हाथरस चेंगराचेंगरी! मृतांचा आकडा ११६ वर; स्वयंघोषित धर्मगुरू बाबा भोलेला पकडण्यासाठी UP पोलिसांची शोध मोहीम

03 Jul 2024 12:09:06
 Hathras Stampede
 
लखनौ : उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये नारायण साकार हरीच्या प्रवचनाच्या वेळी झालेल्या चेंगराचेंगरीनंतर प्रशासन ॲक्शन मोडमध्ये आले आहे. या प्रकरणी प्रशासनाने एका आयोजकाविरुद्ध एफआयआर नोंदवला आहे. दरम्यान, ज्यांच्या कार्यक्रमात चेंगराचेंगरी झाली, त्या स्वयंघोषित गुरूच्या शोधात छापेमारी सुरू आहे. या घटनेतील मृतांची संख्या ११६ वर पोहोचली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे बुधवार, दि. ३ जुलै २०२४ हाथरसला जाऊन जखमींच्या प्रकृतीची विचारपूस करणार आहेत.
 
मीडिया रिपोर्ट्सनुसार, हाथरस चेंगराचेंगरीतील मृत्यूंबद्दल भारतीय न्याय संहितेच्या कलम १०५, ११०, १२६ (२), २२३ आणि २२८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या एफआयआरमध्ये देवप्रकाश मधुकर यांना आरोपी करण्यात आले आहे. तो या स्वयंघोषित बाबाचा मुख्य सेवक असल्याचे बोलले जाते. या प्रकरणी आणखी २१ जवानांना आरोपी करण्यात आले आहे.
 
नारायण साकार हरी उर्फ भोले बाबा उर्फ सूरजपाल याचाही शोध सुरू आहे. कार्यक्रमात झालेल्या चेंगराचेंगरीनंतर तो फरार झाला आहे. त्याच्या शोधात पोलीस छापे टाकत आहेत. हातरस सोडून तो मैनपुरीला पोहोचल्याची माहिती यापूर्वीच समोर आली होती. या माहितीवरून पोलीस येथे पोहोचले. मात्र तो येथे सापडला नाही. त्यांच्या समर्थकांनी पोलिसांचा रस्ता अडवल्याचे सांगण्यात आले.
 
मैनपुरीच्या या आश्रमात पोलिस शिरण्याआधीच तो येथून फरार झाला. पोलीस त्याचा अन्यत्र शोध घेत आहेत. या चेंगराचेंगरीतील अधिकृत मृतांची संख्या ११६ वर पोहोचली आहे. रात्रभर मृतांचे शवविच्छेदन सुरू होते. त्यांचे शवविच्छेदन हाथरस आणि एटा येथे करण्यात आले आहे. उत्तर प्रदेशचे मुख्य सचिव मनोज सिंह आणि डीजीपी प्रशांत कुमार हातरसला पोहोचले आहेत. ते येथील बचाव कार्यावर लक्ष ठेवून आहेत.
 
शवविच्छेदनानंतर मृतांचे मृतदेह त्यांच्या घरी पाठवण्यात येत आहेत. त्यानंतरही मोठ्या प्रमाणात मृतदेह रुग्णालयात आहेत. अनेक मृतदेहांची ओळखही पटलेली नाही. मृतांचे नातेवाईक त्यांचा शोध घेत आहेत.

Powered By Sangraha 9.0