‘अॅनिमल’ चित्रपटामुळे अभिनेत्री तृप्ती डिमरी ही देशभरातीलच नव्हे, तर जगभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचली. आजवर तिने ‘लैला मजनू’, ‘पॉस्टर बॉईज’, ‘बुलबुल’, ‘क्वाला’ या चित्रपटांमध्ये विविधांगी भूमिका साकारल्या आहेत. तसेच, आगामी ‘धडक 2’, ‘भूलभूलैय्या 3’, या चित्रपटांतही ती झळकणार असून सध्या ती ‘बॅड न्यूज’ या चित्रपटांमुळे चर्चेत आहे. या चित्रपटाच्याच निमित्ताने दै. ‘मुंबई तरुण भारत’ने तृप्ती डिमरीशी साधलेला हाव विशेष संवाद.
अभिनयाचा प्रवास कसा सुरू झाला, याबद्दल बोलताना तृप्ती म्हणाली की, “गंभीर प्रसंग किंवा प्रेक्षकांच्या डोळ्यांत अश्रू आणणं तसं सोप्पं असतं, पण प्रेक्षकांना खळखळून हसवणं हे मात्र फार जोखमीचं काम. ज्यावेळी ‘बॅड न्यूज’ या चित्रपटाची कथा मला ऐकवली, त्यावेळी मी विचार केला की आत्तापर्यंत मी विनोदी बाजाची एकही भूमिका केली नसल्यामुळे स्वत:ला अभिनेत्री म्हणून मी आव्हान देऊन ते स्वीकारण्याचा निर्णय घेतला. कारण, आजवर ‘लैला-मजनू’, ‘बुलबुल’, या चित्रपटांत मी साकारलेल्या भूमिका हा माझा एक अभिनयाचा कोश तयार झाला होता. त्यामुळे आता माझ्यासमोर कोणतीही भूमिका दिली तरी ती मी साकारू शकते. संभ्रम डोक्यात निर्माण झाला होता. पण, विनोदी भूमिका ज्यावेळी समोर आली आणि ती साकारण्यासाठी मी कॅमेर्यासमोर उभी राहिले, त्यावेळी लक्षात आलं की अभिनेत्री म्हणून मला अजूनही खूप मोठा पल्ला गाठायचा आहे.”
प्रत्येक चित्रपटात आपण साकारत असलेल्या भूमिकेबद्दल माहिती कशी मिळवावी, याबद्दल बोलत असताना ‘बॅड न्यूज’ चित्रपटाचा उल्लेख करत तृप्ती म्हणते, “ ‘बॅड न्यूज’ या चित्रपटात मी गर्भवती महिलेची भूमिका साकारली आहे. ज्यावेळी लहान मूल किंवा महिलांसंबंधीचे संवेदनशील विषय चित्रपटाच्या माध्यमातून हाताळायचे असतात, त्यावेळी कलाकार म्हणून खूप मोठी जबाबदारी असते. कारण, बहुतांशी भूमिका या वैयक्तिक जीवनात तुम्ही अनुभवल्या नसल्यामुळे त्या पडद्यावर कशा साकारायच्या, हा प्रश्न उभा असतो. त्यामुळे या चित्रपटातील भूमिकेबद्दल बोलायचे झाल्यास, मी माझ्या बहिणीशी आणि इतर जवळच्या महिलांशी संवाद साधला. गरोदरपणात शारीरिक, मानसिक कसे बदल होतात, याची माहिती घेतली, अभ्यास केला आणि मगच त्या भूमिकेला माझ्यापरिने न्याय देण्याचा प्रयत्न केला.”
“मातृत्व किंवा आई होण्याची संपूर्ण प्रक्रिया किंवा हा प्रवास धार्मिक असतो, असे म्हटले जाते. अर्थात, वैयक्तिक जीवनात असा अनुभव अद्याप न आल्यामुळे त्याव्यतिरिक्त मी धार्मिक आहे; पण माझी निसर्गावर अधिक श्रद्धा आणि आस्था आहे. मला एक आठवण सांगावीशी वाटते. एका चित्रपटाच्या निमित्ताने राजस्थानमध्ये चित्रीकरण सुरू होतं. चित्रीकरण झाल्यावर एका डोंगरावर आम्ही सगळे सूर्यास्त पाहायला गेलो होतो. जेव्हा तो क्षण आम्ही सगळेच अनुभवत होतो, त्यावेळी मला मी देवाला पाहत आहे किंवा त्यांचं अस्तित्व माझ्याभोवती आहे, असं मला जाणवत होतं. त्या क्षणाला मला जाणीव झाली क, कुणालाही देव दिसतो किंवा त्याचं अस्तित्व जाणवतं. त्याची परिभाषा ही नेमकी काय असते, असे म्हणत निसर्ग हा माझा देव आहे,” असेही तृप्ती म्हणाली.
मराठमोळा अभिनेता श्रेयस तळपदे याच्यासोबत तृप्तीने ‘पोस्टर बॉईज’ या चित्रपटात काम केले होते. त्या चित्रपटाची आठवण सांगताना ती म्हणाली की, “त्या चित्रपटाच्या वेळी मला अभिनय बिलकूल येत नव्हता. तेव्हा मी ‘संतुर’च्या जाहिरातीसाठी मुळात मुंबईला आले होते आणि त्या जाहिरातीच्या ऑडिशनदरम्यान मला ‘पोस्टर बॉईज’ चित्रपटाची ऑफर आली होती आणि मी त्या चित्रपटाचा भागदेखील झाले. तेव्हा असा विचार डोक्यात आला की, अभिनेत्री होणं इतकं सोप्पं असतं? पण, जेव्हा चित्रीकरण सुरू झालं, तेव्हा माझी भंबेरी उडाली. मला कॅमेरा अँगल, तांत्रिक ज्ञान काहीच नव्हतं. त्यावेळी स्वत:चं मी आत्मपरीक्षण केलं आणि आपल्याला या क्षेत्राबद्दल अधिक माहिती आणि अभ्यास करणं गरजेचं आहे, याची जाणीव झाली आणि मी पुण्यात अभिनयाचे धडे घेऊन पुन्हा चित्रपटक्षेत्राच्या मैदानात उतरले.” तसेच, आजवर साकारलेल्या भूमिकांबद्दल बोलताना तृप्ती म्हणाली की, “प्रत्येक भूमिकेतून कलाकार आणि माणूस म्हणून मला नवीन काय शिकायला मिळेल, यावर माझा कायम भर असतो.” आत्तापर्यंत स्वत:च्या दोष आणि चांगुलपणाची गोळाबेरीज मीच केल्याचेदेखील तृप्तीने म्हटले. तसेच, “प्रत्येक भूमिकेबद्दल संबंधित चित्रपटाच्या दिग्दर्शकासोबत बसून त्याचा अभ्यास करणे आणि जितकी स्वत:ला ओळखते तितकीच त्या पात्राची ओळख स्वत:ला असेल, तर भूमिकेला न्याय देता येतो,” असंदेखील तृप्ती स्पष्टपणे म्हणाली.
‘अॅनिमल’ चित्रपटाचा भाग कशी झाले आणि त्यानंतर मिळालेली प्रसिद्धी याकडे कसे पाहते, असे विचारले असता तृप्ती म्हणाली की, “ ’अॅनिमल’ असो किंवा ‘गुड न्यूज’ आणि अन्य पुढील चित्रपट या सगळ्यांचे श्रेय ‘बुलबुल’ या चित्रपटाला जाते. कारण, तो चित्रपट पाहिल्यानंतरच मला संदीप रेड्डी वांगा यांनी ‘अॅनिमल’ चित्रपटातील छोटी पण प्रभावशाली भूमिकेची ‘ऑफर’ दिली होती. ज्यावेळी मी संहिता वाचली, तेव्हा त्या भूमिकेचा कमी कालावधीचा ‘स्क्रीन टाईम’ मला चिंतेत पाडणारा होता. पण, दिग्दर्शकांना विश्वास होता की, ही भूमिका माझ्यासाठी ‘गेम चेंजर’ ठरेल आणि तसंच झालं. ‘अॅनिमल’मधील माझी भूमिका प्रेक्षकांना अत्यंत भावली आणि पुन्हा मला नव्याने तृप्ती दिमरी म्हणून ओळख मिळाली. तसेच, आजही ‘अॅनिमल’ चित्रपटातील पात्राच्या नावाने किंवा माझ्या यापूर्वीच्या कोणत्याही चित्रपटातील भूमिकेच्या नावाने मला हाक मारली जाते, त्यावेळी मला आनंद होतो. कारण, खरोखर माझी भूमिका त्यांना लक्षात आहे आणि थोडीफार त्यांच्या मनात छाप सोडण्याचे काम माझ्याकडून झाले, याचे समाधान होते,” असेदेखील ती म्हणाली.
‘लैला मजनू’ हा पहिला चित्रपट ज्यावेळी केला, तेव्हा करिअरबद्दल किंवा अन्य कोणत्याही गोष्टीचं गांभीर्य नव्हतं. मात्र, आता ज्यावेळी लोक मला ओळखू लागले असल्यामुळे कलाकार म्हणून जबाबदारी आणि प्रेक्षकांच्या अपेक्षा वाढल्यामुळे कायमच काहीतरी चांगलं आपल्या चाहत्यांना द्यावं, याचा सातत्याने विचार सुरू असतो, असे म्हणत आठ वर्षांपूर्वीची तृप्ती आणि आत्ताची तृप्ती यातील फरक तिने सांगितला. तसेच, “माझ्या भाग्यात जी भूमिका किंवा चित्रपट विधात्याने लिहिला असेल, तो वाटेला येणार यावर माझा प्रचंड विश्वास आहे,” असेदेखील तृप्तीने आत्मविश्वासाने म्हटले.हिंदी चित्रपटसृष्टीची कोणतीही पार्श्वभूमी नसताना या क्षेत्रात पाऊल टाकणार्या कलाकारांना ‘आऊट साईडर’ म्हणून संबोधले जाते. तृप्तीचाही या क्षेत्रात येण्यासाठी कुणी ‘गॉड फादर’ किंवा मार्गदर्शक नव्हता. त्यामुळे अजूनही ती स्वत:ला ‘आऊट साईडर’ मानते का? असा प्रश्न विचारला असता ती म्हणाली की, “ ‘आऊट साईडर’ हा केवळ एक शब्द आहे. मी या शब्दाला फार गांभीर्याने घेत नाही. कारण, ज्या क्षणाला तुम्ही काम करण्यास सुरुवात करता, तेव्हा तुम्ही या क्षेत्राचा एक भाग होऊन जाता. ज्यावेळी मी काम करत नव्हते, तेव्हा नक्कीच ‘आऊट साईडर’ होते; पण जेव्हा पहिला चित्रपट केला, मी या चंदेरी दुनियेचा एक अविभाज्य भाग झाले आणि माझा नवा प्रवास सुरू झाला. तसेच, हिंदी चित्रपटसृष्टी असल्यामुळे हिंदी भाषेवरील प्रभुत्व का असावे,” याचे महत्त्व काम करताना जाणवत असल्याचे महत्त्वपूर्ण विधानही तृप्तीने केले.