‘नानाछंद' द्वारे सादर करणार नाना पाटेकरांमधील गीतकार

06 Jul 2024 16:54:23
संगीत क्षेत्रातील दिग्गजांच्या उपस्थितीत रंगला २५वा वर्षपूर्ती सोहळा
 

sagarika 
 
मुंबई : आजवर विविधांगी संगीताची मेजवानी देत रसिक श्रोत्यांचे कान तृप्त करणारे ‘सागरिका म्युझिक’ हे नाव संगीतप्रेमींसाठी नवं नाही. कॅसेट-सीडीच्या काळापासून संगीतप्रेमींसमोर सुरेल संगीताचा अद्वितीय नजराणा सादर करण्याचे व्रत जोपासणाऱ्या सागरिका म्युझिकने आजच्या सिंगल्सच्या काळातही रसिकांच्या मनावर गारूड करणारी गाणी सादर केली आहेत.
संगीत क्षेत्रात यशस्वी २५ वर्ष पूर्ण केल्या निमित्ताने सागरिका म्युझिकच्या वतीने एका भव्य समारंभाचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. संगीत क्षेत्रातील अनेक नामवंतांनी त्यास आवर्जून हजेरी लावली. आणि सागरिका बाम आणि सागरिका म्युझिकच्या २५ व्या वर्षपूर्तीबद्दल अभिनंदन केले तसेच पुढील उज्ज्वल वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
 
संगीत क्षेत्रात २५ वर्षे पूर्ण केल्याचं औचित्य साधत 'नानाछंद' या अल्बमचे अनावरण याप्रसंगी करण्यात आले यावेळी बोलताना हा अतिशय खास अल्बम रिलीज करताना आम्हाला अतिशय आनंद होत असल्याची भावना सागरिकाच्या वतीने व्यक्त करण्यात आली. 'नानाछंद' या अल्बममधील गाणी नाना पाटेकर यांनी लिहिली असून, संगीतकार नीलेश मोहरीर यांनी संगीतबद्ध केली आहेत. वैशाली सामंत, राहुल देशपांडे आणि स्वप्नील बांदोडकर या तीन सर्वोत्कृष्ट गायकांच्या आवाजात ही गाणी रसिकांना ऐकायला मिळणार आहेत.
 
‘मी निसर्गात जास्त रमतो. त्यामुळे त्या सगळ्याशी माझी खूप जवळीक आहे. अनेकदा ते शब्द आपसूक ओठावर येतात. त्या शब्दांना निलेशने अतिशय मेहनतीने सुरांमध्ये गुंफलंय त्यातूनच ही गीत निर्मिती झाली. सागरिका म्युझिक आणि सागरिका बाम यांनी या गीतांना सुंदरतेने एका अल्बमच्या माध्यमातून प्रकाशित केलं आहे. याचा अतिशय आनंद मला आहे. असे भावोद्गगार ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी काढले. या अल्बमच्या निमित्ताने नाना पाटेकरांमध्ये दडलेला संवेदनशील गीतकार जगासमोर येणार आहे.
Powered By Sangraha 9.0