मुंबई : अनिल देशमुखांचं डोकं फिरलं आहे, अशी टीका समीत कदम यांनी केली आहे. ईडीच्या कारवाईतून सुटका मिळवण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी समीत कदम यांच्या माध्यमातून मला निरोप पाठवल्याचे अनिल देशमुखांनी म्हटले होते. यावर आता समीत कदमांनी प्रतिक्रिया दिली.
समीत कदम म्हणाले की, " अनिल देशमुखांनी माझे फेसबूक आणि इन्स्ट्राग्रामवर असलेले फोटोच दाखवले आहेत. यात काही फार मोठा शोध त्यांनी लावलेला नाही. ते फोटो जगजाहीर आहेत. २०१६ पासून जनसुराज्य पक्ष हा आमचा स्वतंत्र पक्ष आहे आणि मी त्याचा राज्याचा अध्यक्ष आहे. ज्यावेळी आम्ही एनडीएचे घटक पक्ष झालो त्यावेळी आम्हाला वेगवेगळ्या विषयांच्या बैठकीकरिता निमंत्रण दिलं जातं. पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून तर राज्यातील विविध बैठकींना आम्हाला बोलवण्यात येतं. त्यावेळी फडणवीस साहेबांची आणि इतर सर्वच पक्षाच्या नेत्यांशी भेट होते. त्यामुळे यात फार मोठं चर्चा करण्यासारखं काहीही नाही."
हे वाचलंत का? - "अनिल देशमुख हा घ्या आणखी एक फोटो!"
"मी एका घटकपक्षाचा राज्याचा अध्यक्ष असल्यामुळे मला राज्यातील सर्वच राजकीय नेते ओळखतात. अनिल देशमुख साहेब हे विसरले आहेत. ते नागरी पुरवठा मंत्री होते तेव्हापासून माझी आणि त्यांची ओळख आहे. देवेंद्र फडणवीसांशी माझी नंतर ओळख झाली. त्यामुळे सारखे एकच फोटो दाखवून त्यावर चर्चा करणं यात काहीही अर्थ वाटत नाही. तीन वर्षांनी हा विषय मांडून देवेंद्र फडणवीसांना निवडणूकीच्या आधी डॅमेज करण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्यामुळे अनिल देशमुखांचं डोकं फिरलं आहे," अशी टीका समीत कदम यांनी केली आहे.