मुंबई : कार उत्पादन क्षेत्रातील अग्रगण्य 'टोयोटा किर्लोस्कर' कंपनी महाराष्ट्रात तब्बल २० हजार कोटींची गुंतवणूक करणार आहे. छत्रपती संभाजीनगर येथील ऑरिक सिटीमध्ये हा प्रकल्प उभारला जाणार असून, त्यात इलेक्ट्रिक आणि हायब्रीड वाहनांचे उत्पादन होणार आहे. सह्याद्री अतिथिगृहावर बुधवार, दि. ३१ जुलै रोजी उद्योग विभाग आणि टोयोटा किर्लोस्कर यांच्यात इलेक्ट्रिक आणि हायब्रीड कार निर्मितीच्या ग्रीनफिल्ड प्रकल्पासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली.
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, उद्योग मंत्री उदय सामंत, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, किर्लोस्कर मोटर्सच्या उपाध्यक्ष मानसी टाटा, गीतांजली किर्लोस्कर, टाटा किर्लोस्करचे व्यवस्थापकीय संचालक मसाकाझु योशीमुरा, यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. छत्रपती संभाजीनगर येथे टोयोटा किर्लोस्करच्या प्रकल्पामुळे मराठवाड्याला मोठा फायदा होईलच, शिवाय एकूणच भारतातील मोटार वाहन निर्मिती उद्योगात देखील एक क्रांती येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले.
१६ हजार रोजगार निर्माण होणार
छत्रपती संभाजीनगर येथे या प्रकल्पातून इलेक्ट्रिक आणि हायब्रीड कार्सचे उत्पादन होणार आहे. यासाठी २० हजार कोटींची गुंतवणूक केली जाणार असून, सुमारे ८ हजार थेट आणि अप्रत्यक्ष ८ हजार अशी १६ हजार रोजगार निर्मिती होणार आहे. या प्रकल्पातून वर्षाला ४ लाख कार्सची निर्मिती होणे अपेक्षित आहे. या प्रकल्पासाठी ८५० एकर जागा देण्यात आली आहे.
टोयोटा आल्याने अपूर्णता संपली - देवेंद्र फडणवीस
राज्यात अनेक ऑटोमोबाईल सेक्टर आहेत, पण टोयोटा नसल्याने ते अपूर्ण होते. आता राज्यात टोयोटा असल्याने हे सेक्टर पूर्ण झाले आहे. मराठवाड्यातील चेंबर ऑफ कॉमर्स समूह या उद्योगासाठी शासनाच्यावतीने सर्वतोपरी सहकार्य करेल. या गुंतवणुकीमुळे मराठवाड्यात रोजगार निर्मिती तर होणारच आहे पण आर्थिक प्रगतीही साध्य होणार आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात आम्ही राज्याची अर्थव्यवस्था १ ट्रिलियन डॉलर करण्याकडे वाटचाल सुरु केली आहे. हा करार अर्थव्यवस्था वाढीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यास महत्त्वपूर्ण ठरणार आहे. राज्यात जेएनपीटीसारखे बंदर आहे आणि त्याच्या तीनपट मोठे वाढवणं बंदर होणार आहे.
हे देशातील सर्वात मोठे बंदर ठरणार आहे. तसेच जालनामध्ये ड्राय पोर्ट होणार आहे. निर्यातीसाठी उत्तम असल्याने मराठवाड्यात गुंतवणूक म्हणजे निर्यातीच्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.