"राजकारण हे क्रिकेटसारखंच, कोण, कुणाची..."; मुख्यमंत्री शिंदेंची फटकेबाजी

05 Jul 2024 18:36:56
 
Shinde
 
मुंबई : टी-२० विश्वचषक विजेत्या संघातील चार खेळाडूंचा शुक्रवारी विधानभवनात सत्कार करण्यात आला. यावेळी राजकारण हे क्रिकेटसारखंच असतं, असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी तुफान फटकेबाजी केली. राज्य सरकारच्या वतीने संपूर्ण टीमला ११ कोटी रुपये देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
 
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, "काल मुंबईकरांनी दिवाळी-दसरा साजरा केला. या क्रिकेट टीममध्ये चार मुंबईचे खेळाडू होते याचा आम्हाला अभिमान आहे. खरंतर पाकिस्तानला हरवलं तेव्हाच अर्धा विश्वचषक जिंकलो होतो. सुर्यकुमारची कॅच क्रिकेटविश्वात अजरामर झाली आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही," असे ते म्हणाले.
 
हे वाचलंत का? -  रोहित शर्मा हा टी-२० चा जगातील यशस्वी कर्णधार : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
 
ते पुढे म्हणाले की, "राजकारण हे क्रिकेटसारखंच आहे. कधी, कुठे, कोण, कुणाची विकेट घेईल हे सांगता येत नाही. जशी सुर्यकुमारची कॅच कुणी विसरु शकणार नाही तसंच आमच्या ५० जणांच्या टीमने दोन वर्षांपूर्वी काढलेली विकेटही कधीच कुणी विसरु शकणार नाही. आम्हां राजकारण्यांची फिल्ड वेगळी आहे. कधी कोण कुणाची कॅच घेईल आणि कोण कुणाला रनआऊट करेल हे सांगता येत नाही. त्यामुळे आम्हालासुद्धा रोहित आणि सुर्यकुमारसारखी बँटिंग करावी लागते. चांगली बॅटिंग केली की, चांगलं रेटिंगही वाढतं. त्यामुळे आमच्या सभागृहातील सदस्य भाषणातून चौकार षटकार मारत असतात. हे विजेतेपद केवळ टी-२० पुरतं मर्यादित नाही तर डोळ्यात स्वप्न घेऊन गगनभराराची ईच्छा असणाऱ्या प्रत्येक भारतीयाच्या आकांक्षाचंही ते प्रतिक आहे," असे ते म्हणाले.
 
 
 
Powered By Sangraha 9.0