मुंबई (विशेष प्रतिनिधी) : केरळच्या वायनाडमध्ये (Wayanad Landslide RSS) मंगळवार, दि. ३० जुलै रोजी रात्री झालेल्या भूस्खलनात सुमारे ५० घरे जमीनदोस्त झाल्याची माहिती आहे. मृतांचा आकडा सातत्याने वाढत असून या दुर्घटनेत मृतांची संख्या १५० वर पोहोचल्याचे वृत्त स्थानिक माध्यमांनी दिले. सुमारे १०० लोक अद्याप बेपत्ता असून, त्यांचा शोध सुरू आहे. एनडीआरएफ, लष्कर, हवाई दल आणि केरळ पोलीस प्रशासन यांच्यासोबतच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक सुद्धा भूस्खलनातील आपद्ग्रस्तांच्या मदत आणि बचावकार्यात गुंतले असल्याचे पाहायला मिळत आहे.
हे वाचलंत का? : उरण हत्या प्रकरणात मोठी अपडेट! दाऊद शेखला ७ दिवसांची पोलिस कोठडी
संघाचे तसेच सेवा भारतीचे स्वयंसेवक सकाळी ठीक ८ वाजल्यापासून मतकार्यात सहभागी झाले आहेत. मदतकार्यात समन्वय साधण्यासाठी मेपपडी येथे हेल्पडेस्क उभारण्यात आला आहे. सेवा भारती आणि पीपीलच्या दोन रुग्णवाहिका सेवा देत आहेत. आतापर्यंत ४८० हून अधिक लोकांना वाचवण्यात यश आले आहे. बचावलेल्या लोकांवरही उपचार सुरू आहेत. वायनाडमध्ये अनेक ठिकाणी मदत शिबिरे उभारण्यात आली असून यात ३ हजार हून अधिक लोकांना ठेवण्यात आले आहे.
त्यासोबतच मानंथवाडी येथील विश्व हिंदू परिषदेच्या पजहस्सी बालमंदिरातून शेकडो लोकांसाठी अन्न तयार करून घटनास्थळी नेण्यात आले. वायनाडमधील सेवा भारतीचे चिताग्नी युनिट रात्रीच्या वेळीही अंत्यसंस्कार करत होते. तामिळनाडूच्या निलगिरी जिल्ह्यातील स्वयंसेवकांनी रात्रीच्या वेळी जेवणाची व्यवस्था केली.