चर्मकारांना मिळणार फायबर स्टॉल

03 Jul 2024 17:57:24

fyberstall  
 
मुंबई : चर्मकार समाजाच्या उन्नतीसाठी महायुती सरकारने पुढाकार घेतला असून, त्यांना फायबर स्टॉल उपलब्ध करून दिले जाणार आहेत. शिवाय चर्मकार समाजातील मुलांना गोवंडी येथे दोन एकरातील जागेवर प्रशिक्षण देण्याचे विचाराधीन असल्याची माहिती मंत्री गुलाबराव पाटील यांनी बुधवार, दि. ३ जुलै रोजी दिली. भाजपचे विधानपरिषदेतील गटनेते प्रवीण दरेकर यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. ते म्हणाले, मुंबई ही आर्थिक राजधानी आहे. येथे चर्मकार समाज फुटपाथवार, कुठे पत्र्याची, लाकडाची पेटी घेऊन कष्ट करत चपला बनवायचे, दुरुस्त करायचे काम करतो.
 
मात्र त्यांच्यासाठी चांगल्या स्टॉलची योजना नाही. या समाजाच्या उन्नतीसाठी राज्य सरकार प्रयत्न करणार का? बैठका होतात, मुख्यमंत्री मान्यता देतात. परंतु अंमलबजावणी न झाल्यामुळे त्या समाजाला कुठल्याही प्रकारचा लाभ दुर्दैवाने होत नाही. दि. १२ फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भात बैठक घेतली. ५-६ महिने मिनिट्स मान्यतेला लागले. निर्णय मान्यतेला घेतल्याचे सांगितले, मग त्याची अंमलबजावणी कधी करणार, असा सवाल दरेकर यांनी उपस्थित केला. मुंबईत किंवा अन्य शहरांत फुटपाथवर अशा प्रकारचे व्यवसाय करतात, त्यांच्यासाठी चांगली स्टॉलची योजना शासनाने आणावी.
 
जेणेकरून चर्मकार सन्मानाने व्यवसाय करू शकतील. तसेच चर्मकारांना चांगल्या दर्जाचे प्रशिक्षण द्या. आंतरराष्ट्रीय बाजारात आपल्या चपला, शूजची निर्मिती करून त्याला मार्केट मिळाले पाहिजे, अशी मागणी दरेकर यांनी केली. त्यावर उत्तर देताना मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, या समाजाची परिस्थिती फारच हालाकीची आहे. सरकारने त्यांना फायबरचे स्टॉल देण्यात यावे, असा निर्णय घेतला आहे. आचारसंहिता असल्यामुळे या गोष्टीला उशीर झाला. याबाबत कालबद्ध कार्यक्रम राबवू आणि त्या समाजाचे जे संबंधित आमदार आहेत त्यांना बोलावून बैठक लावू. देवनार येथे चर्मकार महाविद्यालय, खेरवाडीमधील तंत्र प्रशिक्षण केंद्र बंद अवस्थेत आहे. चर्मकार समाजातील मुलांना गोवंडी येथे दोन एकरातील जागेवर प्रशिक्षण देण्याच्या शासन विचाराधीन आहे, असेही त्यांनी सभागृहात सांगितले.
 
 
 
Powered By Sangraha 9.0