‘ला बेले इपोक’

05 Jul 2024 22:04:28
global hotels on wheels


आज 21व्या शतकात प्रवासाच्या व्याख्या वेगाने बदलत आहेत. अनेक उच्चभ्रू आणि हवाई प्रवास करणारे नागरिक हवाई वाहतुकीला पर्याय शोधत आहेत. अशावेळी विविध देशांतील रेल्वे प्रशासनाने दोन शहरे आणि राज्यांना जोडणारी लक्झरी रेल्वे कोच निर्मिती करत प्रवाशांना उत्तम प्रवासाची अनुभूती देण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले आहेत. नुकतीच एका नवीन फ्रेंच रेल्वे स्टार्टअपने अधिक शाश्वत आणि आरामदायी प्रवासाचा पर्याय शोधणार्‍या प्रवाशांसाठी अशीच एक सुविधा आणली आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या रात्रभर चालणार्‍या ‘हॉटेल ऑन व्हील्स’च्या काही श्रेणी सुरू करण्याची योजना या स्टार्टअपने आखली आहे.

’Le Grand Tour’ ही फ्रान्समध्ये सुरू होत असलेली एक नवीन लक्झरी हॉटेल ट्रेन. ही ट्रेन फ्रान्समध्ये सहा दिवसांसह पाच रात्रीच्या रेल्वे टूरवर प्रवाशांना घेऊन जाण्यास सज्ज आहे. ट्रेनच्या डिझाईनमागील एका छोट्या फ्रेंच कंपनीसाठी ही प्रकल्प वाढीची संधी होती, ज्यामध्ये उच्च श्रेणीतील सेवा आणि सुविधा उपलब्ध आहेत. या ट्रेनच्या डिझाईनसाठी ’थ्री-डी मॉडेलिंग’ सारख्या डिजिटल साधनांचा वापर करण्यात आला आहे. उत्तर फ्रान्समधील सोमेन येथे स्थित, ’Ateliers de Fabrication Ferroviaire (AFF)’चे डिझायनर आणि शिल्पकार, विशेषज्ञ रेल्वे रोलिंग स्टॉकचे परिवर्तन, दुरुस्ती आणि देखभाल यांसह नवीन प्रवासी कॅरेज तयार करत आहेत. ‘ला बेले इपोक’ युगाचा अनुभव देणारी सहा दिवसांची, पाच रात्रीची हॉटेल-ट्रेन ट्रिप. 1871 ते 1914 या कालावधीचा संदर्भ देताना, ’La Belle Apoque’ चा शाब्दिक अर्थ फ्रेंचमध्ये ‘सुंदर युग’ असा होतो.

‘ला बेले इपोक’ हा युरोपचा सुवर्णकाळ म्हणून ओळखला जातो. हा एक उल्लेखनीय काळ आहे, ज्याने पुढील इतिहासात लक्षणीय बदल केला. 50 वर्षांहून कमी कालावधीत, युरोपने राजकीय, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक आणि तांत्रिक आघाड्यांवर मोठ्या प्रमाणात प्रगती केली. सामान्यत: ‘परिवर्तनशील युग’ म्हणून हा काळ ओळखला जात असताना, ‘ला बेले इपोक’ ही एक संज्ञा होती, जी नंतर लोकप्रिय झाली. हेच युग साकारणारी ट्रेन आता फ्रान्सच्या रुळांवरून धावणार आहे. माद्रिद, लिस्बन, पोर्टो, मिलान, व्हेनिस, फ्लॉरेन्स, रोम, व्हिएन्ना, प्राग, बुडापेस्ट, बर्लिन, हॅम्बर्ग, कोपनहेगन आणि एडिनबर्ग यांना जोडण्यासाठी 800 ते 1500 किमी अंतराच्या सेवांसह ‘नवीन मिडनाईट ट्रेन नेटवर्क’चे जाळे बनविणार आहे. ‘मिडनाईट ट्रेन्स’ लवकरच दक्षिण युरोपला जाणारा पहिला मार्ग नागरिकांसाठी खुला करतील. या ‘मिडनाईट ट्रेन्स’मध्ये रेस्टॉरंट आणि बारसह, हंगामी उत्पादने, कॉकटेल आणि वाईन सेवा पुरविली जाईल.

उच्च श्रेणीतील सेवा आणि सुविधांसह लांब पल्ल्याच्या लक्झरी ट्रेनची निर्मिती, हे यामागील लक्ष्य. ही रेल्वे अद्याप रुळांवर आली नसली, तरीही या रेल्वेच्या आरक्षणाला मात्र उत्तम प्रतिसाद मिळाल्याचे प्रशासनाचे म्हणणे. ही ‘ग्रँड टूर’ नवतंत्रज्ञान उभारण्याच्या कौशल्याकडेही औद्योगिक क्षेत्राचे लक्ष वेधून घेईल. यासोबतच जेव्हा-जेव्हा ‘डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन’चा विचार केला जाईल, तेव्हा तेव्हा अशा नावीन्यपूर्ण संकल्पनांकडे जगाचे लक्ष वेधले जाईल, हे नक्की. भारतातही ’डेक्कन ओडिसी’ ही एक्सप्रेस ट्रेन सेवा ही अशीच एक अभूतपूर्व प्रवासाची अनुभूती देणारी रेल्वेसेवा. ही रेल्वे राजवाड्याच्या भव्य सजावटीसह आणि ऐश्वर्यसंपन्नेतचा अनुभव प्रवाशांना देते. यासोबतच ’व्हेनिस सिम्पलॉन ओरिएंट एक्स्प्रेस’ने आपल्या संपूर्ण इतिहासात हॉलीवूडच्या सेलिब्रिटींपासून लेखक, राजदूत आणि राजघराण्यांपर्यंत अनेक प्रतिष्ठित पाहुण्यांना सैर घडविली आहे.

‘रोव्होस रेल’ ही संपूर्ण दक्षिण आफ्रिकेतील बेस्पोक ट्रेन सफारी. 1986 मध्ये दक्षिण आफ्रिकेतील निसर्ग संपन्न जंगलातील वाटेतून धावणार्‍या विंटेज कॅरेज चालविणे ही संकल्पना सुचल्यापासूनच ‘रोव्होस रेल’ एक गेमचेंजर ठरली आहे. ’ला डॉल्से व्हिटा ओरिएंट एक्सप्रेस’ ही गर्दीपासून दूर स्वतःचे अस्तित्व शोधू इच्छिणार्‍या लक्झरी प्रेमींसाठी पर्वणी ठरते. ‘गोल्डन ईगल डॅन्यूब’ हे मध्य आणि पूर्व युरोपचे लक्झरी प्रवास तिकीट. ही रेल्वे एक आलिशान ‘हॉटेल ऑन व्हील्स’चा अनुभव देते, जो तुम्हाला युरोपमधील ‘अ’ दर्जाच्या हॉटेल्समध्ये ऑफ-ट्रेन मुक्कामासह युरोपमधील सर्वात प्रेक्षणीय शहरांची सफर घडविते.

Powered By Sangraha 9.0