नागपूर : शरद पवारांच्या तोंडी दंगल घडवण्याची भाषा योग्य नाही, असे वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी केले आहे. शरद पवारांनी महाराष्ट्रातही मणिपूरसारख्या दंगली घडण्याबाबत चिंता व्यक्त केली होती. यावर आता बावनकुळेंनी प्रतिक्रिया दिली.
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, "शरद पवार साहेब निवडणूकीच्या राजकारणासाठी या स्तरावर बोलतात हे योग्य नाही. त्यांनी अनेक वर्ष महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व केलं. त्यामुळे त्यांच्या तोंडी दंगल घडवण्याची भाषा योग्य नाही. महाराष्ट्राची जनता सुज्ञ आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील जनता कधीही दंगलीपर्यंत जाणार नाही. पण काही लोकं समाजासमाजात तेढ निर्माण करतात आणि त्यातून महाराष्ट्राला विचलित ठेवण्याचं काम करतात. यात शरद पवारांनी पुढाकार घ्यावा."
हे वाचलंत का? - आमदार अपात्रता प्रकरण! अजित पवार गटाला सुप्रीम कोर्टाची नोटीस
"देवेंद्र फडणवीस सक्षम आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात कधीच दंगलींची परिस्थिती येणार नाही. शरद पवारांनी दंगली घडवण्याची भाषा कोणत्या कारणावरून केली आणि त्यांच्या मनात काय आहे हे माहिती नाही. याबद्दल त्यांनाच विचारावं लागेल," असे ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, "विरोधी पक्षांचे विशेषत: काँग्रेसचे नेते फक्त बाहेर बोलतात आणि राजकारण करतात. सामाजिक परिस्थिती योग्य पद्धतीने हाताळण्याची कधीही काँग्रेसची भूमिका नव्हती. काँग्रेस पक्ष समाजासमाजात वाद निर्माण करून अनेक वर्षांपासून आरक्षणाचा प्रश्न धगधगत ठेवत आहे," अशी टीकाही बावनकुळेंनी केली आहे.