म्हाडा ट्रान्झिट कॅम्पचे वितरण अवैध्यरित्या होतेय का?

04 Jul 2024 18:01:44

mhada
 
मुंबई : म्हाडा ट्रान्झिट कॅम्पचे वितरण अवैध्यरित्या होतेय का, अशी शंका उपस्थित करीत, भाजप आमदार प्रसाद लाड यांनी त्याची चौकशी करण्याची मागणी गुरुवार, दि. ४ जुलै रोजी विधान परिषदेत केली. मुंबईत म्हाडाअंतर्गत येणाऱ्या ट्रान्झिट कॅम्पचा विषय आमदार प्रसाद लाड यांनी सभागृहात उपस्थित केला. सायन प्रतिक्षा नगर येथील इमारत क्र. टी९, इमारत क्र. टी४० असेल, किंवा यासह इतर इमारती असतील.
 
ओशिवरा अंधेरी येथील राघवेंद्र नवजीवन सोसायटीमध्ये देखील २०० गाळ्यांचे वितरण न विचारताच करण्यात आले आहे. याठिकाणी नागरिकांना अधिकारी सहकार्य करत नाहीत, असेही लाड यांनी सांगितले. मुंबईतील हे ट्रान्झिट कॅम्प इमारत दुरुस्तीसाठी वापरले जातात. परंतु काही ठिकाणी अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांकडून अवैध्यरित्या आर्थिक व्यवहार करून हे कॅम्प दिले जात असल्याचे निदर्शनास आले आहे.
 
कुठलीही पात्रता न तपासता याबाबत निर्णय घेतले जातात. मुंबईतील काही म्हाडा ट्रान्झिट कॅम्पचे वितरण अवैध्यरित्या होत असून, याची सखोल चौकशी व्हावी, अशी विनंती आमदार लाड यांनी उपसभापती नीलम गोऱ्हे आणि गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांच्याकडे केली. या ट्रान्झिट कॅम्पचे पारदर्शक पद्धतीने वितरण सुरु करावे. मास्टर लिस्टची प्रक्रिया तात्काळ सुरु केली जावी. नागरिकांना त्रास देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी देखील लाड यांनी केली आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0