नाशिकच्या सुपुत्राची ऑलिम्पिकवारी

06 Jul 2024 16:04:04

sarvesh kushale
 
लासलगाव : निफाड तालुक्यातील देवगावचा सर्वेश अनिल कुशारे यंदा ऑलिम्पिकवारी करणार असून अशी कामगिरी करणारा तो पहिलाच खेळाडू ठरला आहे. आगामी पॅरिस ऑलिम्पिकसाठी सर्वेश उंच उडीमध्ये पात्र ठरला असून नाशिकसह महाराष्ट्रासाठी ही अभिमानाची बाब आहे. हरियाणातील पंचकुला येथे दि. 29 जून रोजी झालेल्या स्पर्धेत सर्वेशने 2.25 मीटर उंच उडी मारून प्रथम क्रमांक पटकावत जागतिक क्रमवारीत 24व्या स्थानावर झेप घेतली. यापूर्वी तो 36व्या स्थानी होता. देवगाव येथील श्री. डी. आर. भोसले विद्यालयात माध्यमिक शिक्षण घेत असताना सर्वेशने 2010 सालापासून उंच उडीला सुरुवात केली होती. क्रीडाशिक्षक रावसाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली त्याने नियमित सराव केला.
 
2011 साली जाधव यांनी मक्यापासून तयार केलेल्या भुशाच्या पोत्यावर फॉसबरी प्रकारची उडी मारण्याचा सराव सर्वेशने सुरू केला. या काळात त्याने तालुका, जिल्हा आणि राज्यस्तरावर अनेक बक्षिसे पटकावली. सध्या पुण्यामध्ये भारतीय लष्करामध्ये सेवेत असलेल्या सर्वेशने बारावीपर्यंत देवगाव येथे शिक्षण घेतल्यानंतर उंच उडीच्या सरावासाठी वापरली जाणारी अत्याधुनिक मॅट उपलब्ध नसल्याने सांगलीमध्ये महाविद्यालयीन शिक्षणासाठी प्रवेश घेतला.
 
मात्र, तेथे त्याला अनेकांचा रोष पत्करावा लागला.त्याने पुन्हा देवगावची वाट धरून मक्याच्या भुशाच्या पोत्यावर पुन्हा सराव सुरू केला. याअगोदर त्याला थायलंडमध्ये एशियन गेम्समध्ये रौप्यपदक मिळाले होते. मागील महिन्यात कझाकिस्तानमधील स्पर्धेत त्याने सुवर्णपदक पटकावले होते. 2020 साली नेपाळमध्ये झालेल्या साऊथ एशिया स्पर्धेमध्ये सुवर्णपदक मिळवले होते. जर्मनीमध्ये झालेल्या स्पर्धेतही त्याने सातवा क्रमांक पटकावला होता.
देशवासीयांचे स्वप्न पूर्ण करावे
शेतकरी कुटुंबात जन्माला आलेल्या सर्वेशला उंच उडी प्रकाराची आवड निर्माण झाली आणि त्याने त्याच्या प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली जिद्दीने या क्षेत्रात नाव कमवायचे स्वप्न उराशी बाळगले. त्याचे हे स्वप्न पूर्ण झाले. आता त्याने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळवून आमच्यासह देशवासीयांचे स्वप्न पूर्ण करावे, अशी अपेक्षा सर्वेश कुशारेच्या कुटुंबीयांनी व्यक्त केली आहे.
प्रशिक्षकांकडून मोफत प्रशिक्षण
सर्वेश कुशारेचे प्रशिक्षक रावसाहेव जाधव हे क्रीडाशिक्षक म्हणून निवृत्त झाले असून गावातील विद्यार्थ्यांना आजही ते उंच उडीचे मोफत प्रशिक्षण देत आहेत. आजपर्यंत त्यांनी दहा राष्ट्रीय खेळाडू तयार केले असून खेळाच्याच जोरावर 17 ते 18 विद्यार्थी सरकारी नोकरीत दाखल झाले आहेत. जे विद्यार्थी या खेळाच्या माध्यमातून नोकरीला लागले आहेत त्यांनी वर्गणी काढून मॅट विकत घेतली आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0