१९९३ च्या मुंबई दंगलीतील आरोपी नादिर शाहला ३१ वर्षानंतर अटक; 'हे' आहेत आरोप

03 Jul 2024 12:33:23
 arrested
 
मुंबई : अयोध्येतील बाबरी ढाचा पाडल्यानंतर देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत जातीय दंगली उसळल्या होत्या. या दंगलींमध्ये सुमारे ९०० लोक मारले गेले. या दंगलीतील आरोपी सय्यद नादिर शाह अब्बास खान याला ३१ वर्षानंतर मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्यावर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल आहे.
 
दंगलीच्या वेळी त्याला अटक करण्यात आली होती, मात्र जामीन मिळाल्यानंतर तो फरार झाला आणि कोणत्याही न्यायालयीन कामकाजात सहभागी झाला नाही, त्यानंतर त्याच्याविरुद्ध दीर्घकाळ अटक वॉरंट जारी करण्यात आले, परंतु तो पोलिसांच्या हाती लागला नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सय्यद नादिर शाह अब्बास खान (६५) याला सोमवारी शिवडी परिसरातून रफी अहमद किदवई मार्ग पोलिस स्टेशनच्या पथकाने पकडले.
  
शहरात उसळलेल्या दंगलीत हत्येचा प्रयत्न आणि बेकायदेशीरपणे जमलेल्या गुन्ह्यात तो आरोपी आहे. अधिकाऱ्याने सांगितले की, खानला यापूर्वी पोलिसांनी अटक केली होती आणि जामीन मिळाल्यानंतर तो फरार झाला आणि कधीही न्यायालयीन कामकाजात सहभागी झाला नाही.
 
अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, न्यायालयाने खानला फरार घोषित केले होते आणि त्याच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते. मध्य मुंबईतील शिवडी येथील त्याच्या घरी पोलिसांनी अनेकदा छापेमारी केली, मात्र तो सापडला नाही. अखेर त्याच्या एका नातेवाईकाचा मोबाईल तपासत असताना पोलिसांना त्याचा ठावठिकाणा लागला. दि. २९ जून रोजी रफी अहमद किडवाई मार्ग पोलीस ठाण्याला खान त्याच्या घरी जात असल्याची माहिती मिळाली, त्यानंतर सापळा रचून त्याला अटक करण्यात आली.
  
अधिकाऱ्याने सांगितले की, खानला १९९३ च्या प्रकरणात पुन्हा अटक करण्यात आली असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. दि. ६ डिसेंबर १९९२ रोजी बाबरी मशीद पाडल्यानंतर मुंबईत दंगल उसळली होती. या दंगलींमध्ये सुमारे ९०० लोकांना आपला जीव गमवावा लागला होता. यानंतर मुंबईत १३ ठिकाणी साखळी बॉम्बस्फोट झाले, ज्यात शेकडो लोक मारले गेले. तेव्हापासून मुंबई दहशतवादी आणि दंगलखोरांच्या निशाण्यावर होती.
Powered By Sangraha 9.0