अशाप्रकारे जर जीन्स टी-शर्टवर बंदी आली तर विद्यार्थी रस्त्यावर उतरतील!

03 Jul 2024 12:59:11
 
Pratap Sarnaik
 
मुंबई : जर जीन्स आणि टी शर्टवर बंदी आली तर विद्यार्थी रस्त्यावर उतरतील, असा कडक इशारा शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी चेंबुरच्या आचार्य आणि मराठे महाविद्यालयाला दिला आहे. आचार्य आणि मराठे महाविद्यालयाने विद्यार्थ्यांना जीन्स आणि टीशर्ट घालण्यास मनाई करणारे परिपत्रक काढले. यावर प्रताप सरनाईक यांनी कारवाईची मागणी केली आहे.
 
प्रताप सरनाईक म्हणाले की, "आचार्य आणि मराठे महाविद्यालयामध्ये काल एक परिपत्रक काढण्यात आलं आणि यात विद्यार्थ्यांच्या गणवेशावर गदा आणण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात जीन्स आणि टी-शर्ट परिधान करु नये, असे या परिपत्रकात म्हटले आहे. अनेक पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी याला विरोध केला आहे. चेंबुरच्या आचार्य आणि मराठे महाविद्यालयात ज्यापद्धतीने हे परिपत्रक काढलं तसंच जर मुंबई किंवा महाराष्ट्रातील इतर विद्यालयांनी काढलं तर कदाचित विद्यार्थी रस्त्यावर उतरतील."
 
हे वाचलंत का? -  पुणे अपघात प्रकरण! वडील आणि आजोबाला जामीन मंजूर, पण विशाल अग्रवाल...
 
"हिजाब ही वेगळी गोष्ट आहे आणि जीन्स, टी-शर्ट व जर्सी परिधान करणं ही वेगळी गोष्ट आहे. उद्या जर स्पोर्ट्स डे असेल तर स्विमींगचा गणवेश, खेळाडूंचे टीशर्ट आणि शॉर्ट्सवर तुम्ही बंदी घालणार आहात का? त्यामुळे तालिबानी वटहुकुम काढल्यासारखं परिपत्रक मुंबईतील आचार्य आणि मराठे महाविद्यालयाने काढलं आहे. मी यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं असून सभागृहातसुद्धा यावर मी आवाज उठवणार आहे," असे ते म्हणाले.
 
ते पुढे म्हणाले की, "देशातच नाही तर परदेशातसुद्धा ७० ते ८० टक्के तरुण मुलं मुली जीन्स टीशर्ट परिधान करत असताना मुंबईच्या एका महाविद्यालयात हिजाब बंदीवरून जर जीन्स टीशर्टवर बंदी आणण्यात येत असेल तर हा लोकशाहीचा खून आहे. विद्यार्थ्यांच्या अधिकारावर गदा आणण्याचा प्रकार या महाविद्यालयाने केला आहे. त्यामुळे त्यांनी आणलेली बंदी काढावी आणि अशा प्रकारे तालीबानी हुकुम काढणाऱ्या व्यवस्थापकावर आणि संस्था चालकावर कारवाई करावी. मला मिळालेल्या माहितीनुसार, स्वत:ला पत्रकार म्हणवणारे आणि संपादक असणारे लोक यामागे आहेत. ते जाणूबुजून महाविद्यालयावर दबाव आणून परिपत्रक काढायला भाग पाडत आहेत. त्यामुळे आम्ही त्यांचा निषेध करतो आणि यावर कारवाई करण्याची मागणी करतो," असेही ते म्हणाले.
 
 
 
Powered By Sangraha 9.0