मुंबई : अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे अध्यक्ष श्याम मानव यांनी मंगळवारी उद्धव ठाकरेंची भेट घेतली आहे. यावेळी त्यांनी विधानसभा निवडणूकीत महाविकास आघाडीला पाठिंबा देणार असल्याचे जाहीर केले आहे. तसेच महाराष्ट्रभर सभा घेणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. ते एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी बोलत होते.
श्याम मानव म्हणाले की, "लोकसभा निवडणूकीच्या आधी मी विदर्भात ३६ सभा घेतल्या. संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी महाविकास आघाडीला मतदान करा असं आवाहन मी केलं होतं. अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मुलन समिती आणि इतर काही सामाजिक संघटनांनी मिळून आम्ही काही निर्णय घेतले आहेत. यामध्ये संविधान बचाओ, महाराष्ट्र बचाओ असे एक अभियान आम्ही सुरु करत आहोत. याद्वारे सामाजिक संघटनांचे लोक एकत्र येऊन जनतेपुढे आम्ही आमची भूमिका मांडू. आम्ही महाराष्ट्रभरात ५०० सभा घेणार आहोत. यासंदर्भात बोलण्यासाठी मी उद्धव ठाकरेंकडे आलो होतो," असे त्यांनी सांगितले.
हे वाचलंत का? - टोयोटा करणार २० हजार कोटींची गुंतवणूक! महाराष्ट्रासाठी गेमचेंजर ठरणारा प्रकल्प
ते पुढे म्हणाले की, "यावेळी विविध मुद्यांवर तासभर आमची चर्चा झाली. आम्ही लोकसभेच्या आधीही इंडिया आघाडीचं समर्थन केलं होतं आणि आताही करणार आहे. सध्या महाराष्ट्रापुढे आणि देशापुढे संविधानाचे प्रश्न निर्माण झाले आहेत. जनतेच्या दृष्टीने हा अतिशय गंभीर मुद्दा आहे. त्यामुळे आम्ही यापद्धतीचा निर्णय घेतला असून त्यादिशेने पावलं उचलत आहोत. यावेळी अनिल देशमुखांच्या विषयावर आमच्यात कोणतीही चर्चा झाली नाही," असेही ते म्हणाले.