भारताला ऑलिम्पिकमधील पहिले वैयक्तिक क्रीडाप्रकारातील ऑलिम्पिक पदक जिंकून दिले ते महाराष्ट्राच्या खाशाबा जाधव यांनी. आपल्या या महाराष्ट्राच्या मातीची रगच न्यारी आहे. कुण्या कवीने म्हटले आहे, “वळून कुणी पाहिले नाही, म्हणून माळरानावरच्या चाफ्याचे अडले नाही. शेवटी पानांनीही साथ सोडली म्हणून पठ्ठ्याने बहरणे सोडले नाही.”
खाशाबा काय किंवा यंदाच्या ऑलिम्पिकसाठी पॅरिसमध्ये दाखल झालेला महाराष्ट्राचा तिरंदाज प्रवीण जाधव काय दोघेही महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात जन्मलेले, परंतु स्वप्न उंच आकाशी झेप घेण्याचे. योगायोग म्हणजे दोघेही सातार्याचे. ग्रामीण भागात जेथे शैक्षणिक सुविधेची वानवा तेथे क्रीडा संस्कृती वगैरे शब्द म्हणजे चैनच झाली. तरीही सातार्याचे खाशबा हेलिसिंकी ऑलिम्पिकला धडकले आणि कुस्तीतील ऑलिम्पिकचे कांस्य पदक जिंकले. याच खाशाबांचा वसा हाती घेतलेल्या सातार्याच्याच सरडे गावातील प्रवीण जाधव आज पॅरिस ऑलिम्पिकमध्ये धडकला आहे. प्रवीण जाधवमुळे आज गुगल मॅपवर सरडे टाईप केले, की सातार्यातील जाधव वस्तीचे गाव झळकते.
याच सरडे गावातील झोपडीत बालपण गेलेल्या प्रवीण जाधवने तिरंदाजीत कमाल केली आहे. भारतीय ऑलिम्पकला पात्र ठरणारा तो पहिला तिरंदाज आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये पदकाने त्याला थोडक्यात हुलकावणी दिली होती. हे त्याचे दुसरे ऑलिम्पिक आहे. आज पॅरिसच्या तिरंदाजी स्टेडियमवर त्याची भेट झाली. जग जिंकायला निघालेल्या नेपोलियन बोनापार्टच्या समाधीसमोर हे तात्पुरते स्टेडियम उभारण्यात आले आहे. प्रवीणला याची आठवण करून देताच तो हसला. “सर कायबी करून, जग यंदा जिंकाचेच.” प्रवीणच्या शब्दाशब्दांतून त्याची तिरंदाजीप्रति असणारी समरसता जाणवत होती.
पुरुषांच्या टीम गेममध्ये उप-उपांत्य फेरीमध्ये भारताला तर्कीकडून 6-2 असा पराभव पत्करावा लागला. पण, त्यात प्रवीणने कडवी झुंज दिली. त्याच्या आठ प्रयत्नांत त्याने तब्बल चारवेळा नेमके दहा गुण वसूल केले. तर, तरुणदीप रॉय आणि बोम्मादेवरा यांनी मिळून फक्त तीनवेळा नेमके दहा गुण वसूल केले. यावरून प्रवीणची झुंज लक्षात येईल. टीमगेममध्ये प्रवीण हरला असला, तरी अजून एकेरीतील त्याचे आव्हान शाबूत आहे. ‘यंदा ऑलिम्पिक पदक जिंकायचेच’ ही जिद्द बाळगून प्रवीण पॅरिसमध्ये दाखल झाला आहे. सातार्याच्या सरडे गावातील हा छोरा यशोशिखरावर पोहोचणार याबद्दल दुमत नाही. प्रसिद्ध शायर वसीम बरेलवी यांच्या शब्दांत सांगायचे झाले तर, “जहा रहेगा वही रोशनी लुटायेगा... किसी चिराग का अपना घर नही होता.”