येत्या आठ दिवसांत गिरणी कामगारांच्या घरांबाबत बैठक

03 Jul 2024 14:08:49

mill workers


मुंबई, दि.३ :
राज्याचे मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री, गृहनिर्माण विभाग व सनियंत्रण समितीचे अध्यक्ष यांच्या समवेत येत्या आठ दिवसांत बैठक घेऊन घरांच्या प्रश्नावर तातडीने मार्ग काढू असे ठोस आश्वासन गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी दिले असल्याची माहिती गिरणी कामगार संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रवीण घाग यांनी दिली आहे.

दरम्यान, गिरणी कामगार यांनी मंगळवार, दि. २ जुलै रोजी घराच्या प्रश्नावर आझाद मैदान येथे आंदोलन केले. या आंदोलनात तेलंगणा, सातारा, कोल्हापूर, पुणे, रत्नागिरी येथून हजारो कामगार सहभागी झाले होते. हे पाहता गिरणी कामगार सनियंत्रण समितीचे अध्यक्ष आमदार सुनील राणे यांनी राज्य सरकार आणि मोर्चा स्थळी जमलेले गिरणी कामगार यांचे शिष्टमंडळ यांच्यात चर्चा घडवून आणली. यावेळी गिरणी कामगार शिष्ट मंडळाने गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांची भेट घेतली. या शिष्ट मंडळात संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रवीण घाग, प्रवीण येरुंनकर,सुलेखा राणा, अनंत शिंदे तसेच तरुण स्वराज्य संघटनेचे तेजस कुंभार, विठ्ठल चव्हाण हे उपस्थित होते.

याबैठकीत प्रामुख्याने एमएमआरडीएच्या घरांची सोडत, १० महिन्यांपासून सुरुअसलेली पात्रता निश्चिती, काल मर्यादा, ठाणे येथील १२ हेक्टर जमीन, खटाव मिलची बोरिवली येथील जमीन, एन.टी.सी.गिरण्यांच्या जमिनी, कोन गाव येथील घरावर लावलेला देखभाल खर्च कमी करणेबाबत सकारात्मक चर्चा झाली. अंतिम निर्णय मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या बरोबरच्या बैठकीत घेतला जाईल अशी ग्वाही गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी गिरणी कामगारांना दिली. येत्या गणेशोत्सवापूर्वी सरकारच्या प्रतिनिधी समवेत गिरणगावात मोठा मेळावा घेतला जाईल. असे भव्य मेळावे महाराष्ट्र भर घेऊन सर्व गिरणी कामगारांना घराची माहिती दिली जाईल. तसेच, शेवटच्या कामगाराला घर मिळेपर्यंत हा संघर्ष चालूच राहील अशी माहिती अध्यक्ष प्रवीण घाग व प्रवीण येरुणकर यांनी दिली.
Powered By Sangraha 9.0