आर्टी : सामाजिक न्यायाची सुवर्णसंधी

31 Jul 2024 22:16:06
arti social justice chance


आज लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे अण्णाभाऊ साठे संशोधन आणि प्रशिक्षण संस्था (ARTI)चे उद्घाटन होणार आहे. त्यानिमित्ताने ‘आर्टी’च्या स्थापनेचा आणि उद्दिष्टांचा मागोवा घेणारा लेख...

'तू गुलाम नाहीस, तर तू या जगाचा निर्माणकर्ता आहेस,’ असे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे म्हणाले होते. का? तर समाजातील दैन्य, नैराश्य जाऊन समाजाने कर्तृत्व जागवत उज्ज्वल भवितव्य घडवावे म्हणून! हे कसे घडेल, तर त्यासाठी समाजात तसे कर्तृत्ववान सकारात्मक विचारांचे युवक-युवती घडणे गरजेचे होते आणि आहे. तर लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या विचारांतील जगाचा निर्माणकर्ता होणारा समाज उभा राहणे गरजेचे. त्यासाठी समाजाचा सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक विकास महत्त्वाचा. साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठेंच्या विचारांतील समाज आणि साहित्यातील नीतीवान कर्तृत्ववान नायक-नायिका वास्तव स्वरूपात निर्माण व्हावे, यासाठी ठरवून प्रयत्न करणे आवश्यक होते. 2014 साली देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री झाले आणि त्यानंतर आता युतीचे सरकार आहे. या सबंध काळात मातंग समाजाच्या कल्याणासाठी असेच ठरवून प्रयत्न केले गेले, नियोजन केले आणि त्यातूनच महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून मातंग समाजाच्या उत्थानासाठी समर्पित ‘अण्णाभाऊ साठे संशोधन आणि प्रशिक्षण संस्था’ (आर्टी)ची निर्मिती झाली. ‘आर्टी’ म्हणजे अनुसूचित जातीच्या कल्याणासाठी स्थापन करण्यात आलेल्या ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्थे’चे (बार्टी) प्रतिबिंब.

मांग, मातंग, मिनिमादिग, दख्नी मांग, मांगम्हिशी, मदारी, गारुडी, राधेमांग, मांग-गरोडी, मांगगरुडी, माडगी आणि मडिगा यांसारख्या गटांचा विकास करण्यासाठी आणि त्यांना सक्षम करण्याच्या उद्देशाने ‘आर्टी’मध्ये संशोधन आणि प्रशिक्षण उपक्रम राबविले जाणार असणार आहेत. मातंग आणि संबंधित समाज घटकांचा सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, सांस्कृतिक आणि राजकीय विकास करणे, हे ‘आर्टी’चे प्राथमिक उद्दिष्ट. ‘आर्टी’च्या स्थापनेला कंपनी नोंदणी कायद्यांतर्गत मान्यता देण्यात आली आहे.

‘आर्टी’संदर्भात सामाजिक कार्यकर्ते आणि विचारवंतांशी संवाद साधला. नवनिर्वाचित आ. अमित गोरखे यांनी म्हटले की, “सर्वप्रथम लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीच्या दिवशीच ‘आर्टी’ संस्थेच्या कार्यवाहीचे उद्घाटन होणे, ही आनंदाची गोष्ट आहे. आम्ही निर्धार केला आहे की, 80 टक्के गुण मिळवून पदवी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे एकत्रीकरण करून त्यांना ‘आर्टी’च्या योजनांद्वारे भवितव्य घडवण्यासाठी सहकार्य करणार आहे. संधीपासून वंचित असलेल्या समाजबांधवांना उच्च शिक्षण आणि त्याद्वारे उज्ज्वल भवितव्य मिळायला हवे, असे माझे ध्येय आहे. हे ध्येय पूर्ण करण्यास ‘आर्टी’ची खूप मदत होणार आहे.” तर साहित्यिक आणि विचारवंत डॉ. धनजंय भिसे यांच्याशीही संवाद साधला. ‘आर्टी’च्या परिणामकारक कार्यवाहीसाठी काय करणे आवश्यक आहे, याबद्दल बोलताना त्यांनी अनेक मुद्दे मांडले. जसे - ब्रिटिश राजवटीमध्ये मातंग आणि तत्सम जातीजमातींवर ‘गुन्हेगार जात’ म्हणून शिक्का मारण्यात आला होता. हा शिक्का कायमचा पुसून टाकणारे संस्थेचे कार्य असावे.

देशात सुसंस्कृत, कौशल्यप्राप्त, विवेकवादी, ज्ञानी आणि कार्यक्षम नागरिक असतील, तर देशाची प्रगती होते. त्यामुळे एक देशभक्त व सुसंस्कृत नागरिक घडविण्यासाठी ‘आर्टी’ची भूमिका ही पुढील काळात अत्यंत महत्त्वाची असायला हवी. येणार्‍या काळात मातंग समाजासह त्यांच्या सर्व उपजात घटकांच्या सर्वांगीण प्रगतीला उपकारक ठरेल, अशी कार्यपद्धती असावी. तसेच, ‘आर्टी’चे दर पाच वर्षांसाठी योग्य ‘व्हिजन’ व ‘मिशन’ निश्चित करून मातंग समाजाच्या विकासाच्या ‘बॅकलॉग’च्या अनुशेष कसा भरून काढता येईल, यासाठीसुद्धा संस्थेचे कार्य असावे. मातंग व त्यांच्या उपजातींतील शैक्षणिक व संशोधनात्मक गुणवत्ता सुधारण्यासाठी आणि काळानुरूप बदलत जाणारे शिक्षण हवे, यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरील शैक्षणिक आणि इतर संस्थांबरोबर सामंजस्य व सहकार्य निर्माण करणे गरजेचे आहे. मातंग समाजाच्या धोरणात्मक विकासाठी पाऊले उचलण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. भारतीय ज्ञान परंपरेशी ‘आर्टी’ने आपली नाळ जोडली पाहिजे. या अनुषंगाने विविध स्पर्धा, परीक्षा, पूर्वप्रशिक्षण, एनडीए प्रवेशपरीक्षा पूर्वप्रशिक्षण, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश मिळवण्यासाठीचे पूर्वप्रशिक्षण या बाबींचा ‘आर्टी’ने पुढील काळात विचार करणे गरजेचे आहे. भाषा, साहित्य, कला, संस्कृती यांच्या विकासासाठी संस्थेने प्रयत्न केले पाहिजेत.

असो. हा देश, हा धर्म टिकवण्यासाठी, संवर्धित करण्यासाठी मातंग समाजाचे योगदान मोठे आहे. अनेक वर्षांच्या संघर्ष आणि समन्वयानंतर समाजाच्या विकासासाठी ‘आर्टी’च्या माध्यमातून संस्था उभी राहते आहे. “हा देश सुखी, समृद्ध आणि सभ्य व्हावा, इथे समानता नांदावी, या महाराष्ट्र भूमीचे नंदनवन व्हावे, अशी मला रोज स्वप्ने पडत असतात. ती मंगल स्वप्ने पाहात पाहात मी लिहित असतो,” असे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे म्हणाले होते. मातंग आणि समजातींना संधीची समानता उपलब्ध करणार्‍या आणि त्याद्वारे महाराष्ट्राचे विकासात्मक नंदनवन फुलवण्याची इच्छा असणारी ‘आर्टी’ संस्था. या संस्थेची स्थापना आणि कार्यवाही होणे हे समाज विकासासाठीचा मैलाचा दगड आहे. ‘आर्टी’निमित्त समाजबांधवाना शुभेच्छा. तसेच लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांनाही विनम्र अभिवादन!


मातंग समाजासाठी आजचा दिवस सुवर्णदिन

काँग्रेसच्या अनेक वर्षांच्या सत्ताकाळात मातंग समाजाच्या सर्वांगीण उत्थानासाठी काहीच ठोस कार्यवाही झाली नाही. मात्र, भाजपच्या आणि महायुतीच्या सत्ताकाळात मातंग समाजाचे शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक आणि राजकीय उत्थान कसे होईल, यासाठी सर्वंकष प्रयत्न केले गेले. त्या प्रयत्नांचे सुवर्णाक्षरांनी लिहावे, असे यश म्हणजे ‘अण्णाभाऊ साठे संशोधन आणि प्रशिक्षण संस्था’ (आर्टी). ‘आर्टी’च्या माध्यमातून समाजातून प्रशासकीय अधिकारी निर्माण होतील, समाज सर्वार्थाने प्रगतिपथावर येण्याचा हा एक राजमार्ग आहे, असे मला वाटते. हिंदुत्व जपणार्‍या आणि जगणार्‍या मातंग समाजासाठी आजचा दिवस सोन्याने लिहावा असा आहे. ‘आर्टी’च्या एकंदर जडणघडणीमध्ये महायुतीची भूमिका आहे. मात्र, लोकनेते देवेंद्र फडणवीस यांचे योगदान शब्दातीत आहे. समाजातर्फे मी आभार मानतो.
अमित गोरखे, आमदार, विधान परिषद


समाजाच्या इच्छा-आकाक्षांचे प्रतिबिंब

‘आर्टी’ ही केवळ एक संशोधन व प्रशिक्षण संस्था नसून ही मातंग समाजाच्या एकत्रित आंदोलनाच्या यशस्वी लढ्याच्या इच्छा-आशा-आकांक्षांचे आणि विकासाच्या स्वप्नाचे प्रतिबिंब आहे. ‘आर्टी’ची निर्मिती करून मागास मांग, मातंग समाज व त्याच्या उपजातींतील लोकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे हितकारी पाऊल महाराष्ट्रातील शिंदे, फडणवीस, पवार सरकारकडून उचलले जात आहे. हे सर्व म्हणजे मातंग समाजाच्यादृष्टीने अत्यंत आनंदाची बाब आहे. विशेषतः देवेंद्र फडणवीस यांनी ‘आर्टी’च्या निर्मिती आणि अंमलबजावणीमध्ये सामाजिक न्यायाच्या भूमिकेतून जी सुसूत्रता आणली, त्याबद्दल त्यांचे विशेष अभिनंदन आणि धन्यवाद!
डॉ. धनंजय भिसे, संस्थापक, अध्यक्ष - मातंग साहित्य परिषद, पुणे


सामाजिक न्याय मिळाला!
महाराष्ट्र शासनाने ‘आर्टी’ स्थापन करण्याचा निर्णय जाहीर केला आणि समस्त मातंग समाजाला सामाजिक न्याय मिळाला. अनुसूचित समाजाच्या विकासासाठी ‘बार्टी’ संस्था कार्यरत होती. मात्र, मातंग समाज आणि संबंधित जातींतील विद्यार्थ्यांना थेट आयपीएस, आयएएस अधिकारी होणे, हे एक दिवास्वप्न असायचे. मातंग समाजाचे कैवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मातंग समाजाने ‘बार्टी’च्या धर्तीवर ‘आर्टी’ असावी, अशी मागणी केली होती. ती मागणी पूर्ण झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना धन्यवाद. समाजातील युवकांच्या स्वप्नांना पंख दिले.
शंकर कांबळे, राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य, अनुसूचित मोर्चा, भाजप


महिलांनाही सुवर्णसंधी

मातंग समाजातील अनेक विद्यार्थिनींना, महिलांना सक्षम होण्याची संधी ‘आर्टी’द्वारे मिळणार आहे. शिक्षण, नोकरी, व्यवसाय यांमध्ये स्वसामर्थ्य निर्माण करण्याची क्षमता वृद्धिंगत होण्यासाठी, मुली-महिलांमध्ये आत्मविश्वास खर्‍या अर्थाने निर्माण करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तसेच अजितदादा पवार यांनी केले आहे. खूप खूप धन्यवाद. मातंग समाजातील मुलींचे सर्वोच्च शिक्षण घेण्याचे व सर्वोच्च पदापर्यंत पोहोचण्याचे स्वप्न साकार होणार आहे, याचा खूप आनंद होत आहे.
उज्ज्वला हतांगळे, सामाजिक कार्यकर्ता, समाज अभ्यासक


‘आर्टी’ नव्हे, समाजाच्या विकासाचा मार्गच!

‘बार्टी’च्या धर्तीवर ‘आर्टी’ची स्थापना होणे, ही आमच्यासाठी आनंदाची आणि अभिमानाची घटना आहे. समाजातले गुणवान युवक-युवती प्रशासकीय पदावर आरूढ होणे आणि त्यांच्या हाती कार्यवाहीची चावी येणे, हे समाजाच्या प्रगतीसाठी आवश्यक होते. मातंग समाजात अनेक पोटजाती आहेत. ‘आर्टी’मुळे या तमाम पोटजातींनाही न्याय मिळेल. समानतेची संधी मिळेल. आज आमचे दैवत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त ‘आर्टी’च्या कार्यवहीला खूप खूप शुभेच्छा!
ज्योती साठे, अध्यक्ष, दिशा ज्योत फाऊंडेशन


9594969638
Powered By Sangraha 9.0