मुंबईतील रुग्णालयांसंदर्भात बैठक

06 Jul 2024 14:41:36

uday samant
 
मुंबई :“मुंबई महापालिकेच्या सायन रुग्णालयाच्या इमारतीचा पुनर्विकास करण्याचे काम मागील काही वर्षांपासून प्रलंबित आहे. दरम्यान, रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत रुग्णखाटा, तज्ज्ञ डॉक्टर, नर्स, व्हेंटिलेटर, इतर वैद्यकीय उपकरणे उपलब्ध नसल्याने रुग्णांना त्यांचा नाहक त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे महापालिकेचे पैसे कुठे जातात? सायन रुग्णालयाचा पुनर्विकास कधी होणार?” असा प्रश्न भाजप आमदार कॅप्टन आर. तमिल सेल्वन यांनी विधानसभेत विचारला.
 
दरम्यान, विधानसभा सदस्य भारती लव्हेकर, यामिनी जाधव, सुनील प्रभू, आदित्य ठाकरे, अजय चौधरी यांनी नायर रुग्णालय, केईएम रुग्णालय, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा रुग्णालयांतील रुग्णसुविधांच्या संदर्भात प्रश्न मांडले. त्यावर उत्तर देताना मंत्री उदय सामंत यांनी येत्या मंगळवार, दि. 9 जुलै रोजी मुंबईतील सर्व लोकप्रतिनिधींसोबत महापालिकेच्या रुग्णालयासंदर्भात बैठकीचे आयोजन करण्याचे निर्देश महापालिकेच्या अधिकार्‍यांना दिले.
 
तसेच सायन रुग्णालयाच्या संदर्भात पुनर्विकास दोन टप्प्यांंंत होत आहे. पहिला टप्प्यात 616 कोटी रुपयांचे कंत्राट देण्यात आले असून बुधवार, दि. 10 डिंसेबरपर्यंत काम पूर्ण होणे अपेक्षित आहे. दुसरा टप्पा 1507 कोटींचा असून कंत्राटासाठी निविदा काढण्यात आली आहे. दरम्यान, पुनर्विकासाच्या कामात दिरंगाई झाली असेल तर संबंधित अधिकार्‍यांवर कारवाई केली जाईल. तसेच नायर रुग्णालयातील दोन्ही सीटीस्कॅन मशीन खरेदी करण्यास मंजुरी देऊन त्या सुरू करण्याचे निर्देश मंत्री उदय सामंत यांनी
 
महापालिका आयुक्तांनी दिले. याव्यतिरिक्त हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (ट्रॉमा) रुग्णालय नियमित सुरू ठेवण्याचे आदेशही त्यांनी दिले. तसेच महापालिका क्षेत्रातील रुग्णालयात चांगल्या सोयीसुविधा असाव्यात, अशी शासनाची भूमिका आहे. त्यामुळे येत्या मंगळवारी लोकप्रतिनिधींची बैठक घेऊन यासंदर्भात कठोर पावले उचलली जातील, असेही मंत्री सामंत यांनी सांगितले.
 
 
Powered By Sangraha 9.0