'कमळ' पतसंस्था कोकणातील आर्थिक विकासाचे केंद्रबिंदू ठरायला पाहिजे

06 Jul 2024 18:09:41

Pravin darekar
 
अलिबाग : येथील कमळ नागरी सहकारी पतसंस्थेच्या कर्मचारी प्रशिक्षण वर्गाचे उदघाटन आज भाजपा विधानपरिषद गटनेते आणि मुंबई जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष आ. प्रविण दरेकर यांच्या हस्ते पार पडले. यावेळी कमळ ही पतसंस्था महाराष्ट्रात कोकणातील आर्थिक विकासाचे केंद्रबिंदू ठरायला पाहिजे, असे विधान दरेकरांनी केले. तसेच पतसंस्था क्षेत्रातील एक आदर्श पतसंस्था म्हणून 'कमळ'चे नाव घेता येईल, असे गौरवोद्गारही दरेकरांनी काढले. याप्रसंगी कमळ नागरी पतसंस्थेचे अध्यक्ष नंदकुमार चाळके, संस्थापक गिरीश तुळपुळे, सचिव लक्ष्मण झुंजारे, उपाध्यक्ष मोरेश्वर दातार, भाजपा तालुकाध्यक्ष उदय काठे यांसह पतसंस्थेचे अधिकारी, कर्मचारी वर्ग उपस्थित होते.
 
यावेळी उपस्थितांना संबोधित करताना दरेकर म्हणाले की, सहकारामुळेच मी राजकीय क्षेत्रात माझे पाय रोवू शकलो. सहकार हा राज्याचा अविभाज्य घटक आहे. ग्रामीण भागाची अर्थव्यवस्था बळकट झाली, छोट्या मोठ्या उद्योगाच्या संधी, व्यवसाय वाढले त्यामध्ये सहकाराचे फार मोठे योगदान आहे. कमळ पतसंस्थेने जी काही प्रगती केलीय ती वाखाण्याजोगे आहे. पतसंस्था काढणे सोपे असते मात्र ती पतसंस्था चांगल्या पद्धतीने टिकवणे फार अवघड असते. अनेक अडचणी येतात अशावेळी पतसंस्थेच्या कारभारावर विपरीत परिणाम होत असतो. परंतु व्यवस्थापन आणि आपला उद्देश चांगला असेल तर या सर्व गोष्टीतून बाहेर पडून चांगल्या पद्धतीने उभेराहू शकतो याचे मूर्तिमंत उदाहरण कुठले असेल तर 'कमळ नागरी सहकारी पतसंथा' असून ती पतसंस्था क्षेत्रातील आदर्श पतसंस्था असल्याचेही दरेकर म्हणाले.
 
दरेकर पुढे म्हणाले की, कोकणात सहकार फार कमी आहे. पश्चिम महाराष्ट्राचा जो विकास झाला तो सहकाराच्या माध्यमातूनच झाला. पश्चिम महाराष्ट्रातून नेतृत्वही जे उभे राहिले ते सहकाराच्या माध्यमातून आणि सहकाराच्या आशीर्वादाने. परंतु कोकणात ज्या पद्धतीने सहकार मोठा व्हायला पाहिजे होता तो दुर्दैवाने झाला नाही. येणाऱ्या काही वर्षात पाच हजार कोटीच्या टप्प्याचे ध्येय्य आपल्या कमळ पतसंस्थेचे असले पाहिजे. त्याप्रमाणे पहिला टप्पा एक हजार कोटींचा करा. कारण कार्यक्षेत्र मोठे आहे. तुम्ही मुंबईत प्रवेश केलात तर आणखी प्रगती होण्यास वेळ लागणार नाही. तसेच तुम्ही तुमचा पसारा वाढवा, मुंबईत पाय रोवा. तुम्हाला लागेल ती ताकद आणि मदत केली जाईल, असेही दरेकरांनी आश्वस्त केले.
 
दरेकर पुढे म्हणाले की, आज मी मुंबई जिल्हा बँकेचा अध्यक्ष आहे. सहकारात आर्थिक संस्थेत काय ताकद आहे हे मी जवळून पाहिले आहे. मी ज्या जिल्हा बँकेचा अध्यक्ष आहे त्या बँकेची आर्थिक उलाढाल १२-१३ हजार कोटीची आहे. जेव्हा आपले सरकार नव्हते त्यावेळी साखर कारखानदारांना ताकद देण्याचे काम मुंबई जिल्हा बँकेने केले. कारण सहकारात दुसऱ्याला मदतच करायची नाही ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीची मनोवृत्ती आहे. अशावेळेला आपली आर्थिक बलस्थाने उभी राहिली पाहिजेत हा प्रयत्न भाजपाच्या माध्यमातून राज्यभर करत आहोत. तो करत असताना 'कमळ'ने पुढाकार घ्यावा, असे आवाहनही दरेकरांनी पतसंस्थेच्या संचालक आणि कर्मचाऱ्यांना केले.
 
दरेकर पुढे म्हणाले की, सहकारात प्रशिक्षणाची अत्यंत आवश्यकता आहे. जुन्या काळात टेक्नॉलॉजी फार प्रमाणात नव्हती. डिपॉजिट घेणे आणि कर्ज देणे यापलीकडे काम नव्हते. व्यवस्थापन नसल्याने अनेक संस्था अडचणीत आल्या. येणाऱ्या युगात सामोरे जात असताना तुम्हाला टेक्नॉलॉजी, आयटीचे ज्ञान आवश्यक आहे. या पद्धतीने सजग काम केले तर 'कमळ' पतसंस्थेचे भविष्य अत्यंत उत्तम आहे. येणाऱ्या काळात महाराष्ट्रात हातांच्या बोटावर मोजणाऱ्या संस्था असतील त्यात 'कमळ' सर्वाधिक अग्रेसर असेल, असा विश्वासही दरेकरांनी व्यक्त केला.
 
दरेकर पुढे म्हणाले की, या संस्थेचे नावच कमळ आहे. सध्या कमळाला चांगले दिवस आहेत. कमळ गावागावात पोहोचविण्याचे हे माध्यम आहे. भाजपाच्या कार्यकर्त्यांनीही कमळला ताकद देण्याची गरज आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी ग्रामीण भागात टिकलेत त्याचा आधार या संस्था आहेत. दुर्दैवाने या स्पर्धेत आपल्या संस्था कमी आहेत. आमच्या संस्था मोठ्या झाल्या पाहिजेत हे का आम्ही ठरवत नाही? या भूमिकेतून भाजपाच्या कार्यकर्त्यांनी काम करण्याची गरज आहे. आज सहकारात अनेक दालने आहेत परंतु त्यात भाजपाच्या कार्यकर्त्यांचा वावर कमी आहे. मी राज्याचा सहकार विभाग बघतो. त्यासाठी राज्यव्यापी शिबीर घेणार आहे. सहकारातील कार्यकर्त्यांना एकत्र करून भाजपाची चांगली मोट सहकार वाढीस उभी करत असल्याचेही दरेकर म्हणाले.
 
दरेकर पुढे म्हणाले की, राज्यात आपण अनेक साखर कारखाने, सूतगिरण्या, विविध कार्यकारी सोसायट्याना आपण पैसे दिलेत. अचलपूर येथे संत्रा उद्योगाला तिथली जिल्हा बँक पैसे देऊ शकली नाही. मी मुंबई बँकेच्या माध्यनातून पैसे देऊन प्रक्रिया उद्योग उभे केले. ही ताकद सहकारी, आर्थिक संस्थांची आहे. 'कमळ' हे महाराष्ट्रातील कोकणचे आर्थिक विकासाचे केंद्रबिंदू ठरायला पाहिजे. कोकणात सावंतवाडीपासून ते पालघरपर्यंत कुणालाही व्यवसायासाठी पैशाची गरज लागली तर त्यासमोर 'कमळ' हे नावं आले पाहिजे, एवढ्या ताकदीने काम करा, जी मदत, ताकद लागेल ती जिल्हा बँक, राज्य सरकार म्हणून हवी असेल ती निश्चितपणे आपल्या पाठीशी उभी करू, असे आश्वासनही दरेकरांनी यावेळी दिले. कमळ पतसंस्थेच्या योगदानात कर्मचाऱ्यांचा खारीचा वाटा आहे. 
 
कुठलाही पाठींबा नसताना प्रामाणिकपणे, कामाचा आत्मविश्वास आणि सचोटी या जीवावर आपल्या पतसंस्थेचा उत्तम असा प्रवास सुरू आहे. पतसंस्था आणखी मोठी झाली पाहिजे आणि ते करणारे संचालक मंडळासोबत तुम्ही कर्मचारी आहात. कुठल्याही संस्था मोठ्या होतात त्या कर्मचाऱ्यांच्या योगदानामुळे. संचालक मंडळ, व्यवस्थापन हे दिशा, धोरण देण्याचे काम करेल परंतु खऱ्या अर्थाने त्याची अंमलबजावणी करणारा घटक हा कर्मचारी असून 'कमळ'च्या यशामागे कर्मचाऱ्यांचा फार मोठा वाटा असल्याचेही दरेकर म्हणाले.
 
 
Powered By Sangraha 9.0