विदेशातील भारतीय विद्यार्थ्यांची मृत्युमालिका आणि काही प्रश्न

29 Jul 2024 21:17:50
indian student learn in foreign


विदेशातील भारतीय विद्यार्थ्यांच्या मृत्युमालिकेने साहजिकच काही प्रश्न उपस्थित केले आहेत. या घटना साहजिकच एका देशातील आणि एकाच कारणामुळे झालेल्या नसल्या तरी त्या निश्चितच चिंताजनक आहेत. त्यानिमित्ताने विदेशातील भारतीय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. त्याचा केलेला ऊहापोह...

देशात शिक्षणासाठी गेलेल्या भारतीय विद्यार्थ्यांपैकी काही विद्यार्थी दुर्दैवाने तेथे मृत्यू पावतात. काही हिंसाचारामुळे, तर काही आजारी पडल्याने किंवा अन्य नैसर्गिक आपत्तीमुळे मरण पावतात. विदेशात शिक्षणासाठी गेलेल्या अशा विद्यार्थ्यांपैकी सर्वात जास्त विद्यार्थी कॅनडामध्ये मरण पावले आहेत. गेल्या पाच वर्षांमध्ये विदेशात 633 भारतीय विद्यार्थी मृत्युमुखी पडले. त्यातील 172 विद्यार्थी एकट्या कॅनडात मरण पावले आहेत. हे जे 633 विद्यार्थी मरण पावले, ते 41 देशांमधील आहेत. कॅनडाखालोखाल अमेरिकेमध्ये 108, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया, रशिया आणि जर्मनीमध्ये अनुक्रमे 58, 57, 37 आणि 24 विद्यार्थ्यांना या पाच वर्षांच्या कालखंडात प्राण गमवावे लागले. त्याशिवाय, पाकिस्तानमध्येही एक विद्यार्थी मरण पावल्याची माहिती सरकारकडून देण्यात आली. यामध्ये त्या त्या देशांमध्ये हिंसाचारात एकूण 19 विद्यार्थी मृत्युमुखी पडले. संबंधित देशातील परिस्थितीमुळे संकटात सापडलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्यासाठी सरकारकडूनही वेळोवेळी त्वरेने उपाययोजना केल्या आहेत. ‘वंदे भारत मिशन’, ‘ऑपरेशन गंगा’ (युक्रेन) आणि ‘ऑपरेशन अजय’ (इस्रायल) या मोहिमांखाली भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशी सुखरूप आणण्यात आले.

यानिमित्ताने विदेशात किती भारतीय विद्यार्थी शिकत आहेत, याची माहितीही समोर आली आहे. या वर्षापर्यंत सुमारे 1.33 दशलक्ष विद्यार्थ्यांनी विदेशातील विविध शैक्षणिक संस्थांमध्ये आपली नावे नोंदविली आहेत. गेल्या तीन वर्षांमध्ये या आकडेवारीत लक्षणीय वाढ झाली. 2022 मध्ये ही संख्या सात लाख 50 हजार होती. ती 2023 मध्ये नऊ लाख 30 हजारांवर गेली आणि आता ती संख्या 13 लाख 30 हजारांवर गेली आहे. या विद्यार्थ्यांपैकी सर्वाधिक विद्यार्थी कॅनडामध्ये शिकायला जातात. त्या देशात चार लाख 27 हजार, त्या खालोखाल अमेरिकेत तीन लाख 37 हजार, ब्रिटनमध्ये एक लाख 85 हजार आणि ऑस्ट्रेलियात एक लाख 22 हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्याशिवाय जर्मनी, संयुक्त अरब अमिराती, रशिया, चीन, न्यूझीलंड, नेपाळ, सिंगापूर, जपान, इराण येथेही भारतीय विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. पाकिस्तानमध्ये सध्या 14 भारतीय विद्यार्थी शिक्षण घेत आहेत, तर युक्रेनमध्ये संघर्ष असूनही तेथे 2 हजार 510 विद्यार्थी सध्या शिक्षण घेत आहेत. विदेशात शिक्षण घेण्यासाठी भारतीय विद्यार्थी किती मोठ्या संख्येने जात आहेत, त्याची या आकडेवारीवरून कल्पना यावी. दुर्दैवाने अशा विद्यार्थ्यांपैकी काही विविध कारणांमुळे मृत्यूला सामोरे जातात. असे असले तरी विदेशात शिक्षण घेण्यासाठी मोठ्या संख्येने भारतीय विद्यार्थी विदेशात जात आहेत, हे या आकडेवारीवरून दिसून येत आहे.


‘नमास’ शब्द अरबांनी घेतला संस्कृतमधून!

अखिल भारतीय इमाम संघटनेचे प्रमुख आणि इस्लामी विद्वान डॉ. इमाम उमर अहमद इलयास यांनी संस्कृत आणि अरबी भाषा यांच्यामध्ये ऐतिहासिक संबंध होता, असे वक्तव्य केले आहे. डॉ. इलयास यांच्या मते, अरबांनी ‘नमस्कारम्’ या शब्दापासून ‘नमास’ हा शब्द घेतला. ही माहिती कोणा हिंदू विद्वानाने सांगितलेली नाही, तर भारतातील इमाम संघटनेच्या प्रमुखाने ती सांगितली असल्याने ती महत्त्वाची आहे. ‘नमास’ हा शब्द त्याआधी अरबांना माहिती नव्हता. हा शब्द उर्दू भाषेमधून आला असल्याचा जो समज आहे, त्यासही डॉ. इलयास यांनी आव्हान दिले आहे. ‘नमास’ या शब्दाचे मूळ संस्कृत शब्द ‘नम:’ यामध्ये आहे. ‘देवाचा आदर करा’, असा त्याचा अर्थ होतो. अरबी भाषेमध्ये ‘नमस्कार’ या शब्दासाठी ‘सलाह’ या शब्दाचा वापर केला जातो. आपल्या म्हणण्याच्या पुष्ट्यर्थ त्यांनी समाजमाध्यमावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. डॉ. इलयास हे अयोध्येमध्ये जानेवारी 2024 मध्ये आयोजित रामललाच्या प्राणप्रतिष्ठा समारंभास उपस्थित होते. संस्कृत भाषा ही सर्व भाषांची जननी असल्याचे मानण्यात येते. अरबी भाषेवर संस्कृतचा प्रभाव राहिल्याचे अशा उदाहरणांवरून दिसून येते. युरोपमधील भाषांची जननी म्हणून लॅटिनकडे पाहिले जाते. पण, त्या भाषेतही अनेक संस्कृत शब्द घेतल्याचे दिसून येते. त्यामुळे डॉ. इलयास यांनी जी माहिती दिली, त्यामुळे आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. भाषिक देवाणघेवाण ही विविध संस्कृतींमध्ये चालत आलेली आहे. त्यामुळे डॉ. इलयास यांनी जी माहिती दिली आहे, त्यावरून संस्कृत आणि अरबी भाषेमध्ये ऐतिहासिक संबंध असल्याचे दिसून येते.
 

महिला अधिकार्‍याकडून 20 कोटींचा घोटाळा

कित्येक कोटींचे घोटाळे उजेडात येत असलेल्या जगात 20 कोटी रुपयांचा घोटाळा हा अगदीच नगण्य मानायला हवा. पण असा घोटाळा केला आहे एका नामांकित वित्तीय संस्थेमध्ये साहाय्यक व्यवस्थापकपदावर काम करीत असलेल्या एका महिलेने. त्या संस्थेमधून 20 कोटी रुपये आपल्या पदाचा गैरवापर करून या महिलेने लांबविले. केरळमधील कोल्लमची रहिवासी असलेल्या त्या 40 वर्षे वयाच्या महिलेने स्थावर मालमत्ता, घर आणि उंची वस्तू खरेदी करण्यासाठी या पैशांचा वापर केला. ही महिला ‘बीटेक’ झाली आहे. आपल्या हुशारीच्या जोरावर तिने या कंपनीत नोकरी मिळविली. पण, नंतर आपल्या ज्ञानाचा उपयोग त्या संस्थेसाठी न करता, त्या संस्थेला कसे गाळात घालता येईल, यासाठी केला असे त्या महिलेने जे उद्योग केले त्यावरून दिसून येत आहे. धान्या नावाच्या या महिलेने आपल्या ज्ञानाचा उपयोग करून तिने जे गैरव्यवहार केले होते, त्याची आकडेवारी पुसून टाकली. पण मध्यंतरी संपूर्ण जगात माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रात जो बिघाड झाला, त्यानंतर या महिलेचे पितळ उघडे पडले. गेल्या 27 जुलै रोजी धान्या पोलिसांना शरण गेली. चौकशीमध्ये तिने आपल्या गुन्ह्यांची कबुली दिल्याचे समजते. उच्चशिक्षित व्यक्तीही पैशाच्या मोहापायी कसा प्रचंड घोटाळा करू शकते, हे या उदाहरणावरून लक्षात येते.


बेकायदा घुसखोरीसाठी ‘ऑनलाईन मार्गदर्शन!’

एका बांगलादेशी युट्यूबरने बांगलादेशातून भारतात घुसखोरी करणार्‍या लोकांसाठी 21 मिनिटांचा एक व्हिडिओ प्रदर्शित केला असून, त्याद्वारे पासपोर्ट किंवा व्हिसा नसताना भारतात कशी घुसखोरी करायची, याबद्दल ‘मार्गदर्शन’ केले आहे. बांगलादेशातून होणार्‍या घुसखोरीची समस्या नवीन नाही. पण, या घुसखोरीसाठी कशा आधुनिक तंत्राचा वापर केला जातो, याची कल्पना यावरून यावी. बांगलादेशमधील सिल्हेत जिल्ह्यातील जुम्गाव गारो या गावामधून मेघालयमधील चेरापुंजीमध्ये कसे जायचे, याचे मार्गदर्शन यामध्ये करण्यात आले आहे. समाजमाध्यमावर एका अन्य व्यक्तीनेही एका बांगलादेशी नागरिकाचा व्हिडिओ शेअर केला आहे. युरोपियन व्हिसा मिळविण्यासाठी तो बांगलादेशी दिल्लीमध्ये आला होता. पण, त्याचा व्हिसा नाकारल्यानंतर तो म्हणे आता पहाडगंज भागात बिर्याणी विकत असल्याची माहिती बोनी अमिम नावाच्या एका ब्लॉगरने दिली आहे. यानिमित्ताने भारत सरकारकडून जे व्हिसा धोरण राबविले जाते, त्यावर टीका केली जात आहे. भारताकडून दररोज सुमारे एक हजार बांगलादेशी नागरिकांना व्हिसा दिला जातो. एवढ्या मोठ्या संख्येने का व्हिसा दिला जातो, याबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. व्हिसा दिला जाणार्‍यांची ही आकडेवारी झाली. पण, बेकायदेशीरपणे कित्येक बांगलादेशी भारतात दररोज घुसतात त्यांचे काय? तसेच अशा घुसखोरांना ‘ऑनलाईन मार्गदर्शन’ करणारे समाजमाध्यमांवर राजरोस ही माहिती देत असतात. त्यांना पायबंद कोण घालणार?

 
9869020732
Powered By Sangraha 9.0