संस्कार भारती कोकण प्रांतातर्फे आयोजित 'सिनेटॉक – सिनेसृष्टि भारतीय दृष्टी’ हा कार्यक्रम शनिवारी (२७ जुलै) रोजी मोठ्या उत्साहात पार पडला. अंधेरी येथील मा स्टुडिओमध्ये दुपारी ३ ते ५ या वेळेत हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात ‘द जर्नी ऑफ इस्रो’ या माहितीपटाचे प्रदर्शन आणि त्यावर चर्चा झाली.
द जर्नी ऑफ इस्रो या माहितीपटाचे लेखक-दिग्दर्शक श्रीधर के एस, संस्कार भारती कोकण प्रांताचे उपाध्यक्ष अरूण शेखर, संस्कार भारतीचे वरिष्ठ मार्गदर्शक ह्यषिकेश जोशी आणि संस्कार भारतीचे वरिष्ठ कार्यकर्ते संजय गोडसे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. संस्कार भारती कार्यकर्ते तन्मय जहागिरदार यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन केले. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे ७५ वर्षातील कार्य, राष्ट्रीयदृष्ट्या या संस्थेचे महत्व, या संस्थेने आजवर पार पडलेल्या मोहिमांवर आधारित 'द जर्नी ऑफ इस्रो' या इंग्रजी भाषेतील माहितीपटाचे प्रदर्शन या कार्यक्रमात झाले.
माहितीपटाच्या प्रदर्शनानंतर अरूण जोशी आणि दिग्दर्शक श्रीधर के एस यांनी प्रेक्षकांसोबत या माहितीपटावर आधारित चर्चा केली. दिग्दर्शकाला या माहितीपटाची कल्पना कशी सुचली, हा माहितीपट तयार करताना कोणत्या अडचणी आल्या, इस्त्रोने यासाठी कसे सहकार्य केले असे प्रश्न प्रेक्षकांकडून विचारण्यात आले. संजय गोडसे यांनी या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले."भारताला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने मला हा माहितीपट करण्याची असाईनमेन्ट मिळाली होती. इस्त्रो ही भारताची अशी संपत्ती आहे ज्यात ब्रिटिशांचा कुठलाही हातभार नाही, ती पूर्णतः भारताची स्वतःची आहे म्हणून मी माहितीपटासाठी इस्रो हा विषय निवडला." अशी माहिती दिग्दर्शक श्रीधर के एस यांनी दिली.