‘म्हाडा ट्रान्झिट कॅम्प’चे वितरण अवैधरित्या होतेय का?

05 Jul 2024 13:46:39

mhada
 
मुंबई : ‘म्हाडा ट्रान्झिट कॅम्प’चे वितरण अवैधरित्या होतेय का, अशी शंका उपस्थित करीत, भाजप आमदार प्रसाद लाड यांनी त्याची चौकशी करण्याची मागणी गुरुवार, दि. 4 जुलै रोजी विधान परिषदेत केली. “मुंबईत ‘म्हाडा’अंतर्गत येणार्‍या ‘ट्रान्झिट कॅम्प’चा विषय आमदार प्रसाद लाड यांनी सभागृहात उपस्थित केला. सायन प्रतीक्षानगर येथील इमारत क्र. ‘टी’ 9, इमारत क्र. ‘टी’ 40 असेल किंवा यासह इतर इमारती असतील.
 
ओशिवरा अंधेरी येथील राघवेंद्र नवजीवन सोसायटीमध्येदेखील 200 गाळ्यांचे वितरण न विचारताच करण्यात आले आहे. याठिकाणी नागरिकांना अधिकारी सहकार्य करत नाहीत,” असेही लाड यांनी सांगितले. मुंबईतील हे ‘ट्रान्झिट कॅम्प’ इमारत दुरुस्तीसाठी वापरले जातात. परंतु काही ठिकाणी अधिकारी किंवा कर्मचार्‍यांकडून अवैधरित्या आर्थिक व्यवहार करून हे ‘कॅम्प’ दिले जात असल्याचे निदर्शनास आले आहे. कुठलीही पात्रता न तपासता याबाबत निर्णय घेतले जातात.
 
“मुंबईतील काही ‘म्हाडा ट्रान्झिट कॅम्प’चे वितरण अवैधरित्या होत असून, याची सखोल चौकशी व्हावी,” अशी विनंती आमदार लाड यांनी उपसभापती नीलम गोर्‍हे आणि गृहनिर्माणमंत्री अतुल सावे यांच्याकडे केली. या ‘ट्रान्झिट कॅम्प’चे पारदर्शक पद्धतीने वितरण सुरु करावे. मास्टर लिस्टची प्रक्रिया तत्काळ सुरू केली जावी. नागरिकांना त्रास देणार्‍या अधिकार्‍यांवर कारवाई करावी, अशी मागणीदेखील लाड यांनी केली आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0