मोदींच्या डिजिटल इंडियाचा करिश्मा!

06 Jul 2024 18:38:33
digital india thane city


ठाणे :      पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिजिटल इंडिया या उपक्रमाचा वेगळा करिश्मा पाहायला मिळाला आहे. रिक्षाचालकाला त्याचे रिक्षाभाडे 'G Pay' द्वारे ऑनलाईन दिल्याने त्या आधारे एका कुटुंबाला रिक्षात राहिलेल्या ४० हजार रुपये असलेल्या बॅगेचा शोध लागला. सुरुवातीला दाद न देणाऱ्या रिक्षा चालकाने अखेर पोलिसांच्या धाकाने बॅग सापडल्याची कबुली देत बॅग मूळ मालकाच्या स्वाधीन केली.

ठाण्यातील दाभोळकर कुटूंब शनिवारी रिक्षाने विवियाना मॉलमध्ये गेले होते. रिक्षातुन उतरताना महत्त्वाची कागदपत्रे आणि ४० हजार रुपये रोख असलेली त्यांची बॅग रिक्षातील आसनाच्या मागील बाजूस राहिली. बॅग रिक्षात राहिल्याचे लक्षात आल्यानंतर दाभोलकर यांनी वर्तकनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली.




वर्तकनगर पोलीस स्टेशनच्या महिला पोलीस उपनिरीक्षक शिंदे, बोरसे, गायकवाड आणि सातपुते यांनी विवियाना मॉल परिसरातील सी.सी टिव्ही कॅमेरे तपासले, परंतु ती रिक्षा आढळून आली नाही. दरम्यान दाभोळकर यांनी त्या रिक्षा चालकाला मोबाईलवरून रिक्षा भाडे 'G Pay' केल्याने रिक्षा चालकाचा मोबाईल नंबर मिळाला. त्याच्या मोबाईल नंबरवर पोलिसांनी कॉल करण्याचा प्रयत्न केला, परंतु तो संपर्क टाळत होता. दाभोळकर यांनीही वारंवार फोन केले तसेच मेसेजही केले.

अखेर रिक्षाचालकाच्या पत्नीने फोन करून आम्हाला बॅग सापडलीच नाही, आम्हाला त्रास देऊ नका, असा आव आणला. अखेर, दाभोळकर यांनी पोलिसांची भीती दाखवल्यानंतर बॅग असल्याची कबुली दिली. रिक्षाचालकाने रविवारी रात्री ती बॅग वर्तकनगर पोलिसांच्या ताब्यात दिली. कागदपत्रे आणि रोख रकमेसह बॅग मिळाल्याने दाभोळकर कुटुंबाने पोलिसांचे आभार मानले.



Powered By Sangraha 9.0