‘एसटी’ महामंडळ आर्थिकदृष्ट्या सक्षम होणार

03 Jul 2024 12:23:43
 
ST
 
मुंबई : “कर्मचार्‍यांचे वेतन, भत्ते देण्यासाठी ‘एसटी’ महामंडळाला शासनाकडे मदत मागायची गरज पडू नये, यासाठी महामंडळाला अधिकाधिक उत्पन्नाचे स्त्रोत निर्माण करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. ‘एसटी’ महामंडळाला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे,” अशी माहिती मंत्री दादाजी भुसे यांनी मंगळवार, दि. 2 जुलै रोजी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.
 
‘एसटी’ महामंडळाबाबत आ. कृष्णा गजबे यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर उत्तर देताना मंत्री दादा भुसे म्हणाले की, “महामंडळाच्या ताफ्यात 5 हजार, 150 नवीन ‘इलेक्ट्रिक’ बस भाडेतत्त्वावर घेण्यात येणार आहेत. मागणीनुसार सर्व आगारांना बस देण्यात येत आहेत. ‘बी.एस.’ मानकाच्या 2 हजार, 420 बस खरेदीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. तसेच एक हजार जुन्या डिझेल बस ‘सीएनजी’वर आणि पाच हजार बस लिक्विड नॅचरल गॅस (एलएनजी)वर रुपांतरित करण्यात येत आहे. यामुळे डिझेल व दुरुस्तीवरील खर्चात बचत होणार आहे.”
 
“शासनाने महामंडळाला विद्यार्थीप्रवास सवलत योजनेपोटी 837 कोटी, अमृत ज्येष्ठ नागरिक विनामूल्य प्रवास सवलत योजनेसाठी 1 हजार, 124 कोटी, महिलासन्मान योजनेकरिता 1 हजार, 605 कोटी रुपयांची प्रतिपूर्ती केली आहे. विद्यार्थ्यांना शाळेत पास देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. महिला सन्मान, ज्येष्ठ नागरिक अमृत योजना आणि विद्यार्थीप्रवास सवलत योजना यामधून शासन महामंडळाला प्रतिपूर्तीसाठी कोट्यवधींचा निधी देत आहे,” अशी माहिती भुसे यांनी दिली.
दहा तारखेच्या आत वेतन
 
“महामंडळाच्या सर्व कर्मचार्‍यांचे वेतन प्रत्येक महिन्याच्या दहा तारखेच्या आत करण्यात येणार आहे. मागील काळात ‘एसटी’ कर्मचार्‍यांनी विविध मागण्यांसाठी आंदोलन केल्यानंतर शासनाने आंदोलनकर्त्यांसमवेत बैठक घेऊन सकारात्मक चर्चा केली. त्यामुळे आंदोलन स्थगित झाले. शासनाने वेतन, भत्ते, वेतनवाढ, बोनस, महागाई भत्ता याबाबत मागण्या पूर्ण करण्यासाठी अपर मुख्य सचिव (वित्त) यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय समिती स्थापन केली आहे. या समितीच्या दोन बैठका झालेल्या आहेत. या समितीने अहवाल दिल्यानंतर अहवालानुसार कार्यवाही करण्यात येईल,” असेही मंत्री भुसे यांनी सांगितले.
 
 
Powered By Sangraha 9.0