मुंबई : सुपारीबहाद्दरांनी अजितदादांबद्दल बोलू नये, असा पलटवार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरींनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर केला आहे. पुण्यातील पूरस्थितीवरून राज ठाकरेंनी अजित पवारांना टोला लगावला होता. यावर आता मिटकरींनी प्रत्युत्तर दिले.
अमोल मिटकरी म्हणाले की, "दिलेला शब्द पाळणाऱ्या अजितदादांबद्दल सुपारीबहाद्दरांनी बोलू नये. कारण हे सुपारीबहाद्दर टोलनाका, भोंगा असे कुठलेच आंदोलन जीवनात यशस्वी करु शकले नाहीत. त्यामुळे या व्यक्तीची विश्वासार्हता संपलेली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात आतापर्यंतच्या इतिहासात सर्वात अयशस्वी ठरलेल्या व्यक्तींनी अजितदादांच्या कर्तृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करणं म्हणजे सुर्याला वाकोल्या दाखवण्यासारखं आहे," असे ते म्हणाले.
हे वाचलंत का? - "शरद पवारांच्या तोंडी दंगल घडवण्याची भाषा योग्य नाही!"
काय म्हणाले राज ठाकरे?
राज ठाकरे म्हणाले की, "पुण्यात धरणाचं एवढं पाणी सोडणार याची लोकांना कल्पना नव्हती. त्यामुळे त्यांच्या घरात पाणी शिरलं आहे. त्यांची अत्यंत वाईट परिस्थिती झाली आहे. त्यामुळे शासनाने यात लक्ष घालण्याची गरज आहे. त्यांना वाऱ्यावर न सोडता त्यांची मदत करण्याची आवश्यकता आहे."
"मुंबई बरबाद व्हायला वेळ लागला. पण पुणे बरबाद व्हायला वेळ लागणार नाही. या संपूर्ण प्रकारात पुण्यातील नगरसेवकांनी जाणीवपूर्वक लक्ष दिलं पाहिजे. ज्यांची इच्छा आहे, त्यांनी तरी लक्ष द्यायला पाहिजे. एखादा प्रकल्प आणायचा असल्यास तो सर्वांना विचारपूस करुन का आणत नाहीत? नागरिकांशी किंवा पत्रकारांशी का बोलत नाहीत?" असा सवाल त्यांनी केला.
ते पुढे म्हणाले की, "आपापसातले हेवेदावे सोडून सर्व राजकीय पक्षांनी एकत्र बसल्यास या शहराचा प्रश्न सुटेल. हे एकट्या पक्षाचं काम नाही. सगळ्या एजन्सीज एकत्र बसत नसल्याने ही परिस्थिती आहे. आज मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री आहेत. यातले एक तर पुण्याचेच आहेत. म्हणजे ते नसतानाही धरण वाहिलंय. एवढं पाणी पडलं. त्यांनी यात लक्ष घालायला नको का?," असेही ते म्हणाले.