्‍यात कोंडून ठेवले. काही दिवस गेले. राणीच्या मनात विकल्प उत्पन्न झाला. ती राजाला म्हणाली, “हा कलाकार कदाचित चोरही असू शकेल. एवढ्या मोठ्या देवळात तो एकटा आहे. कदाचित, देवळाच्या नक्षीत जडवलेली सोन्या-चांदीची फुले तो काढून घेऊन पसारही होईल. तुम्ही एकदा आत तो नेमके काय करतो, ते पाहाच.”

राजाने दोन आठवडे राणीच्या बोलण्याकडे लक्ष दिले नाही. परंतु, तिच्या वारंवार टोचणीमुळे त्याच्याही मनात शंका उत्पन्न झाली आणि एक दिवस राजाने गाभार्‍याचे दार उघडले. पाहतो, तर हातपाय नसलेला जगन्नाथाचा मुखवटा तिथे होता. मूर्तिकार अदृश्य झालेला होता. ती मूर्ती पाहून राजा घाबरला. त्याने मूर्तीसमोर उभे राहून क्षमायाचना केली. तोच मूर्तीच्या मुखातून शब्द आले, “राजा, तू अहंकार धरलास. राणीच्या शंकेखोरपणाला बळी पडलास. म्हणून मी असा अपूर्ण, अर्धवट अवस्थेत राहिलो. पण, झाले ते झाले. आता तू याच स्वरूपात माझी मंदिरात प्रतिष्ठा कर. अशाही स्थितीत मी तुझ्या भक्तिभावाला समाधान देईन. मी प्रसन्न होईन.”

दुसर्‍या एका कथेप्रमाणे विश्वकर्म्याने समुद्रकिनारी असलेले तीन वृक्ष तोडून त्याच्या जगन्नाथ, बलराम आणि सुभद्रा अशा तीन मूर्ती घडविल्या. काही संशोधकांच्या मतानुसार, या मंदिराची निर्मिती बाराव्या शतकात झाली असावी. या मंदिरात श्रीकृष्णाबरोबरच बलराम आणि सुभद्रा यांच्या मूर्ती आहेत. ही गोष्ट इतर मंदिरात दिसत नाही.


जगन्नाथ मंदिराविषयी...

काही संशोधकांच्या मते, पुरी येथील जगन्नाथाचे मंदिर इसवी सनाच्या १२व्या शतकाच्या प्रारंभी गंग वंशातील राजा चोडगंगदेव किंवा त्याच शतकाच्या अखेरीस राजा अनंग भीमदेव याने बांधलेले आहे. ते नीलगिरी नावाच्या टेकडीवर उभारलेले असून, त्याच्याभोवती दुहेरी कोट आहे. कोटाच्या सर्व भिंती दगडी असून प्रत्येक बाजूला मध्यभागी एक द्वार आहे. पूर्वेकडील द्वारावर सिंहाच्या दोन भव्य आकृती असल्यामुळे त्याला ‘सिंहद्वार’ म्हणतात. तेच महाद्वार समजले जाते. त्याच्यासमोर काळ्या पाषाणाचा एक स्तंभ उभा आहे.

जगन्नाथ मंदिरासंबंधी अनेक कथा अभ्यासल्या असता असे वाटते की, पुरीचा जगन्नाथ हा वैदिक परंपरेतील देव नसावा. तो मूळचा शबरांचा देव असून त्यावर बौद्धांचा प्रभाव पडला असावा. कारण, कृष्णाच्या देहाच्या अवशेषांची पूजा वैदिक परंपरेत बसणारी नाही. इसवी सनाच्या पाचव्या शतकात पुरी हे एक बौद्ध क्षेत्र होते, असे मत पंडित महादेवशास्त्री जोशी यांनी भारतीय संस्कृतिकोशात व्यक्त केले आहे.

वैष्णव लोक जगन्नाथपुरीला वैष्णव क्षेत्र मानतात. पण, एक गोष्ट मला इथे मुद्दाम सांगाविशी वाटते, ती म्हणजे जगन्नाथ हे संपूर्ण जगताचे नाथ मानले जातात. जगन्नाथ महाप्रभू हेच परमात्मा आहेत, परमेश्वर आहेत, परमब्रह्म आहेत, असे मानले जाते. म्हणून, रथयात्रेत कोणताही भेदभाव दिसत नाही. सर्व पंथांचे लोक रथयात्रेत भाग घेत असतात. जगन्नाथचरणी लीन होतात. महाप्रसाद घेतात. इथे समानता दिसून येते. ही या जगन्नाथ रथयात्रेतील महत्त्वाची गोष्ट म्हणावी लागेल. पंढरपूरला जसे वारकरी भेदभाव न मानता एकत्र येतात. समानता मानतात तीच गोष्ट जगन्नाथाच्या या रथयात्रेत दिसून येते.


दा. कृ. सोमण
(लेखक सुप्रसिद्ध पंचांगकर्ते, खगोल अभ्यासक आहेत.)
Powered By Sangraha 9.0