दागिने, किराणा सामान अन् ‘इतक्या’ लाखांचा चेक…; अंबानी कुटुंबाने सामूहिक विवाह सोहळ्यात ५० गरीब जोडप्यांना दिल्या भेटवस्तू

03 Jul 2024 13:41:52
 
ambani
 
 
 
मुंबई : सुप्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांच्या घरात लवकरच ढोल-ताशे वाजणार आहेत. त्यांचा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट १२ जुलै रोजी विवाहबद्द होणार आहेत. त्यामुळे सध्या अनंत-राधिकाच्या लग्नासाठी अंबानी कुटुंबाची लगबग सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. लग्नाआधीच्या कार्यक्रमांना सुरुवात झाली असून २ जुलैला मुकेश अंबानींनी ५० गरीब जोडप्यांचं लग्न लावून दिलं आहे. या सामूहिक विवाह सोहळ्यात अंबानी कुटुंबीयांनी हजेरी लावत जोडप्यांना भेटवस्तू दिल्या आहेत.
 
मिळालेल्या माहितीनुसार, अंबानी कुटुंबाने प्रत्येक जोडप्याला मंगळसूत्र, कानातले, नथ, अंगठी असे सोन्या-चांदीचे दागिने दिले आहेत. त्याशिवाय प्रत्येक जोडप्याला १ लाख १ हजाराचा चेक देखील दिला असून वर्षभरासाठी किराणा सामान, घरगुती वस्तू देखील दिल्या आहेत; ज्यातभांडी, गॅस, मिक्सर, गादी, उशा इत्यादी ३६ प्रकारच्या जीवनावश्क वस्तू अंबानी कुटुंबाकडून देण्यात आल्या.
 
तसेच, या सामूहिक विवाह सोहळ्याला उपस्थित असलेल्या पाहुण्यांसाठी भव्य भोजन सोहळा आयोजित करत स्वत: अन्नसेवा देखील केली. आता १२ जुलैला अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांचं हिंदू पद्धतीनं लग्न होणार आहे. त्यानंतर १३ जुलैला शुभ आशिर्वादाचा कार्यक्रम होणार असून १४ जुलै रोजी कलाकारांसाठी रिसेप्शन सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
Powered By Sangraha 9.0